सौ राधिका भांडारकर

? इंद्रधनुष्य ?

☆ “माझी मैना…” ☆ सौ राधिका भांडारकर 

आज १ ऑगस्ट …. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिन. ( १ ऑगस्ट १९२० ). 

दोन शब्दातच समोरच्या व्यक्तीला जिंकून घेण्याचं सामर्थ्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या शब्दात आहे. या राष्ट्रीय पुरुषाने विपुल लेखन केले.

” माझी मैना गावावर राहिली..” हा मला तर त्यांच्या पूर्ण साहित्याचा परमोच्च बिंदूच वाटतो. 

माझी मैना गावाकडे राहिली

माझ्या जीवाची होतीया काहीली

ओतीव बांधा। रंग गव्हाळा।

कोर चंद्राची ।उदात्त गुणांची।

मोठ्या मनाची। सीता ती माझी रामाची ।

हसून बोलायची। मंद चालायची।

सुगंध केतकी। सतेज कांती ।

घडीव पुतळी। सोन्याची।

नव्या नवतीची। काडी दवण्याची।

रेखीव भुवया ।कमान जणू इंद्रधनुची।

हिरकणी हिऱ्याची। काठी आंधळ्याची ।

तशी ती माझी। गरीबाची मैना ।

रत्नाची खाण ।माझा जीव की प्राण।

नसे सुखाला वाण। तिच्या गुणांची छक्कड मी गायली। माझ्या जीवाची होतीया काहिली…।।

ही रचना वाचल्यानंतर सर्वप्रथम मनात येते ती दोन जीवांची झालेली ताटातूट. ती गरिबीमुळे झालेली आहे ..असावी.  राघू— मैने ची जोडी वेगळी होत आहे आणि त्या विरही भावनेत तिच्या प्रेमाचं, देहाचं,तिचं त्याच्या जीवनात असण्याचं नितांत सुंदर आणि ठसकेबाज वर्णन या रचनेत केलेलं आहे.  थोडक्यात हे एक सुंदर प्रेम गीत आहे.

पण ही मैना अधिक व्यापक स्वरूपात समजून घेण्याचा मी प्रयत्न केला आणि मला या रचनेमागचे वेगळे संदर्भ लक्षात आले.  

माझी मैना ही एक छक्कड आहे.  छक्कड हा लावणीचा एक प्रकार आहे.  माझी मैना ही एक राजकीय छक्कड आहे. आणि त्या पाठीमागे अण्णाभाऊंच्या जीवनाची पार्श्वभूमी आहे.

अण्णा भाऊंना गरिबीमुळे त्यांचं मूळ गाव वाटेगाव सोडावं लागलं.  काम धंद्यासाठी त्यांना मुंबई नगरीत यावं लागलं. तिथे त्यांनी मिळेल ते काम केलं.  हेल्पर, बुटपॉलिशवाला, सिनेमागृहात द्वारपाल अशी विविध कामे केली.  ही कामे करता करता कोहिनूर मिलमध्ये ते कामगार म्हणून स्थित झाले.  या ठिकाणी त्यांचा संबंध कामगार चळवळीशी आला आणि त्याच वातावरणात त्यांची लेखन कला बहरली.  ते लेखक, शाहीर बनले.  त्यानंतर याच माध्यमातून त्यांचा संयुक्त महाराष्ट्र लढ्याशी संबंध आला.

चळवळीत कम्युनिस्ट पक्षाचे कार्ड होल्डर म्हणून ते काम करायचे पण ते खरे कलाकार होते.  नाटक, वग, पोवाडे आणि लावण्या लिहून त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची मशाल पेटती ठेवली.  त्याचवेळी माझी मैना ही छक्कड अतिशय गाजली ती एक रूपकात्मक रचना म्हणून.

ही मैना कोण याचे उत्तर या चळवळीत सापडलं.  संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली.( एक मे १९६०) पण बेळगाव आणि कारवार हा भाग महाराष्ट्राच्या सीमेत आला नाही मुंबईतील फाउंटन आणि बेळगाव येथे झालेल्या आंदोलनात शेकडो लोकांनी रक्त सांडले तरी देखील संयुक्त महाराष्ट्र हवा तसा झाला नाही याचं दुःख त्यांच्या मनाला झालं आणि त्यातूनच माझी मैना या छक्कडचा जन्म झाला.  माझी मैना गावावर राहिली हे बेळगाव आणि कारवार या भागासाठी रूपक आहे आणि ही नितांत सुंदर मैना म्हणजेच निसर्गरम्य बेळगाव आणि कारवार.

आजही ही मैना प्रासंगिक आहे. साठ पासष्ट वर्षापूर्वी लिहिलेली ,गायलेली ही छक्कड आजही  तितकीच ताजी तवानी आहे कारण अजूनही सीमा प्रश्न सुटलेला नाही म्हणून “माझी मैना गावावर राहिली” हा सल आहेच.

(कै. विठ्ठल उमप यांनी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण गायकीतून आणि अभिनयातून “माझी मैना” प्रचंड लोकप्रिय केली)

तर असा हा अलौकिक लोकशाहीर ! अण्णाभाऊ साठे…..  त्यांनी विपुल लेखन केले. कथा, कविता, गीत, लावण्या, कादंबऱ्या व नाट्य वृत्तांत, प्रवास वर्णने असे सर्व साहित्यप्रकार हाताळले. पण त्यांच्या जीवनातलं श्रेष्ठ साहित्य कार्य म्हणजे त्यांनी लोकसंस्कृतीला रंगभूमीवर प्रतिष्ठा मिळवून दिली. ती गौरवली. जनमानसात रुजवली.

अण्णाभाऊ यांच्या जन्मदिनी या असाधारण लोकशाहीरास  भावपूर्ण श्रद्धांजली.

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments