श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ अल्लड… – भाग – २ ☆ श्री दीपक तांबोळी

(मागील भागात आपण पहिले, – तिला भटकायला आवडायचं. लहानमुलांचे तर सगळेच खेळ आवडायचे. असं मैत्रीणींसारखं तिचं आयुष्य एकसुरी कधीच नव्हतं. –  आताइथून पुढे)

” काय म्हणतात आमचे जिजू?” एकीने विचारलं

“मजेत आहेत ” हर्षा उत्तरली ” सध्या फ्रान्सला गेलेत कंपनीच्या कामासाठी.म्हणून तर मी इकडे आले.दादा ,वहिनी आणि मुलांना घेऊन लग्नाला गेलाय.आई घरी एकटीच होती.म्हणून म्हंटलं आईलाही कंपनी आणि मुलंही बरेच दिवसात आजीला भेटली नव्हती.म्हणून मग आले इकडे”

” तुझ्या नवऱ्याला तुझा हा बालीशपणा आवडतो का गं?” दुसरीने टोचलं.हर्षाला जरा तिचा रागच आला पण तिला हे ही जाणवलं की प्रणव कधी तिला याबाबत बोलला नव्हता.वास्तविक ही जितकी चंचल,अवखळ तितकाच तो गंभीर आणि अबोल होता.तिच्या सासुबाईंनी तिच्या बालीशपणाबद्दल त्याचे कान नक्कीच भरले असतील पण त्याने कधी त्याचा चुकूनही उल्लेख केलेला तिला आठवत नव्हता.

“काय माहीत!कधी बोलले तर नाहीत. कदाचित आवडतही असेल” ती जरा खट्याळपणेच म्हणाली.मैत्रीण चुप बसली.

हर्षाची आई बाहेर येऊन तिच्या मैत्रीणींशी बोलायला लागली तशी हर्षा किचनमध्ये गेली.तिने झटपट शिरा भजी करुन प्लेट्स भरुन बाहेर आणल्या

“करुनच ठेवलं होतं की काय?”एकीने विचारलं

“नाही गं!आता केलंय.गरमच आहे बघ”हर्षा हसत म्हणाली.

“मग इतक्या झटपट?”

हर्षाचा कामाचा झपाटा जबरदस्तच होता.कधीकधी ती वेंधळेपणा करायची पण खुपदा फक्कड जमून जायचं

” खुप छान झालीहेत भजी आणि शिराही” एकजण म्हणाली

“चला याबाबतीत तरी आपली हर्षू मँच्युअर्ड आहे म्हणायची”दुसरीने टोमणा हाणला.तशा सगळ्या हसल्या.

“हर्षू लहानपणापासूनच स्वयंपाक छान करते.अगदी पाचवीत असल्यापासून ती पोळ्या करायची.अजूनही तिचं नवीननवीन पदार्थ करण्याचं वेड संपलेलं नाही. नोकरी करत असतांनाही ती सुटीच्या दिवशी काहीतरी नवीन करुन सर्वांना उत्साहाने खाऊ घालायची”

निर्मलाबाईंनी केलेल्या प्रशंसेने हर्षा अवघडली.

” कसं जमतं कुणास ठाऊक?आम्हांला तर रोजचा साधा स्वयंपाक करायचासुध्दा कंटाळा येतो”एक मैत्रीण म्हणाली

हाच तर फरक होता हर्षा आणि इतरांमध्ये.सदोदित उत्साहाने फसफसलेल्या हर्षाला सतत काम करायला आवडायचं.नोकरी करतांनाही ती आँफिसमध्ये कामात सर्वांच्या पुढे असायची.दिवसभराचं काम चारपाच तासात पूर्ण करुन ती बाँसकडे जाऊन दुसरं काम मागायची नाहीतर दुसऱ्यांना मदत करायची.तिच्या या वृत्तीमुळे ती बॉससकट सर्वांचीच लाडकी होती.म्हणून तर जेव्हा मुलांच्या संगोपनासाठी तिने राजीनामा दिला तेव्हा कंपनीने तिला ती मागेल तो पगार देण्याची तयारी दाखवली होती.अर्थातच तिने नकार दिला होता. 

मैत्रिणी गेल्या तसं प्रियाला हायसं वाटलं.त्याच त्या कंटाळवाण्या घरगुती विषयांवरच्या गप्पा ऐकून ती कंटाळून गेली होती.ती मागच्या महिन्यातच स्वित्झर्लंडला जाऊन आली होती.तिला त्याबद्दल खुप काही सांगायचं होतं पण मैत्रीणींना त्यात काडीचाही रस नव्हता.सध्या ती खुप पुस्तकं वाचत होती.त्याबद्दलही तिला बोलायचं होतं.पण मुलं,नवरा,सासू या विषयातून बाहेर निघायला मैत्रीणींना आवडत नव्हतं. 

संध्याकाळी मुलांना घेऊन ती बागेत गेली.मुलांचे झोके खेळून झाल्यावर कुणी बघत नाहीये हे पाहून तिनेही मनसोक्त झोक्यावर खेळून घेतलं.झोक्यावरुन उतरतांना तिथे मुलांना घेऊन अचानक उगवलेल्या बायका तिच्याकडे विचित्र नजरेने बघताहेत हे तिच्या लक्षात आलं आणि ती मनोमन लाजली. 

तीन  दिवसांनी भाऊ आणि वहिनी गावाहून आल्यावर ती पुण्याला परतली.दुसऱ्याच दिवशी प्रणव फ्रांसहून परतला.

उन्हाळ्याच्या सुट्या आता संपत आल्या होत्या.शाळेतली मुलं कॉलन्या कॉलन्यात क्रिकेट खेळायची.हर्षाच्या गल्लीतही एका मोकळ्या जागी क्रिकेट सुरु होतं.भाजीबाजारातून परतलेल्या हर्षाने ते पाहिलं आणि तिला लहानपणीचे दिवस आठवले.तिच्या इतर मैत्रिणी मुलींचे खेळ खेळत असतांना ही मात्र मुलांसोबत क्रिकेट खेळायची.ती बँटिंग आणि बाँलिंगही चांगली करत असल्यामुळे तिला टिममध्ये घेण्यासाठी मुलांची भांडणं व्हायची.हर्षाला ते आठवलं आणि ते क्षण परत अनुभवण्यासाठी ती उतावीळ झाली.

“ए मी खेळू का रे तुमच्या सोबत?”

तिनं असं विचारल्यावर मुलं हसू लागली

“काकू हा लेडीज गेम नाहिये.तुम्हांला बँट तरी हातात धरता येते का?”एक मुलगा चेष्टेने म्हणाला तशी हर्षा उसळून म्हणाली

” तुम्ही सगळे बँटिंग करा.तुम्ही सगळे आऊट झाल्यावरच मी बँटिंग करेन.चालेल?”

पोरं आनंदाने तयार झाली.

बऱ्याच वर्षांनी बाँल हातात घेतल्यामुळे तिचे चेंडू वेडेवाकडे पडत होते.पोरं ती मस्त चोपत होती.पण जशी ती सरावली तिने त्यांना आऊट करण्याचा सपाटा लावला.सातही पोरांना आऊट करुन तिने बँटिंग करायला सुरुवात केली.चार पाच चेंडू सरळ खेळल्यावर तिने मग जोरदार फटके लगवायला सुरुवात केली.एक चेंडू तर तिने पार एका दोनमजली इमारतीवरुन भिरकावून दिला.पोरं शोधायला गेली आणि रिकाम्या हाताने परत आली.

“काकू त्या रणदिवे मावशींच्या डोक्यात बाँल बसला.त्या बाँल देतच नाहीयेत.त्या तुम्हांला बोलवताहेत.तुम्ही जाऊन घेऊन या ना!”

हर्षा विचारात पडली.रणदिवे मावशी म्हणजे भांडकुदळ बाई होती.तिच्याकडे जायचं म्हणजे ती हमखास तिच्या लहान मुलांमध्ये खेळण्यावरुन तिला नाही नाही ते बोलणार हे नक्की होतं.

” जाऊ द्या मुलांनो.मी तुम्हांला पैसे देते तुम्ही नवा बाँल घेऊन या “मुलं खुष झाली. तिने आत जाऊन पैसे आणून मुलांना दिले.मुलं नवीन बाँल आणायला गेली.हर्षाने प्रकरण संपलं म्हणून सुस्कारा सोडला तर थोड्याच वेळाने रणदिवे मावशी उपटली.तिने हर्षाला लहान मुलांमध्ये क्रिकेट खेळण्यावरुन चांगलंच फैलावर घेतलं.तिच्या बालिशपणावरुन हर्षाला नाही नाही ते बोलली.

“अगं तुला काही लाजबिज वाटत नाही का त्या लहान पोरांमध्ये खेळायला?आता तरी सुधर.तू काही लहान नाही.दोन मुलांची आई आहे तू”अशी ताकीद देऊन गेली.ती गेल्यावर हर्षाला रडू आलं.एक प्रकारची विचित्र उदासिनता तिला वाटू लागली. 

संध्याकाळी प्रणव घरी आला तर घरात सामसुम होती.केतकी आणि मिहिर काहीतरी खेळत बसले होते.हर्षा बेडरुममध्ये पुस्तक वाचत पडली होती.पण तिचं वाचण्यात मन लागत नव्हतं.दुपारचा प्रसंग तिला वारंवार आठवत होता.

“काय गं केतकी आज घरात इतकी शांतता का बरं?”प्रणवने विचारलं

” त्या मागच्या काँलनीतल्या रणदिवे आजी आपल्या घरी येऊन आईला खुप बोलून गेल्या.म्हणून आई रडतेय”

” आईला बोलून गेल्या?पण का?”

केतकीने त्याला सगळा किस्सा त्याला सांगितला.प्रणवच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.तो बेडरुममध्ये गेला.त्याला पाहून ती उठून बसली पण तिचा उदास,रडवेला चेहरा त्याच्या लक्षात आला.

“काय गं असा चेहरा पाडून काय बसलीयेस?”

“नाही. काही नाही असंच!”

” सांगितलं मला केतकीने सगळं.मग यात एवढं नाराज होण्यासारखं काय आहे?”हर्षा रडायला लागली.रडतारडता म्हणाली

“सगळेच मला म्हणतात की तू लहान आहेस का लहान मुलांमध्ये खेळायला?आपल्या आई होत्या त्याही तसंच म्हणायच्या.माझी आई,वहिनी,माझ्या मैत्रिणीही तसंच म्हणत असतात.आता मला खेळायला आवडतं आणि ही मोठी माणसं खेळतच नाहीत तर मी काय करु?मला नाईलाजास्तव लहान मुलांमध्ये खेळावं लागतं”

क्रमश: – भाग २… 

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments