सौ. पुष्पा चिंतामण जोशी
इंद्रधनुष्य
☆ डॉक्टर रखमाबाई ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
भारतातील पहिल्या स्त्री डॉक्टर हा मान निश्चितच डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचा आहे .दुर्दैवाने डॉक्टर आनंदीबाई जोशी भारतात परतल्यावर आजारी पडल्या व मृत्यू पावल्या .भारतातील पहिली व्यावसायिक स्त्री डॉक्टर म्हणून डॉक्टर रखमाबाईंची इतिहासात नोंद आहे.
रखमाबाईंचा जन्म २२ नोव्हेंबर १८६४ रोजी झाला. रखमाबाईंच्या जन्मानंतर अल्पावधीतच त्यांचे वडील जनार्दन सावे यांचा काविळीने मृत्यू झाला . रखमाबाईंचे आजोबा हरिश्चंद्र चौधरी हे बांधकाम कंत्राटदार होते. आधुनिक विचारांचे असल्यामुळे, समाजविरोधात जाऊन त्यांनी रखमाबाईंच्या आईचा म्हणजे जयंतीबाईंचा पुनर्विवाह केला. सापत्य विधवेचा विधुरासोबत पुनर्विवाह हा त्या काळातील एक धाडसी निर्णय होता. जयंतीबाईंचे दुसरे पती म्हणजे डॉक्टर सखाराम अर्जुन राऊत. डॉक्टर सखाराम अर्जुन हे जे.जे. हॉस्पिटलमध्ये असिस्टंट सर्जन होते. बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीचे ते संस्थापक सदस्य होते. त्यांच्या घराण्यावर सत्यशोधक विचारांचा पगडा होता. कुशाग्र बुद्धिमत्तेच्या रखमाबाईंनी डॉक्टर सखाराम अर्जुन या आपल्या दुसऱ्या पित्याचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगले.
जयंतीबाईंच्या आग्रहामुळे रखमाबाईंचा विवाह अकराव्या वर्षी दादाजी नावाच्या एका नात्यातील मुलाशी करून दिला. विवाहानंतरही रखमाबाई माहेरी राहून शिकत होत्या. त्यांचे विचार प्रगल्भ होत होते.
दादाजींनी सन १८८४ मध्ये, रखमाबाई या लग्न होऊनही नांदायला येत नाहीत यासाठी बॉम्बे हायकोर्टात न्यायमूर्ती पिन्हे यांच्यासमोर कायदेशीर फिर्याद दाखल केली होती. सुशिक्षित, सुसंस्कृत, तडफदार रखमाबाईंनी न्यायमूर्ती पिन्हे यांच्यासमोर स्पष्ट निवेदन केले .त्या म्हणाल्या, ‘अजाणत्या वयात, माझी संमती न घेता हे लग्न लावण्यात आले आहे. अशिक्षीत ,सतत आजारी असलेला, स्वतःचे उत्पन्न नसलेला, मामावर अवलंबून असलेला असा हा पती माझे पालन पोषण करण्यास असमर्थ आहे. त्याच्याविषयी मला जवळीक वाटत नाही. नवरा म्हणून त्याला स्वीकारणे मला मान्य नाही.’
सर्व बाजूंनी सारासार विचार करून न्यायमूर्ती पिन्हे यांनी रखमाबाईंच्या बाजूने निर्णय दिला. ‘बालवयात लग्न झालेली मुलगी आता सज्ञान झाली आहे. निर्णय घेण्याची क्षमता तिच्यात आली आहे. चांगले आणि वाईट याची जाणीव झालेल्या स्त्रीला नवऱ्याकडे पाठविण्याची सक्ती करणे रानटीपणाचे ठरेल असे मला वाटते.’ असे मत त्यांनी व्यक्त केले.
या निकालामुळे रखमाबाई आणि न्यायमूर्ती पिन्हे यांच्यावर टीकेची झोड उठली. हा निकाल आमच्या हिंदू धर्मशास्त्राच्या विरुद्ध आहे. समाजजीवनास घातक आहे. लग्नासाठी हिंदू लोकांना स्त्रियांची संमती आवश्यक नाही. अशी जहरी टीका स्वतःला समाज सुधारक म्हणविणाऱ्या अनेकांनी केली. खटल्याचा निकाल रखमाबाईंच्या बाजूने लागल्याने अस्वस्थ झालेल्या दादाजींनी या निकालाच्या फेर सुनावणीसाठी अपील केले. त्यांना धर्ममार्तंडांची साथ होती. शिवाय दादाजींना रखमाबाईंच्या नावे असलेल्या पंचवीस हजार रुपयांचा लोभ होता.
रखमाबाईंना साथ देण्यासाठी पंडिता रमाबाई व इतर अनेक विचारवंत, समाजसुधारक यांच्या पुढाकाराने ‘हिंदू लेडी संरक्षण समिती’ची स्थापना करण्यात आली. रखमाबाईंनी टाईम्स ऑफ इंडियामध्ये ‘हिंदू लेडी’ या नावाने पत्रे लिहून हिंदू धर्मातील अमानुष चालीरीतींवर घणाघात केला. बालविवाह, सतीची पद्धत, स्त्रियांना दिली जाणारी अपमानास्पद वागणूक यावर लेख लिहिले. पती मेल्यानंतर स्त्रीने सती जावे असे म्हणणारा समाज, पत्नी मेल्यावर पुरुषांना पत्नीसोबत ‘सता’ म्हणून का पाठवत नाही? असे त्यांनी लिहिले. हा प्रश्न धर्ममार्तंडांच्या जिव्हारी झोंबला .मृत्यू पावलेल्या पत्नीच्या तेराव्याच्या आधीच दुसरे लग्न करून मोकळे होणारे पुरुष यांना एक न्याय आणि स्त्रियांना वेगळा न्याय असे का? स्त्रीला जाचक ठरणारे हे कायदे कोणी केले? असा चौफेर हल्ला त्यांनी समाजावर, पुरुषी व्यवस्थेवर केला. हा शंभर वर्षांपूर्वीचा कालखंड आहे हे लक्षात घेतले म्हणजे रखमाबाईंनी दिलेल्या लढ्याचे महत्त्व लक्षात येते.
इंग्रजांना येथील धर्म, कायदे यांना धक्का लावायचा नव्हता. ते मतलबी, व्यापारीवृत्तीचे होते. त्यांनी राजकीय स्वार्थ साधला. अपिलीय खटल्यात न्यायमूर्ती फॅरन यांनी, ‘रखमाबाईंनी एक महिन्याच्या आत पतीच्या घरी नांदायला जावे नाही तर न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा भोगावी’ असा रखमाबाईंच्या विरोधात निकाल दिला. रखमाबाईंनी या अन्यायकारक निकालाला निक्षून नकार दिला आणि तुरुंगवास भोगण्याची तयारी दाखविली.
दादाजी व त्यांचे मामा यांच्या उलट तपासणीत, दादाजी हे कुठल्याही प्रकारे रखमाबाईंसाठी योग्य नाहीत हे कोर्टाच्या लक्षात आले. तेव्हा दादाजींनी रखमाबाईंना तडजोड करण्याची विनंती केली. दादाजींनी रखमाबाईंवरचा हक्क सोडावा आणि रखमाबाईंनी दादाजींना दोन हजार रुपये द्यावेत अशी तडजोड झाली. तसेही दादाजींना रखमाबाईंच्या संपत्तीमध्येच स्वारस्य होते. तडजोडीनंतर दादाजींनी लगेच दुसरे लग्न केले. हा खटला १८८७ मध्ये संपुष्टात आला.
नको असलेल्या विवाहातून रखमाबाई मुक्त झाल्या त्यावेळी त्या फक्त २२ वर्षांच्या होत्या. त्यांच्यावरील खटल्याच्या वेळी डॉक्टर एडिथ पिची आणि फिप्सन पिची यांनी रखमाबाईंना शेवटपर्यंत साथ दिली होती. डॉक्टर एडिथ १८८३ मध्ये मुंबईला कामा हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून रुजू झाल्या होत्या. डॉक्टर सखाराम अर्जुन यांच्या त्या सहकारी होत्या. त्यांचे पती फिप्सन स्त्रियांच्या आरोग्यासाठी स्थापन केलेल्या डफरीन फंडाचे सचिव होते .या पती-पत्नींच्या प्रयत्नामुळे डफरीन फंडातून रखमाबाईंना आर्थिक मदत मिळाली. याच पती-पत्नीने रखमाबाईंना इंग्लंडमध्ये राहण्यासाठी मॅक्लेरन दांपत्याचे पालकत्व मिळवून दिले. रखमाबाई १८८९ मध्ये वैद्यकशास्त्राच्या अभ्यासासाठी इंग्लंडला गेल्या.१८९४ मध्ये प्रसूती शास्त्र व शस्त्रक्रिया या परीक्षेत ऑनर्स पदवी मिळवून सन्मानाने भारतात परतल्या.
काही दिवस कामा हॉस्पिटलमध्ये सर्जन म्हणून काम केल्यावर त्या सुरत इथे गेल्या. त्यावेळी सुरतमध्ये प्लेग व दुष्काळ यांनी थैमान घातले होते. या प्लेगच्या साथीमध्ये त्यांनी रात्रंदिवस काम केले. तेथील स्त्रियांची मागास स्थिती सुधारण्यासाठी, बाळंतपणात होणारे मृत्यू रोखण्यासाठी रखमाबाईंनी खूप प्रयत्न केले .स्त्री शिक्षणासाठी ‘वनिता आश्रम’ ची स्थापना केली. १९१७ मध्ये निवृत्त झाल्यावर त्यांनी राजकोट येथील जनाना हॉस्पिटलची जबाबदारी स्वीकारली. सौराष्ट्र व कच्छ प्रांताच्या त्या पहिल्या महिला प्रमुख डॉक्टर होत्या. त्यांनी भारतात रेडक्रॉस सोसायटीची स्थापना केली. आजन्म अविवाहित राहिल्या. महायुद्धाच्या काळात जखमी सैनिकांची शुश्रुषा केली.
रखमाबाईंच्या सुरत सेवेबद्दल शासनाने ‘कैसर ए हिंद ‘अशी पदवी त्यांना दिली. रेड क्रॉस सोसायटीने पदक देऊन त्यांचा सन्मान केला. वयाच्या ९१ व्या वर्षापर्यंत त्या कार्यरत होत्या.२५ डिसेंबर १९५५ रोजी त्या देवत्वात विलीन झाल्या.
प्रतिकूल परिस्थितीमध्ये माणूस म्हणून स्वतःचे अधिकार मिळविण्यासाठी कसा संघर्ष करायचा याचे उत्तम उदाहरण रखमाबाईंनी घालून दिले. आज २१ व्या शतकातही स्त्रीबद्दलचा दृष्टिकोन फारसा बदललेला नाही फक्त त्याची तीव्रता कमी झाली आहे. स्त्रीभ्रूण हत्या, स्त्रियांवरील अत्याचार, स्त्री-पुरुष असमानता या गोष्टी साऱ्या जगभर आहेत. समाज रुढी म्हणून किंवा आर्थिक परिस्थितीमुळे आपल्याकडे अजूनही बालविवाह होतातच. शंभराहून अधिक वर्षांपूर्वीच्या त्या कठीण काळात, नको असलेल्या बालविवाहाचे संकट रखमाबाईंनी निग्रहाने परतवून लावले .रखमाबाईंचा एकाकी लढा हा निश्चितच प्रेरणादायी, स्फूर्तीदायी आहे. रखमाबाईंनी इतिहास घडविला. त्यांना विनम्र प्रणाम.👏
© सौ. पुष्पा चिंतामण जोशी
जोगेश्वरी पूर्व, मुंबई
9987151890
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈