श्री राजीव गजानन पुजारी

? इंद्रधनुष्य ?

‘मिसाईल मॅन’ ए.पी.जे.अब्दुल कलाम ☆ श्री राजीव गजानन पुजारी

आज २७ जुलै – आपले माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा स्मृतिदिन.  

… “यशस्वी होण्याचा माझा निर्धार पुरेसा मजबूत असेल तर अपयश कधीही माझ्या आड येणार नाही” – असा आत्मविश्वास बाळगणारे आणि तो खरा करून दाखवणारे कलामसर, म्हणजे ही मोलाची शिकवण जणू संपूर्ण देशालाच देणारे एक अद्वितीय व्यक्तिमत्व. 

ए.पी.जे. अब्दुल कलाम भारताचे ११ वे राष्ट्रपती होते. त्यांचा जन्म तत्कालीन मद्रास इलाख्यातील रामेश्वरम येथे १५ ऑक्टोबर १९३१ रोजी झाला. त्यांचे पूर्ण नाव अवूल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम होते. त्यांच्या वडिलांचे नाव जैनुलाब्दिन होते, जे  एक नावाडी असून इमाम म्हणून देखील ते काम बघत. त्यांच्या आईचे नाव आशीअम्मा होते. त्या एक गृहिणी होत्या. कलाम यांना चार भाऊ व एक बहीण होते. सर्व भावंडांमध्ये कलाम हे शेंडेफळ होते.

कलामांचे पूर्वज श्रीमंत व्यापारी होते, पण कालौघात त्या कुटुंबावर कठीण परिस्थिती आली होती. अब्दुल कलाम लहानपणी वृत्तपत्रे विकून कुटुंबाच्या माफक उत्पन्नात भर घालायचे हे आवर्जून सांगण्यासारखे आहे. 

कलाम यांनी रामनाथपुरम् येथे शालेय शिक्षण घेतले आणि सेंट जोसेफ कॉलेज तिरुचिरापल्ली येथून भौतिकशास्त्राची पदवी संपादन केली. १९५५ मध्ये ते एरोस्पेस अभियांत्रिकी करण्यासाठी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये गेले. फायटर पायलट होण्याचे त्यांचे स्वप्न पात्रता फेरीत अगदी काही गुणांनी भंग पावले. ते नवव्या क्रमांकावर होते. पण आय.ए.एफ. कडे फक्त आठ जागाच उपलब्ध होत्या. त्यानंतर त्यांना संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या(DRDO) एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट मध्ये शास्त्रज्ञ म्हणून नोकरी मिळाली. त्यांनी प्रख्यात शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या हाताखाली काम केले. 

१९६९ मध्ये कलाम यांची बदली भारतीय अंतराळ संशोधन संस्था-इस्रो मध्ये करण्यात आली. इस्रोमध्ये ते एस.एल.व्ही. या उपग्रह प्रक्षेपण वाहनाचे प्रकल्प संचालक होते. एस एल व्ही प्रक्षेपकाने १९८० मध्ये रोहिणी उपग्रह यशस्वीरित्या पृथ्वीच्या कक्षेत प्रस्थापित केला. एस एल व्ही हा भारताचा पहिला प्रक्षेपक होता. कलाम यांनी ध्रुवीय प्रक्षेपण वाहन (PSLV) विकसित करण्यासाठीही काम केले. एसएलव्ही तंत्रज्ञानातून बॅलॅस्टिक क्षेपणास्त्रे विकसित करण्यासाठीच्या प्रोजेक्ट व्हॅलीअंट आणि प्रोजेक्ट डेव्हिल या दोन प्रकल्पांचे ते संचालक देखील होते. त्यांच्या संशोधन आणि नेतृत्वगुणांमुळे त्यांना प्रगत क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचे संचालकपद मिळाले. आर्. वेंकटरमन संरक्षण मंत्री असताना कलाम यांची क्षेपणास्त्रांचा ताफा विकसित करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या एकात्मिक मार्गदर्शित क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे मुख्य कार्यकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. ‘ बेलास्टिक ‘क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये त्यांनी दिलेल्या योगदानामुळे, तेव्हापासूनच त्यांना ‘मिसाईल मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाऊ  लागले होते.

१९९२ ते १९९९ पर्यंत कलाम हे पंतप्रधानांचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार आणि डीआरडीओ चे सचिव होते. पोखरण-२ चाचण्यांदरम्यान कलाम हे मुख्य प्रकल्प समन्वयक होते. याच काळात कलाम भारतातील  आघाडीचे शास्त्रज्ञ म्हणून नावारूपाला आले.

२००२ मध्ये अब्दुल कलाम यांची भारताची ११ वे राष्ट्रपती म्हणून निवड झाली. भारताचे राष्ट्रपती बनणारे ते पहिले शास्त्रज्ञ होते. २००७ पर्यंतचा राष्ट्रपती म्हणून त्यांचा कार्यकाळ देशासाठी महत्त्वाचा ठरला. लोकांमध्ये, विशेषतः शाळकरी मुलांमध्ये ते फार लोकप्रिय ठरले, इतके की त्यांना ‘पीपल्स प्रेसिडेंट’ म्हटले जाऊ लागले. त्यांनी देशाच्या अनेक भागांना भेटी दिल्या. त्यांची भाषणे, त्यात असणाऱ्या प्रेरणादायी विचारांमुळे लोकप्रिय ठरली. राष्ट्रपतीपदासाठी दुसऱ्यांदा उमेदवारी मिळावी म्हणून लोकांचा दबाव  असतांनाही त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला.

राष्ट्रपतीपदानंतर कलाम आय.आय.एम.- अहमदाबाद, आय.आय.एम.-शिलॉंग, आय.आय.एम.- इंदूर,  इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर, अण्णा विद्यापीठ, आदींमध्ये व्हिजिटिंग प्रोफेसर बनले.

२७ जुलै २०१५ रोजी आय.आय.एम.- शिलॉंग येथे व्याख्यान देत असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या मूळ गावी, रामेश्वरम् येथे पूर्ण शासकीय इतमामाने आणि अतिशय सन्मानाने त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आला. 

अब्दुल कलाम हे त्यांच्या सचोटी व प्रामाणिकपणासाठी ओळखले जात. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी काही पुस्तके व लॅपटॉप व्यतिरिक्त कोणतीही वैयक्तिक संपत्ती मागे सोडली नाही. ते विविध धर्माच्या शिकवणुकींचे जाणकार होते, आणि आंतरधर्मीय संवादाचे प्रतीक होते हे आवर्जून नमूद करायलाच हवे. 

त्यांनी अनेक पुस्तके लिहिली असून त्यात:

  • India-2020:A vision for the new  Millennium
  • Wings of fire
  • Ignited minds- Unleashing the power within India
  • A manifesto for change: A sequel to India 2020
  • Transcendence: My spiritual experiences with Pramukh swamiji

  — आदि पुस्तकांचा समावेश होतो.

तसेच त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यामध्ये :

  • पद्मभूषण -१९८१
  • पद्मविभुषण – १९९०
  • भारतरत्न – १९९७
  • वीर सावरकर पुरस्कार – १९९८
  • रॉयल सोसायटी, इंग्लंड यांचेकडून दिला जाणारा किंग चार्ल्सII पदक – २००७
  • इडिनबर्ग युनिव्हर्सिटी, इंग्लंड यांचेकडून डॉक्टर ऑफ सायन्स – २०१४

  —– आदि पुरस्कारांचा समावेश होतो.

आजच्या त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना अतिशय आदरपूर्वक प्रणाम. 

© श्री राजीव गजानन पुजारी 

विश्रामबाग, सांगली

ईमेल – [email protected] मो. 9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments