वाचताना वेचलेले
☆ ‘काळा ठिपका…’ ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆
कॉलेजमधील एका प्राध्यापकांनी एके दिवशी वर्गावर आल्यावर अचानक जाहीर केले-
“आज मी तुमची सरप्राईज टेस्ट घेणार आहे.”
असे म्हणून प्राध्यापकांनी प्रत्येक विद्यार्थ्याला प्रश्नपत्रिका दिली. ती हातात पडताच जवळपास सर्व विद्यार्थी आश्चर्यचकित झाले. काहीजण तर पूर्ण बावचळून गेले. कारण प्रश्नपत्रिका पूर्ण कोरी होती.
कसलेच प्रश्न त्यावर नव्हते. फक्त त्या पेपरच्या मध्यभागी एक छोटा काळा ठिपका होता.
प्राध्यापक म्हणाले,
“आश्चर्य वाटून घेऊ नका. तुम्हाला पेपरवर जे काही दिसतंय त्यावर दहा ओळी लिहायच्या आहेत.”
मुलांनी मग जमेल तसे उत्तर लिहिले. सगळ्यांचे लिहून झाल्यावर प्राध्यापकांनी पेपर गोळा केले आणि एकेकाची उत्तरपत्रिका मोठ्याने वाचायला सुरुवात केली.
कुणी लिहिले होते, तो ठिपका म्हणजे मी आहे, माझे जीवन आहे, तर कुणी भौमितीकरीत्या लिहिले होते की, पेपरच्या मध्यभागी एक काळा ठिपका आहे. त्याचा व्यास अमुक तमुक मिलीमीटर असावा वगैरे वगैरे !
सगळे झाल्यावर प्राध्यापक म्हणाले,
“दुर्दैवाने तुम्ही सर्वजण नापास झालेले आहात.”
सर्वजण दचकले.
मग प्राध्यापक सांगू लागले,
“सर्वांनी एकाच दिशेने विचार केला आहे. सर्वांचा फोकस त्या काळ्या ठिपक्यावरच होता. ठिपक्याभोवती खूप मोठा ‘पांढरा’ पेपर आहे, हे मात्र कुणीच लिहिले नाही.”
आपल्या जीवनात देखील असेच होते. आपल्याला खरेतर जीवनरुपी खूप मोठा पांढरा पेपर मिळालेला असतो. ज्यात आनंदाचे रंग किंवा शब्द भरायचे असतात. पण आपण ते न करता केवळ काळ्या ठिपक्याकडे पाहतो.
जीवनातल्या अडचणी, मित्र मैत्रिणी सोबतचे वाद गैरसमज, घरातील विसंवाद हे सगळे ते काळे ठिपके असतात.
आपण त्यावर फोकस करतो आणि ‘खूप मोठा पांढरा’ पेपर हातात आहे याकडे दुर्लक्ष करतो.
खरेतर एकूण पांढऱ्या पेपरच्या आकारापेक्षा तो काळा ठिपका तुलनेने खूप लहान असतो. पण तरी आपण त्यातच गुंतून पडतो. आणि मोठा पांढरा भाग दुर्लक्षित राहतो.
म्हणून यापुढे काळा ठिपका न पाहता पांढरा पेपर पाहायला शिका!
प्रस्तुती : श्री अनंत केळकर.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈