श्री प्रदीप केळुस्कर
जीवनरंग
☆ ‘बासरी…’- भाग १ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆
झपझप चालत बापट बाई सहावीच्या वर्गात आल्या. मुलांनी गुड मॉर्निंग मॅडम म्हणत बाईंचे स्वागत केले. बाईंनी पण गुड मॉर्निंग म्हणत मुलांना बसायला सांगितले. बाईंनी डस्टर, खडू टेबलावर ठेवले आणि मुलांशी संवाद साधायला सुरुवात केली. हा वर्ग त्यांच्या विशेष आवडीचा. गेल्यावर्षी पण पाचवीत बापट बाईच या वर्गाच्या क्लास टीचर होत्या. तोच वर्ग पाचवी पास करत सहावीत आला. सर्व मुले त्यांच्या ओळखीची. फक्त एक सोडून….
बाईंच्या कपाळावर आठी आली. या मुलाचे काय करायचे ? यंदाच दुसर्या शाळेतून आलेला हा मुलगा इतर मुलांमध्ये मिसळत नव्हता. अभ्यास करत नव्हता. बोलत नव्हता. गप्प राहून फक्त बघत रहायचा. बापट बाईंना कळेना या मुलाला हसता खेळता कसे करावे ? आज बापट बाई डेस्कवरुन उतरुन खाली आल्या. त्या शेवटच्या बाकावर बसलेल्या मुलाला म्हणाल्या,
‘‘अरे मुला, बोल काहीतरी, नाव काय तुझे ?’’
‘‘कृष्णा, कृष्णा सदाशिव शिंदे’’
‘‘ गेल्यावर्षी कुठल्या शाळेत होतास तू?’’
‘‘देवबाग हायस्कूल’’
‘‘मग यंदा मालवणला कसा काय आलास ?’’
‘‘वडलानी तिकडंच काम सोडलं, आत्ता हिथ काम धरलयां’’
‘‘कुठ काम करतात तुझे वडिल?’’
‘‘तेलींच्या गोडावूनमध्ये हमाल हाय.’’
‘‘बरं! तू आता पुढे बसशील का ?’’
आणि कृष्णा पुढून दुसर्या बेंचवर बसू लागला. बाईंनी गणित शिकवायला सुरुवात केली. अधून मधुन त्यांचं कृष्णाकडे लक्ष जात होतं. कृष्णा स्थिर नजरेने पाहत होता. बाकीची मुलं वहित लिहून घेत होती कृष्णाने वही उघडली नव्हती. मध्येच बाई थांबल्या. कृष्णाला म्हणाल्या –
‘‘कृष्णा ! बोर्डवरचं लिहून घेत नाहीस?’’
हु नाही की चु नाही. बाईंनी पुन्हा शिकवायला सुरुवात केली. कृष्णा तसाच बघत राहिला. बापट बाईंचा वर्ग संपला तसा कृष्णा पुन्हा शेवटच्या बाकावर बसायला गेला. मधल्या सुट्टीत बापट बाई मुख्याध्यापक सामंत सरांना भेटायला गेल्या.
‘‘सर, सहावीतील एका मुलाबद्दल बोलायचं होतं.’’
‘‘हा, कुठला मुलगा ?’’
‘‘कृष्णा शिंदे, देवबाग हायस्कूलला पाचवीत होता. यंदा सहावीत आपल्या शाळेत आला. तो काही वेगळाच आहे. निर्विकार डोळ्यांनी समोर पाहत असतो. वही उघडत नाही की पुस्तक उघडत नाही. बोर्डावरचे काही लिहून घेत नाही. इतर मुलांमध्ये मिसळत नाही. खेळायला जात नाही. काय करायचं या मुलाचं ?’’
‘‘देवबाग हायस्कूलमधून आलाय का? माझी वहिनी त्याच शाळेत नोकरी करते. एक दोन दिवसात मी वहिनीची भेट घेतो आणि कृष्णाची चौकशी करतो.’’
बापट बाई गेल्या. शाळा संपवून घरी गेल्या. बाई आणि बाईंचा मुलगा अवि दोघेच मालवणात रहायचे. बाईंचे मिस्टर पुण्याला बँकेत होते. रोज सारखी बाईंची घरकामे सुरु झाली. त्यांनी देवाला निरांजन लावले. चौथीत असलेल्या अवीचा स्कॉलरशीपचा अभ्यास घेतला. बाई सर्वकाही करत होत्या पण डोळ्यासमोर होता शेवटच्या बाकावर बसलेला आणि निर्विकार डोळ्यांनी पाहणारा कृष्णा.
दोन दिवसानंतर बाई शाळेत पोहोचल्या. तेवढ्यात प्युनने सामंत सर बोलवल्याचा बाईंना निरोप दिला. बाईंनी आपली पर्स लॉकर्समध्ये ठेवली आणि त्या मुख्याध्यापकांच्या रुममध्ये गेल्या.
‘‘या बापट बाई ! तुम्ही त्या कृष्णा शिंदेची चौकशी करायला सांगितलेली ना ? माझी वहिनी देवबाग हायस्कूलमध्ये शिकवते. तिच्याकडे चौकशी केली या कृष्णा बद्दल.’’
‘‘हो का ? मग ?’’
‘‘अहो, हा कृष्णा दोन वर्ष सतत पहिल्या नंबरावर होता. अत्यंत हुशार मुलगा पण…’’
‘‘पण काय ? ’’
‘‘फार वाईट वाटते सांगायला. हे शिंदे तिकडे सातारकडचे. मासे पकडायला समुद्रात बोटी जातात ना तशा बोटीवर शिंदे कामाला होता. या बोटीवरील खलाशांचे जेवण या शिंदेची बायको म्हणजे कृष्णाची आई करायची. जेव्हा बोट किनार्यावर असेल तेव्हा खलाशी घरी जेवायला येत किंवा बोटीवर जाताना डबे घेऊन जात. त्यातील एका मलबारी खलाशाबरोबर कृष्णाची आई पळून गेली.’’
‘‘काय?’’ बापट बाई किंचाळत बोलल्या.
‘‘होय बाई आणि या कृष्णाला एक लहान बहिण आहे चार वर्षाची. तिला ती बरोबर घेऊन गेली. याचा बाप बिचारा रडला, भेकला पण यांना कुठे शोधणार तो ? ती दोघ केरळच्या बाजूला गेल्याची बातमी होती. त्याने ७-८ दिवस वाट पाहिली आणि बोटीवरची नोकरी सोडली आणि इथे मालवणात तेलींच्या गोडाऊनमध्ये नोकरी पकडली. या कृष्णाला घेऊन तो मालवणात आला आणि आपल्या शाळेत त्याचं नाव घातलं.’’
‘‘अरे बाप रे ! काय सोसतोय हा पोरगा.’’ बाई कळवळून म्हणाल्या.
‘‘होय बाई, कोवळ्या वयात मोठा आघात बसलाय या कृष्णावर म्हणून तो निश्चल झालाय. रोज डोळ्यासमोर असणारी आई आणि छोटी बहिण नाहीशी होणे हे किती भयानक आहे ? बाई आपण या मुलाला पुन्हा हसता खेळता करायला हवा. आणि त्याकरिता तुम्हाला त्याच्या बाई नव्हे आई व्हायला लागेल.’’
‘‘हो सर, माझ्या लक्षात आलय ते, मी प्रयत्न करणारच. येते सर !’’
बापट बाई स्टाफरुममध्ये आल्या आणि आपल्या खुर्चीत बसल्या. त्यांच्या डोळ्यासमोर कृष्णाचा चेहरा येत राहिला. काय निष्पाप पोर हे, या वयात काय काय सोसावं लागतयं या मुलाला. बाईंना आपला चौथीतला आपला मुलगा अवी आठवला. अवी पेक्षा हा फक्त दोन वर्षांनी मोठा. या मुलाला मायेची गरज आहे. आईची गरज आहे हे त्यांच्या लक्षात आलं. बाईंनी रुमालाने तोंड पुसले आणि इतक्यात बेल झाली तशा त्या सहावीच्या वर्गात गेल्या. नेहमीप्रमाणे गुड मॉर्निंग वगैरे झाल्यावर त्यांचे कृष्णाकडे लक्ष गेले. गेले दोन दिवस कृष्णा त्यांच्या तासाला दोन नंबरच्या बेंचवर बसत होता. बाई कृष्णा जवळ आल्या. त्यांनी त्याच्या पाठीवर हात ठेवला. बाई म्हणाल्या –
‘‘कृष्णा दाखव तुझं दप्तर, पुस्तक, वही वगैरे काही आणलेस का?’’
कृष्णा खाली मान घालून गप्प बसून होता. बाईंनी त्याचे दप्तर पाहिले. दप्तरात पाचवीची एक वही होती आणि एक जुनं पेन होतं.
‘‘अरे आता तू सहावीत आहेस बाळा ! सहावीची पुस्तकं-वह्या घेतली नाहीस का ?’’
‘‘नाही.’’
‘‘ठिक आहे, तो पर्यंत या राहूलच्या पुस्तकात बघ, उद्या आपण वह्या पुस्तकांचा बंदोबस्त करुया.’’ अस म्हणत बाई पटकन स्टाफरुममध्ये गेल्या आणि एक वही आणि एक पेन घेऊन आल्या.
‘‘कृष्णा, ही वही घे आणि पेन. आता मी बोर्डवर लिहीते ते वहीमध्ये लिही मग मी तुझी वही तपासणार’’असं म्हणत बाई गणित शिकवू लागल्या. त्यांच लक्ष होतं. कृष्णा बोर्डावरचे लिहून घेत होता. शिकवता शिकवता बाई डायसवरुन खाली आल्या आणि कृष्णाची वही पाहू लागल्या. कृष्णा वहीत लिहित होता. बाईंनी पाहिले कृष्णाचे अक्षर मोत्यासारखे होते. लिहिण्यात टापटिपी होती. भूमितीची पदे व्यवस्थित एकाखाली एक लिहिली होती. बाईंनी कृष्णाची वही हातात घेतली आणि सर्व मुलांना कौतुकाने दाखवली.
‘‘बघा मुलांनो, या कृष्णाची वही पहा. काय टापटिप आहे. अक्षर मोत्यासारखं आहे. बघा !’’
मुलं पाहू लागली. एवढ्या दिवसात हा बावळट वाटणार्या मुलाबद्दल त्यांनाही कौतुक वाटू लागलं. मुलांची कृष्णाकडे पाहण्याची दृष्टी बदलली. कृष्णापण खुश झाला. या नवीन शाळेत त्याच्या कोणी ओळखीचे नव्हते. वर्ग संपला तशा बापट बाई वर्गाबाहेर गेल्या. पण नवीन तास घेणार्या शिक्षकांना कृष्णाबद्दल सांगून त्याच्याकडे विशेष लक्ष देण्यास सांगत होत्या. अस करता करता सर्वच शिक्षकांमध्ये कृष्णाबद्दल चर्चा होत गेली आणि सर्वजण त्याच्याकडे विशेष लक्ष देऊ लागले.
मधल्या सुट्टीत वर्गातील सर्व मुले आपआपले डबे घेऊन बाहेर पडले. एकटा कृष्णा वर्गात बसून होता. एवढ्यात बापट बाई डबा आणि त्यांचा चौथीत शिकणारा मुलगा अवि याचा हात धरुन वर्गात आल्या. आणि एकट्या बसलेल्या कृष्णाकडे पाहून म्हणाल्या –
‘‘कृष्णा ! डब्यातून काही आणलसं का रे ?’’
कृष्णाने मान हलवली. बापट बाईंनी पाहिले कृष्णाच्या डोळ्यात पाणी जमा झाले होते.
‘‘हरकत नाही. हा बघ माझा मुलगा अवि. हा चौथीत आहे. चला आपण डबा खाऊ. कृष्णा या अविसोबत बाहेर जा. हातपाय धुवून या तो पर्यंत मी डबा उघडते. अविने कृष्णाचा हात पकडला आणि ते दोघे बाथरुममध्ये गेले. तो पर्यंत बाईंनी आपला आणि अविचा डबा उघडला आणि दोन डब्याचे तीन डबे केले. कृष्णाला जास्त जेवण ठेवलं. दोघेही येताच त्यांच्या हातात एक-एक डबा दिला आणि आपल्या हातात एक डबा घेतला. कृष्णा डब्यातले अन्न खायला संकोचू लागला तेव्हा बाई ओरडल्या.
‘‘कृष्णा आता मी रागवेन. झटपट डबा संपवायचा. मला पुन्हा पुढल्या तासाला जायचयं.’’तसा कृष्णा डब्यातली चपाती भाजी खाऊ लागला. अविला नेहमीची सवय होतीच. त्यामुळे त्याने झटपट डबा संपवला. बाईंनी कृष्णाला दाखवले –
‘‘हे बघ, चपाती आणि भाजी एकत्र खाल्ली की मध्ये मध्ये लोणच्याची फोड तोंडात घालायची. लोणच्याने तोंडाला चव येते. तहान लागली की पाणी प्यायचं.’’
क्रमश: भाग १
© श्री प्रदीप केळुसकर
मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈