श्री सुहास रघुनाथ पंडित

🌸 विविधा 🌸

☆ खिडकीतला पाऊस… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

ब्रह्मानंद  म्हणजे नेमके काय हे समजले नसले तरी खिडकीतून , बाहेर  पडणारा पाऊस पाहण्यात जो आनंद  मिळतो त्याला ब्रह्मानंद  म्हणायला काय हरकत आहे ? ज्या आनंदामुळे आपल्या चित्तवृत्ती प्रफुल्लित  होतात आणि जो आनंद  आपल्या मनातील मळभ धुऊन काढतो तोच खरा ब्रह्मानंद  !

सौजन्याची  ऐशी तैशी ‘ म्हणत महिनाभर  मनमानी कारभा-यासारखा वागणारा हा सूर्य. त्याच्या तडाख्याने तापून निघालेल्या पृथ्वीला जगणं असह्य  होऊन गेलेलं.ग्रिष्माच्या निखा-यांनी अंग अंग पोळलेलं. एक तरी सर यावी म्हणून  आसुसलेले जीव.अशातच अनपेक्षितपणे कुठूनतरी थंडगार वा-याची झुळूक  येते.क्षणभर आश्चर्यच वाटतं.सहज बाहेर लक्ष जातं.उन्हाची तीव्रताही कमी जाणवू लागते. तसं म्हटल तर सूर्यास्ताला अजून  बराच वेळ असतो.पण बाहेर अंधार अंधार वाटू लागतो.वारे वाटेल तसे वाहू लागतात. झाडांच्या फांद्यांची घुसळण सुरू होते.पानांच्या माना मोडेपर्यंत फांद्या वाकू लागतात.कुठला कुठला पाला,पाचोळा, कागदाचे तुकडे,हा सारा केर वा-याने गोल गोल उडत उडत दारापाशी येऊन  साठतो.तेवढ्यात क्षणभर  सगळं काही शांत शांत  होतं.’ गेलेल्या ‘ पावसाला श्रद्धांजली वाहात झाडं स्तब्ध उभी राहतात.छपरावर आलेला पाऊस  गेला की काय  अशी शंका येते.तोच टप् टप् असे चार थेंब  पत्र्यावर  पडतात.घरांची  उघडी दारे धाड धाड आपटू लागतात.गेला गेला असं वाटणारा पाऊस  आपल्या लवाजाम्यासह  पुन्हा बरसू लागतो.थाड थाड थाड थाड पाय आदळत घरांच्या पत्र्यावर  नाचू लागतो.टेरेसच्या पाईप मधून पाण्याची धार सुरू होते.रस्त्याच्या कडेला पाण्याची डबकी तयार होतात.त्यात पाण्याचे टपोरे थेंब पडले की तयार होतात छोटी मोठी वर्तुळं, एकात दुसरं विरघळून जाणारी. स्वत:च्या वर्तुळातून बाहेर  न पडणा-या माणसांपेक्षा एकमेकात सहजपणे मिसळून जाणारी वर्तुळं बघितली की उगाचच मनात अपराध्यासारखं वाटू लागतं.सूर्याच दर्शन  तर आता होणारच नाही.पण चुकार किरण मात्र  एखाद्या ढगाआडून डोकावत असतात.मग मात्र  डबक्यातल पाणी आरशासारखं  चमकू लागतं.लांबून पाहिल तर अभ्रकाचा खूप मोठा तुकडाच पडलाय की काय असं वाटावं.तेवढ्यात  एखादी वीज चमकून  जाते, अंग वेडवाकडं नाचवत,एखाद्या नर्तकीसारखी  नृत्य करत. दूरवर कुठेतरी खूप मोठा आवाज  होतो आणि पडली वाटत वीज कुठेतरी ‘ लगेच चर्चा सुरू होते.तशातच या चित्रमय बदलांची कसलीही दखल न घेता एक आगगाडी उन्मत्तपणे सुसाट वेगाने धावत सुटते.कुठल्याही वेळेच बंधन नसणारा हा पाऊस, वेळा सांभाळत मुकाट्याने धावणा-या या आगगाडीकडे  पाहून मनातल्या मनात हसत तर नसेल ना ? बाहेरचा पाऊस  जराही आत येऊ नये म्हणून  आगगाडीच्या सर्व  खिडक्या बंद  करुन घेतलेल्या असतात.पण असे करताना,अंग भिजू नये म्हणून  काळजी घेताना,आपण चैतन्याच्या किती थेंबांना मुकतो आहोत याची आतल्या प्रवाशांना कल्पना नसते.विजेच्या तारांवरून घरंगळत जाणारे जलबिंदू  किंवा तारेवर बसून पंख फडफडवणारे इवले इवले पक्षी  त्यांच्या नजरेस पडू शकत नाहीत.गाडीचा आवाज विरून जातो.सगळी पाखरं कुठं चिडीचूप  होतात समजत नाही.पण लबाड बोका मात्र अंग झटकत धूम ठोकतो आणि आडोश्याचा आसरा घेतो.आता त्याने ‘ म्या आऊ ‘ ? अस विचारल तर मात्र  त्याला अगदी अवश्य  आत ये म्हणायच अस मी ठरवतो.पण तो इतका गारठलेला असतो की डोळे मिटून  गप्प उभ राहण्याशिवाय  त्याला काही सुचतच नाही.खरच,त्याला चहा द्यावा काय ? आणि एकदम लक्षात येत आपण तरी कुठे घेतलाय चहा हा पाऊस  बघण्याच्या नादात ! देहभान  विसरून  टाकायला लावणारा हा पाऊस! पण चहाची एकदा का आठवण झाली की मग मात्र  चैन पडत नाही.डोळ्यासमोर  चहाचा कप दिसू लागतो.त्यातून बाहेर  पडणा-या वाफा या,तापलेल्या जमिनीवर  मगाशी पावसाचे थेंब पडल्यावर  निघणा-या वाफांच्या इतक्याच महत्वाच्या वाटू लागतात.चहा प्यायची तीव्र  इच्छा होते आणि त्याच क्षणी ‘ती’ आपल्यासमोर चहाचा कप घेऊन  उभी असते.पृथ्वीवरच्या या अमृताचा आस्वाद  घेत घेत  मी पुन्हा खिडकीतून  बाहेर  पाहू लागतो.तंबो-याच्या तारांप्रमाणे दिसणा-या त्या जलधारांतून  निघणा-या तालबद्ध  आवाजाचा टपोरेपणा  नकळत  जाणवू लागतो.हे सर्व  पाहताना डोळ्यांना मिळणारं सुख , वहीची कितीही पानं लिहून काढली तरी मी कुणाला पटवून देऊ शकत नसतो.माझ्या अंत:करणात श्रावणसरी बरसत असतात आणि मनाच्या मोराचं नाचणं केव्हा सुरू होत हे मला समजतही नाही.हा पाऊस  माझा असतो आणि मी पावसाचा.   खाली उतरणारे मेघ, कोसळणारा पाऊस,न्हाऊन  निघालेले   डोंगरमाथे , माना तुकवून  पावसापुढे नम्र     होणारे वृक्ष,  फुलांपानांतून टपकणारे थेंब, थरथरणारी तृणपाती हे सगळं पाहताना ‘मी न माझा राहिलो ‘ अशी अवस्था होऊन जाते.मग वाटू लागतं,ब्रह्मानंद ,ब्रह्मानंद  म्हणतात तो हाच तर नव्हे  ?

© सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
4 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments