श्री मकरंद पिंपुटकर

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ अमूल डेअरी, न्यूझीलंड आणि – I too had a dream… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

“मॅडम, थोडं स्पष्ट बोलतो, राग मानू नका. पण सगळे हिंदुस्तानी एकाच वेळी जर हिंद महासागरात नुसते थुंकले जरी ना, तरी तुमचं अख्खं न्यूझीलंड पाण्यात बुडून जाईल. हे ध्यानात ठेवा आणि आम्ही काय करायचं आणि काय नाही, हा शहाणपणा आम्हाला शिकवू नका.” 

न्यूझीलंडच्या एका राजनैतिक अधिकाऱ्याला, बहुधा प्रत्यक्ष राजदूताला हे परखड बोल सुनावले होते अमूलचे तत्कालीन सर्वेसर्वा डॉ. व्हर्गीस कुरियन यांनी… 

प्रसंग होता दिल्लीतील एका कार्यक्रमातील… 

कुरियन यांनी तेव्हा नुकतीच अमूलची सूत्रे हाती घेतली होती, आणि जास्तीत जास्त दुधावर प्रक्रिया (milk processing) करण्यासाठी ते धडाक्यात कामाला लागले होते. स्वाभाविकच, भारत आणि भारतीय ज्यांच्या उत्पादनांची मोठी बाजारपेठ होती, अशा बड्या देशांच्या पोटात दुखू लागलं होतं. 

त्या संदर्भातच, कोणी न विचारताच, न्यूझीलंडच्या एका अधिकारी महिलेने, कुरियन यांना अनाहुत सल्ला दिला होता – ” भारतासारख्या देशाने दुग्ध प्रक्रियेसारख्या तांत्रिक आणि किचकट क्षेत्रात शिरण्याचे दु:साहस करू नये. स्वित्झर्लंड, न्यूझीलंडसारख्या तज्ञ मंडळींकडे ही जबाबदारी सोपवलेली आहे आणि ती निभावण्यास तेच समर्थ आहेत.”

कुरियन यांची सहनशक्ती संपली आणि त्यांनी त्या महिलेला तडकाफडकी सुनावले. 

हे असं सुनावणं ही सोपी गोष्ट नव्हती.

न्यूझीलंड त्याकाळी दुग्ध  उत्पादन व दुग्ध प्रक्रिया क्षेत्रात अव्वल होता. त्यांचे तंत्रज्ञान अद्ययावत होते. उत्पादन, प्रक्रिया आणि तंत्रज्ञान या सगळ्याच क्षेत्रांत भारताचे स्थान कुठेच नव्हते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताला दुधाची भुकटी (milk powder) पुरवणाऱ्या देशात न्यूझीलंड अग्रेसर होता. 

उन्हाळ्यात, जेव्हा दुधाचे उत्पादन कमी झालेले असते, तेव्हा दुधाची कमतरता भासू नये म्हणून, भारतातील अनेक राज्यांत दुधापासून मिठाई बनवण्याला कायद्याने मनाई होती, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात दूध पाठवण्यास मनाई होती. 

न्यूझीलंडची तांत्रिक श्रेष्ठता वादातीत होती. स्वतः कुरियन कॉमनवेल्थ देशांतील कोलंबो प्लॅन शिष्यवृत्ती अंतर्गत न्यूझीलंड येथील मॅस्सी विद्यापीठात  Plant Design and Dairy Engineering  शिकले होते.

या पार्श्वभूमीवर अशा दादा देशाला ललकारणं हा कदाचित निव्वळ वेडेपणाच होता. 

पण कुरियन यांनी हे आव्हान स्वीकारले. ” एक दिवस असा येईल की भारत न्यूझीलंडला दुग्धजन्य पदार्थ निर्यात करेल,” आपल्या ” I, too, had a dream ” असे या आत्मचरित्रात ते लिहून ठेवतात.

कुरियन निव्वळ दिवास्वप्नं पाहणारे नव्हते. बोलून मग – “अरे बापरे, हे मी काय बोलून बसलो ?” – असा विचार करणारे नव्हते, विचार करून बोलणारे होते. ते कामाला लागले.

१९७० साली भारतात ‘Operation Flood – white revolution ‘ – दुग्धक्रांती – सुरू झालं. भारतातील दूध आणि प्रक्रिया केलेले दुधाचे पदार्थ यांचे उत्पादन लक्षणीयरीत्या वाढू लागलं. 

दुधासाठी आयातीवर अवलंबून असलेला भारत, आता नुसता स्वयंपूर्ण झाला नव्हता, तर जगात सर्वात जास्त दूध निर्माण करणारा देश झाला होता, दूध उत्पादने निर्यात करणारा देश झाला होता.

— आणि २००९ साली, भारताने न्यूझीलंडला दुग्धजन्य पदार्थ निर्यात करायला सुरुवात केली. 

दुग्ध प्रक्रिया ही आता न्यूझीलंडची मक्तेदारी राहिली नव्हती. 

कुरियन यांनी पाहिलेले हे स्वप्न, त्यांच्या हयातीतच, पूर्ण झाले होते.

ता. क.:  २०१७ साली, आपले “अमूल” न्यूझीलंडच्या क्रिकेट संघाचे प्रमुख पुरस्कर्ते (sponsorer) झाले. “Third world country आहात, दुग्ध प्रक्रियेच्या नादी लागू नका” असं ज्या न्यूझीलंडने भारताला सांगितलं, त्याच भारताच्या “अमूल” चा लोगो न्यूझीलंडच्या खेळाडूंच्या T Shirt वर अभिमानाने झळकू लागला. अमूलच्या श्रेष्ठतेवर शिक्कामोर्तब झालं.

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments