श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “माणूस…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

खायला, रहायला, आणि अंगावर घालायला मिळालं की माणसाच्या गरजा संपत नाहीत. वरच्या गोष्टी मिळाल्यावर किंवा मिळवताना माणसाला माणूसच लागतो. माणसाला महत्वाची गरज असते ती माणसाचीच. आणि हा त्याला सतत हवा असतो.

वयाने, ज्ञानाने, अनुभवाने, इतकंच काय पैशाने देखील माणूस मोठा होतो. पण माणसाला मोठं करण्यात सहभाग असतो तो माणसाचाच. कोणताही माणूस एकटाच, आणि आपला आपलाच मोठा होत नाही.

बरेच कार्यक्रम हे कोणाच्या तरी नावाने होतात. अशा कार्यक्रमात साधारण तीन माणसं मोठी होतात. एक ज्याच्या नावाने कार्यक्रम आहे तो. या कार्यक्रमाला ज्याला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं आहे तो दुसरा. आणि अशा कार्यक्रमात ज्यांच कौतुक होणार आहे तो तिसरा.

यातले तिघंही आधीच मोठे असू शकतात. पण अशा कार्यक्रमामुळे त्यांचा मोठेपणा वाढतो आणि अशा प्रत्येक कार्यक्रमानंतर तो वाढत जातो. पण कार्यक्रम यशस्वी करायला गरज असते ती माणसांची.

मनातलं दुःख सांगायला माणूस नसला तरी चालतो. पण आनंद व्यक्त करायला मात्र साथ लागते ती माणसाचीच. दु:ख वाटल्याने कमी होत, आणि आनंद वाटल्याने वाढतो अस म्हणतात. पण हे कमी करणारा आणि वाढवणारा फक्त आणि फक्त माणूसच असतो‌.

करमणूक म्हणून माणूस रेडिओ, टि.व्ही. यांचा आधार घेत असेल. यावर सुरू असणारे कार्यक्रम तो ऐकतो, बघतो. पण मनातलं तो यांना सांगू शकत नाही. आणि मग आपलं ऐकायला लागतो तो माणूस.

एखादी आनंदाची गोष्ट घडल्यावर ती कधी आणि कशी सांगू अशी घाई माणसाला  होते. पण अशी गोष्ट वस्तूंना सांगून समाधान होत नाही. ते समाधान मिळवून देणारा असतो तो माणूस.

प्रवासातल्या काही वेळात सुध्दा माणूस सहप्रवाशाशी बोलत असतो. यात बऱ्याचदा प्रवास केव्हा संपतो ते कळत सुद्धा नाही.

स्पर्धेत सुध्दा कोणीतरी हरल्यामुळे जिंकणारा मोठा होतो. जिंकण्यासाठी सुध्दा हरवावं लागतं ते माणसालाच.

अनेक जण सकाळ, संध्याकाळ ठराविक वेळी, ठराविक रस्त्याने फिरायला जातात. यावेळी काही चेहरे नियमित दिसतात. पण आपसात ओळख मात्र नसते. असा ओळख नसलेला पण नेहमीचा चेहरा दिसला नाही तर थोड वेगळ वाटतंच. कारण… नेहमी दिसणारा माणूस आज दिसत नाही. यावेळी सुध्दा नजर  शोधत असते ती त्या माणसाला.

माणसाला मोठं करण्यात माणसाचाच हात असतो. यातही सगळ्यात महत्वाचा हात असतो तो शिक्षक या माणसाचा. एक शिक्षक एकावेळी अनेकांना मोठं करण्याचं स्वप्न उराशी बाळगून असतो. तो सुद्धा  माणूसच घडवत असतो.

माणूस, भांडला तरी भांडतो माणसाशीच. यात चुकणारा, त्याला समजवणारा, आणि समेट घडवणारा असतो तो माणूसच.

आनंदाच्या वेळी मिठी मारत पाठीवर ठेवलेला, आणि संकटात खांद्यावर ठेवलेला एक हात बरंच काही सांगून जातो. तो हात असतो माणसाचा.

फक्त आपण माणूस आहे याची जाणीव ठेवायला हवी. कारण सोबत हवा असतो तो माणूस…

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_printPrint
4 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments