सुश्री सुलू साबणे जोशी
इंद्रधनुष्य
☆ “’रम डे’ ची कथा” ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆
एवढा धो धो पाऊस पडतोय. अशा वेळेस दोनच गोष्टींची निवड करणे शक्य असते – एक म्हणजे पुस्तक-वाचन आणि दुसरी म्हणजे अपेयपान !
अशा पावसात अस्सल दर्दी माणसाला व्हिस्की, बीअर, व्होडका, वाईन यातील कुठलेच पेय लागत नाही. या अस्सल दर्दी माणसाची पसंती असते एकाच पेयाला – ते म्हणजे – रम ! हा परिचित ब्रँड तुमच्या जमान्यातला असेल, पण ही ‘रम’ ब्रिटिश जमान्यात मुंबईत बनत होती, हे तुम्हाला माहीत नसेल. आज तीच कथा मी तुम्हाला सांगणार आहे.
१८५३ साली पहिली आगगाडी व्हिक्टोरिया टर्मिनसवरून निघाली. तेव्हा पुढचं स्टेशन होतं – भायखळा. दादर नव्हतं, कुर्ला नव्हतं, मुलुंड नव्हतं, पण एक स्टेशन होतं, ते म्हणजे भांडुप ! आश्चर्याचा धक्का बसेल, पण बाकी कुठलंही स्टेशन नव्हतं.
आता भांडुप स्टेशन असण्याचं कारण काय? कारण फार गंमतीदार आहे. भांडुपला गाडी थांबली, तर बरेचसे गोरे भांडुपला उतरले आणि तिथे गावात जाऊन चार-पाच पेग रम मारली आणि परत गाडीत येऊन बसले. तेव्हा भांडुपची लोकसंख्या असून असून किती असणार? तर तीनशे, चारशे… कारण १८८१ साली जेव्हा जनगणना झाली, तेव्हा भांडुपची लोकसंख्या होती – जेमतेम पाचशे चव्वेचाळीस ! आता एवढ्या छोट्या गावात तेव्हा रम कशी बनवली जायची? ….
त्याचं झालं असं – मुंबई जेव्हा ब्रिटीशांच्या ताब्यात आली, तेव्हा त्यांनी ल्यूक ॲशबर्नर नावाच्या माणसाला भांडुप हे गाव नाममात्र भाड्याने दिले. हा ल्यूक ॲशबर्नर ‘ बॉम्बे कुरियर ‘ नावाच्या वर्तमानपत्राचा संपादक होता. त्याला सांगितलं गेलं की, ‘ तू वर्तमानपत्र पण सांभाळायचं आणि इथे रम पण बनवायची.’ तो काय करणार बिचारा? तो अग्रलेख लिहिणार की रम बनवणार? मग त्याने एक युक्ती केली. त्याचा कावसजी नावाचा मॅनेजर होता. त्यानं त्याच्या हाती कारभार सोपवला आणि त्याला सांगितलं की, ‘ रम बनवणे तुझं काम आहे.’
तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की, त्या काळी साडेचार लाख लिटर रम बनवली जायची आणि आख्ख्या भारतभर ब्रिटिश सैनिकांना पुरवली जायची. त्याच्यानंतर गंमत काय झाली की, मॉरिशसला स्वस्त रम तयार व्हायला लागली आणि मग भांडुपचा ‘रम’चा धंदा बंद करावा लागला . ‘बॉम्बे गॅझेटियर’च्या चव्वेचाळीसाव्या पानावर ल्यूक ॲशबर्नरच्या नावासकट ही माहिती उपलब्ध आहे.
आता ही सगळी माहिती आम्हाला कुठून मिळाली? तर आमचे एक मित्र आहेत – श्री. माधव शिरवळकर. त्यांनी ” मुंबई ब्रिटिशांची होती तेव्हा…” या नावाचे पुस्तक लिहिले. त्यात अशा अनेक गंमतीजमती आम्हाला वाचायला मिळाल्या. तेव्हा आज आपल्याला माधव शिरवळकरांचेही आभार मानलेच पाहिजेत. त्यांचे हे पुस्तक आपण जरूर वाचा.
तोवर ….. “ चीअर्स ! “
लेखक : अज्ञात.
(https://www.instagram.com/p/Cuej5u-NBh-/) – या सूत्रधाग्यावरून (link) साभार.
संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी
मो – 9421053591
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈