श्री प्रदीप केळुस्कर
जीवनरंग
☆ ‘बासरी…’- भाग ४ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆
( मागील भागात आपण पहिले – बाई बाहेर पडल्या. त्यांना जेवण करण्याचा पण कंटाळा आला. त्यांनी अविला महाजनांच्या खाणावळीत पिटाळलं आणि त्या कॉटवर झोपी गेल्या. सायंकाळी थोड बर वाटल्यावर बाई अविला सोबत घेऊन शाळेचा क्लार्क कांबळी यांच्या घरी गेल्या. आता इथून पुढे)
‘‘कांबळी, सातवीत कृष्णा शिंदे नावाचा मुलगा होता त्याचा दाखला कोणी नेला काय?’’‘‘हो बाई, कृष्णाचा बाबा आला होता स्वतः’’
‘‘कुठल्या शाळेत कृष्णाचे नाव घालणार, काही म्हणत होते ?’’
‘‘नाही, निश्चित सांगितले नाही. पण कराडच्या बाजूला त्यांच गाव आहे लहानस, तेथे तो शाळेत जाईल असं ते म्हणत होते.’’
‘‘हो का ? अहो मी नेमकी पुण्याला गेलेली दिड महिना पुण्यात होते. अविचे बाबा तिकडे असतात ना, बर मग येते मग, त्याच्याबद्दल काही कळलं, पत्र वगैरे काही आलं तर कळवा मला.’’
‘‘हो बाई’’
बाईंना कृष्णा नेमका कुठे गेला काही कळेना. त्यांनी नारायण मंदिराकडील शाखेच्या दादाकडे चौकशी केली. त्याला पण काहीच माहित नव्हत. कृष्णा त्यालापण न सांगता गेला होता.
मालवणात जोरदार पाऊस सुरु झाला आणि शाळा सुरु झाल्या. बापट बाई अविसमवेत शाळेत जाऊ लागल्या. रोज शाळा सुरु होण्यापूर्वी त्या अविसाठी नाश्ता आणत तशा अजून एक कृष्णासाठीपण. मग त्यांच्या लक्षात यायचं कृष्णा नाही येणार आता. शाळेत जाताना त्यांना नेहमी डाव्या उजव्या बाजूकडे पाहत जायची सवय. उजव्या बाजूला अवि असायचा डाव्या बाजूला कृष्णा. पण आता डाव्या बाजूला कोणीच नसायचं. फोकांड्याच्या पिंपळाकडे त्यांच लक्ष जायचं. येथेच तो बासरीवाला बासर्या विकायला आलेला आणि कृष्णाची नजर बासरीवर पडलेली. त्या आठवीच्या वर्गात जायच्या तेव्हा पुढील दुसर्या बेंचवर त्यांच लक्ष जायचं. तिथे दुसराच मुलगा बसलेला असायचा.
कृष्णा एखादं पोस्टकार्ड पाठवेल म्हणून बाई वाट पाहत असायच्या. पण कृष्णाचं कार्ड, पाकिट काही आलचं नाही. बाईच्या तब्येतीच्या तक्रारी सुरु झाल्या. मधुमेह कमी अधिक होणे, ब्लडप्रेशर सतत वर, चिडचीड सुरु झाली. शेवटी अविच्या बाबांनी त्यांना नोकरीचा राजीनामा द्यायला सांगितला आणि दिवाळीच्या सुमारास बापट बाईंनी नोकरीचा राजीनामा दिला आणि अवि आणि त्या पुण्याला आल्या. पुण्यात आल्यानंतर चांगल्या हॉस्पिटलमधून तपासणी करुन बाईंना थोड बरं वाटलं. आता बापट बाई सकाळीची योगासनं, हास्यक्लब, चालणं, दुपारचा आराम, संध्याकाळी नाटक, सिनेमा, गाण्याचा कार्यक्रम, महिला मंडळ यात रमू लागल्या.
वीस वर्षानंतर….
अविचे बाबा बँकेतून निवृत्त झाले. अविने अमेरिकेत एम.एस. केलं आणि आता तो तिकडेच नोकरी करतोय. अजून तो अविवाहित आहे. वर्षातून एकदा तो भारतात येतो. बापट बाई त्याच्या लग्नासाठी मागे लागल्या पण तो हसण्यावरी नेतो. बापट बाईंची तब्येत मात्र फारशी चांगली नाही. तरुणपणी मधुमेह जडल्याने त्या एवढ्यात थकल्या. ब्लड प्रेशर सतत वर खाली होण, धाप लागणं, झोप न लागणं अशा सतत तक्रारी सुरु झाल्या. दिवसाला १५-१६ गोळ्या, श्वासासाठी इनहेलर सुरु होतं. त्यात त्यांना नैराश्याने पकडलं होतं. कशातही लक्ष लागत नव्हतं. अधून मधून त्यांना मालवण शाळेचे दिवस आठवत. आयुष्यात मनापासून रमेल ते मालवणातच असे त्यांना वाटे. असच एका संध्याकाळी बापट आणि बापट बाई बागेत फेर्या मारत होते. फेर्या मारता मारता बापट बाई खाली बसल्या आणि धापा घालू लागल्या. बापट बाईंना उठताच येईना. बापटांनी तिथल्या माळ्याला बोलावून बाईंना रिक्षात घातले आणि हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले. हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या झाल्या. डॉक्टरनी एन्जीओग्राफी करण्याचा निर्णय घेतला. एन्जीओग्राफी नंतर लक्षात आले हृदयात नव्वद टक्के ब्लॉकेजीस आहेत त्यामुळे ओपन हार्ट सर्जरी करावी लागेल.
बापट काळजीत पडले. मुलगा अमेरिकेत पण बापटांची बहिण पुण्यातच होती. भाचा भाची म्हणाले – मामा घाबरु नको. आम्ही येथेच आहोत, ऑपरेशन करुन घेऊया. हॉस्पिटलमधील डॉक्टरनी सर्व तयारी केली. ऑपरेशन करण्यासाठी बाहेरुन तज्ज्ञ डॉक्टर येणार होते. त्या डॉक्टरना बाईंचे सर्व रिपोर्ट पाठवले गेले. एन्जीओग्राफीचा रिपोर्ट पाहून डॉक्टरनी ऑपरेशन करण्याची तयारी दाखवली.
पंधरा ऑगस्ट हा ऑपरेशनचा दिवस ठरला. सकाळी सात वाजता ऑपरेशन सुरु होणार होते. आदल्या दिवशी पुन्हा एकदा बापट बाईंची सर्व तपासणी करुन रिपोर्ट ऑपरेशन करणार्या डॉक्टरना पाठविले गेले. सकाळी सहा वाजता डॉक्टर आले. त्यांना या हॉस्पिटलमधील डॉ. जयश्री रानडे मदत करणार होत्या. डॉक्टर आल्या आल्या डॉ. रानडे यांच्या केबिनमध्ये गेले. आपल्या बॅगमधून डॉक्टरनी एक लहानसा फोटो काढला आणि टेबलावर ठेवला. डॉ. रानडेंना माहित होते की, हे डॉक्टर जेव्हा जेव्हा ऑपरेशन करायला येतात तेव्हा हा फोटो नेहमी काढून टेबलावर ठेवतात, त्याला नमस्कार करता आणि मगच ऑपरेशन सुरु करतात.
सर्व तयारी झाल्यानंतर तज्ज्ञ डॉक्टर, डॉ. रानडे आणि नर्स स्टाफ ऑपरेशन थिएटरमध्ये आले. ऑपरेशन सुरु करण्याआधी डॉक्टरनी सहज बेशुध्द पेशन्टच्या चेहर्याकडे पाहिले आणि ते दचकले. त्यांनी पेशंटच्या रिपोर्टवरचे नाव पाहिले. त्यांच्या चेहर्यावरचे भाव भराभर बदलत गेले. डॉक्टरनी एक मिनिट डोळे मिटले. कसलेचे ध्यान केले आणि ऑपरेशन करायला सुरुवात केली. डॉ. रानडे सोबत होत्याच. त्यांनी पाहिले आज या डॉक्टरांचे हात थरथरत आहेत. डॉ. रानडेंनी या डॉक्टरांच्या हाताला हळूच टोचले. सावध केले. डॉ. रानडे विचार करायला लागल्या नेहमी सफाईने ऑपरेशनची सुरुवात करणारे हे डॉक्टर आज असे नर्व्हस का झाले ? पण लगेचच डॉक्टर सावरले आणि त्यांनी नेहमीप्रमाणे सफाईदार ऑपरेशन केले.
सुमारे पाच तासानंतर सर्व ऑपरेशन मनासारखे झाले. आणि अत्यंत समाधानाने सर्व डॉक्टर्स बाहेर आले. डॉ. रानडेंच्या केबिनमध्ये आल्यावर ऑपरेशन केलेल्या डॉक्टरनी छोटा फोटो बॅगेत ठेवला आणि ते पेशंटच्या नातेवाईकांना भेटायला गेले. डॉ. रानडे पाहत होत्या. हे डॉक्टर स्वतः पेशन्टच्या नातेवाईकांना कधी भेटत नाहीत पण आज कसे काय? याचे आश्चर्य वाटत असताना डॉक्टर बापट काकांकडे गेले आणि त्यांच्या हातावर थोपटत थोपटत ऑपरेशन छान झाले कसलीच काळजी करु नका, पंधरा दिवस त्या फक्त हॉस्पिटलमध्ये राहतील असे सांगून त्यांची काळजी कमी केली.
आय.सी.यु.मधील उत्तम उपचार, फिजीओ उपचार, औषधे यांनी बापट बाईंना बरं वाटायला लागलं. आठ दिवसांनी आय.सी.यु. मधून बाहेर काढून त्यांना स्पेशल रुममध्ये घेतले. आता स्वतः बापट किंवा बापटांची बहिण, भाचरे सर्वजण बाईंना भेटू लागले. अमेरिकेहून अविचा रोज व्हिडीओ कॉल येत होता. ऑपरेशनला जवळ जवळ पंधरा दिवस झाले आणि बापट बाईंची तब्येत व्यवस्थित दिसू लागली. त्यांच्या छातीतील दुखणे कमी झाले. श्वासोश्वास व्यवस्थित चालू झाला. शुगर कंट्रोलमध्ये आली. ब्लडप्रेशर नॉर्मल झाले. बापट बाईंनी थोडा थोडा चालण्याचा व्यायाम सुरु केला आणि शेवटी बापट बाईंच्या डिस्चार्जचा दिवस उजाडला. सोमवार ८ सप्टेंबर रोजी बापट बाईंना डिस्चार्ज मिळणार होता. ऑपरेशन करणार्या डॉक्टरांचे रोज हॉस्पिटलमध्ये फोन येत होते. बापट बाईंची विचारपूस करत असताना त्यांना सोमवारी डिस्चार्ज मिळणार हे कळताच, मी सोमवारी संध्याकाळी पाच वाजता येतो आहे, मी पेशंटला तपासतो आणि मगच डिस्चार्ज द्या असा डॉक्टरांचा निरोप आला.
बासरी क्रमश: ४
© श्री प्रदीप केळुसकर
मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈