श्री दीपक तांबोळी
जीवनरंग
☆ अल्लड… – भाग – १ ☆ श्री दीपक तांबोळी ☆
हर्षा बाहेरुन आली तेव्हा शेजारच्या अंगणात लहान मुली पत्ते खेळत बसल्या होत्या.ते बघून हर्षा लगोलग तिकडे गेली.
“काय गं मुलींनो काय खेळताय?”
“बदाम सात”एकजण उत्तरली.
“मी खेळू तुमच्यासोबत?’’
एक मोठी बाई लहान मुलींसोबत खेळणार या विचाराने त्या मुली एकमेकींकडे पाहून खुदखुदू हसल्या.पण नाही कसं म्हणायचं या विचाराने त्यातलीच एक म्हणाली,
“हो.खेळा ना”
बऱ्याच दिवसांनी पत्ते खेळायला मिळताहेत याचा हर्षाला खुप आनंद झाला. ती मग त्यांच्याजवळ मांडी घालून बसली.आपल्या पाच वर्षाच्या मुलीला,केतकीलाही तिने जवळ बसवलं.छोट्या मिहिरला मांडीवर घेतलं.
“द्या मी पत्ते पिसते” मुलींकडचे पत्ते घेऊन तिने ते पिसले आणि सर्वांना वाटले. खेळण्यात ती इतकी रंगून गेली की त्यात एक तास कसा निघून गेला तिला कळलंच नाही.मध्येच एका मुलीने पत्ते टाकतांना बदमाशी केलेली हर्षाच्या लक्षात आली तेव्हा ती रागावून म्हणाली.
“ए असं नाही चालायचं हं.असा रडीचा डाव नाही खेळायचा”
तिचा आवाज ऐकून तिची आई बाहेर आली.
“अगंबाई ,हर्षू तू इथे बसलीयेस?मला वाटलं तू मैत्रिणीकडून अजून आलीच नाहीस आणि या लहान मुलींसोबत काय खेळत बसलीयेस?”
आईच्या हाकेने ती भानावर आली.
” हो आई.येतेच.बस फक्त एक डाव.”
“अगं तू भाजी करणार होतीस ना?की मी करु?बारा वाजून गेलेत.मुलांना भुका लागल्या असतील.”
” हो आई मला भुक लागलीये”
केतकी म्हणाली तशी मोठ्या अनिच्छेने ती पत्ते खाली ठेवून उठली
” मुलींनो संध्याकाळी आपण परत खेळू बरं का!”
मुलींनी माना डोलावल्या.हर्षा मुलांना घेऊन घरात गेली.
” हर्षू लहान मुलींसोबत खेळायचं तुझं वय आहे का?अगं दोन मुलांची आई ना तू?”
निर्मलाबाई म्हणाल्या तशी ती संकोचली. काय उत्तर द्यावं तिला कळेना.मग किचनमध्ये वळता वळता म्हणाली,
“अगं बऱ्याच दिवसात पत्तेच खेळले नव्हते म्हणून बसले.आणि काय बिघडलं गं लहान मुलींसोबत खेळले तर?”
निर्मलाबाई आपल्या त्या तीस वर्षाच्या निरागस चेहऱ्याच्या मुलीकडे पाहून हसल्या.”खरोखर या पोरीचं बालपण अजून संपलेलंच नाहिये अजून “त्यांच्या मनात आलं.
“काही बिघडत नाही. पण बाहेरच्यांनी बघितलं तर काय म्हणतील?”
” म्हणू दे काय म्हणायचं ते”
हर्षा थोडी चिडूनच म्हणाली.मग तिने भाजी करायला घेतली.पंधरावीस मिनिटात भाजी करुन तिने सर्वांना वाढलं.
” व्वा छान केलीयेस गं भाजी” भाजीची चव घेतल्याबरोबर निर्मलाबाई म्हणाल्या.हर्षाने स्मित केलं पण मघाशी आई जे बोलली त्याने तिचं मन नाराज झालं होतं.तिच्या सासूबाईही तिला नेहमी हेच म्हणायच्या.”अगं हर्षू हा बालिशपणा सोड आता .तू आता दोन मुलांची आई झालीयेस” दोन वर्षांपूर्वी त्या वारल्या तेव्हाच हर्षाच्या अल्लडपणावरुनचे त्यांचे टोमणे बंद झाले.आणि आज आईने त्यावरुन तिचे कान उपटले होते.
“आज तुझ्या मैत्रिणी येणार आहेत ना तुला भेटायला?त्यांना काय करायचं खायला?” अचानक आठवण येऊन निर्मलाबाईंनी विचारलं.
“शिरा आणि भजी करेन मी. तू बस त्यांच्या सोबत गप्पा मारत”
ती रागावलीये हे निर्मलाबाईंनी ओळखलं. पण तिचं रागावणंसुध्दा तिच्या निरागस चेहऱ्यावर मोठं गोड वाटत होतं. मनाशीच हसून त्या उठल्या. जेवणाचं टेबल आणि किचनमधला पसारा भराभरा आवरुन हर्षा बेडरुममध्ये गेली. तिची मुलं हाँलमध्ये कार्टून सिरीयल बघत बसली.
बेडवर पडल्यापडल्या हर्षाच्या मनात विचार आला. ‘खरंच का आपण बालिश आहोत? लहान मुलांच्या दुनियेत आपण रमतो. त्यांच्यासारखं आपल्याला हुंदडायला आवडतं,मस्त्या करायला आवडतं. खेळायला आवडतं. फुलं,फुलपाखरं,रंगबिरंगी पक्षी बघून आपण वेडे होतो.जगात सर्वत्र आनंदच भरलाय असं आपल्याला वाटत रहातं.आपण सहसा कुणावर रागवत नाही. रागावलो तरी पटकन विसरतो. म्हणून आपण सर्वांना बालिश वाटतो?’
तिला आपले काँलेजचे दिवस आठवले.फुलपाखरासारखी ती बागडायची.सगळ्यांशी ती हसून बोलायची.सगळ्यांशी तिची मैत्री होती.मुलांशी तर जास्तच.तिच्या मैत्रिणी तिला नेहमी टोकत “हर्षू मुलांबरोबर इतकी मोकळेपणाने वागत नको जाऊ.ते तुझ्या हसण्याचा वेगळा अर्थ काढतात”
पण तिने त्यांचा सल्ला कधीच मानला नाही. तिचा सुंदर पण निरागस,बालिश चेहरा आणि त्यावरच खट्याळ हसू पाहून अनेक तरुण तिच्या प्रेमात पडायचे.तिच्या प्रेमाची मागणी करणाऱ्या अनेक चिठ्ठ्या, अनेक मेसेज तिला मोबाईलवर यायचे.पण ती सगळ्यांकडे दुर्लक्ष करायची.त्यांना ती इतक्या गोड शब्दात नकार द्यायची की तिच्याबद्दल कुणालाच आकस रहात नसे.बरेच जण तिची बेबी म्हणून हेटाळणी करायचे.काँलेजच्या गँदरींगमध्येही तिला “बेबी”नावाने बरेच फिशपाँड पडायचे. पण तिला त्याचा कधी राग आला नाही.
“आई गं मी भातुकली खेळू?”
केतकीच्या प्रश्नाने ती भानावर आली
“का गं टिव्ही बघून कंटाळा आला वाटतं?”
” हो.खेळू का?”
“खेळ.पण तुझ्याकडे सगळं सामान कुठंय?”
” ती शेजारची उत्तरा आलीये सामान घेऊन”
“मग ठिक आहे.जा खेळा”
“आई तू येतेस मांडून द्यायला?”
ते ऐकून हर्षाला एकदम उत्साह वाटू लागला.प्रफुल्लित चेहऱ्याने ती म्हणाली.
” हो.चल चल.आपण हाँलमध्येच बसू”
मग हाँलच्या एका कोपऱ्यात ती मुलींना घेऊन बसली.तीन वर्षाचा मिहिरही तिथे लुडबुड करायला लागला.हर्षा मग त्या भातुकलीच्या खेळात अशी हरवून गेली की तिला जगाचा विसर पडला.
चार वाजले आणि हाँलचा दरवाजा उघडला.तिच्या मैत्रिणी भराभर आत आल्या.हर्षाला उठून तयार व्हायला त्यांनी वेळच दिला नाही.
“अगंबाई, हर्षू अजून तू भातुकली खेळतेस?”
एक मैत्रीण म्हणाली तशा सगळ्याच जोरात हसल्या.
“नाही गं ,या मुलींना व्यवस्थित मांडून देत होते”
हर्षाने सारवासारव केली खरी पण मैत्रीणींना ते खरं वाटलं नाही हे तिच्याही ध्यानात आलं
“अगं आता तुझा स्वतःचा संसार आहे आणि तू खेळण्यातला संसार काय मांडून बसलीयेस?”
एका मैत्रिणीने परत आगाऊपणा केलाच.ते ऐकून केतकीला काय वाटलं कुणास ठाऊक ती उत्तराला म्हणाली
“उत्तरा आपण उद्या खेळू हं”
उत्तरालाही ते पटलं.तिने पटापट सगळं सामान पिशवीत जमा केलं आणि निघून गेली.हर्षा आत जाऊन मेत्रिणींसाठी पाणी घेऊन आली.
“ए काही म्हणा आपली हर्षू अजून काहीsss बदलली नाही. अजूनही तशीच बालीश वाटतेय बघा” एक मैत्रिण म्हणाली
” हो खरंच.अगदी अकरावी बारावीतली अवखळ मुलगी वाटतेय”
“तिची फिगर तर बघ.अगदी चवळीची शेंग वाटतेय.नाहीतर आपण पहा .सगळ्याजणी भोपळे झालोत”
सगळ्याजणी फिदीफिदी हसल्या.
“हो पण वयानुसार थोडं मँच्युअर्ड दिसायलाच पाहिजे ना! नाहीतर ही हर्षू.वाटते का दोन मुलांची आई आहे म्हणून?आठवतं?आपल्या काँलेजची मुलं तिला बेबी म्हणायची.ती बेबी अजून बेबीच दिसतेय “
परत एकदा सर्वजणी हसल्या.
हर्षाला खुप अवघडल्यासारखं झालं. त्या तारीफ करताहेत की टोमणे मारताहेत हे तिच्या लक्षात आलं नाही.
गप्पा सुरु झाल्या तसं हर्षाच्या लक्षात आलं की तिच्या मैत्रिणी पुर्णपणे संसारी झाल्याहेत.सासू,सासरे,नणंदा,नवरा आणि मुलं याव्यतिरिक्त त्यांचे विषय पुढे सरकत नव्हते.दोन वर्षांपूर्वी हर्षाच्या सासूबाई वारल्या.मुलांचा सांभाळ व्यवस्थित व्हावा म्हणून तिने स्वतः नोकरी सोडली आणि तीही पूर्ण वेळ संसारी बाई झाली असली तरी तिचं मन मात्र अनेक विषयावर गुंतत रहायचं.तिला इंटरेस्ट नव्हता अशी एकही गोष्ट नव्हती.तिला संगीत आवडायचं.विशेषतः सध्याच्या तरुण पीढिचं संगीत तिला खूपच आवडायचं. तिला पिक्चर बघायला आवडायचे, टिव्हीवरच्या कार्टून सिरीयल्स तर ती तिच्या मुलांसोबत आवडीने पहायची.तिला भटकायला आवडायचं. लहानमुलांचे तर सगळेच खेळ आवडायचे. असं मैत्रीणींसारखं तिचं आयुष्य एकसुरी कधीच नव्हतं.
क्रमश: – भाग 1…
© श्री दीपक तांबोळी
जळगांव
मो – 9503011250
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈