डाॅ.भारती माटे
🌸 जीवनरंग 🌸
☆ किंमत… भाग – 1 … श्री श्रीपाद सप्रे ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆
‘चला, उद्या महिन्यातला दुसरा शनिवार ! सुट्टी आहे, जरा आरामात उठलं तरी चालेल.’ असा विचार करत त्याने अंथरूणावर अंग टाकलं. तिला मात्र बराच वेळ झोप नव्हती. ‘आपल्याला हे सर्व जमेल ना? सर्व नीट सुरळीत व्हायला हवं…. जमेल, न जमायला काय झालं? नव्हे…. नव्हे….जमायलाच हवं.’ विचार करता करता कधीतरी उशिरा तिला झोप लागली.
ती सकाळी जेव्हा उठली तेव्हा नवरा, मुलगा आणि सून डाराडूर झोपलेले होते. ती चहा नाश्त्याच्या तयारीला लागली. हळूहळू सर्व जण डायनिंग टेबलवर जमले. चार जणांच्या डिश बघून नवरा म्हणाला,
“आज वटपौर्णिमेचा उपास करणार नाहीस का?”
नवऱ्याचा प्रश्न साधा सरळ असला तरी तिला प्रश्नातला खवचटपणा लक्षात आला होता.
“नाही, आज एका रिसॉर्टवर जात्येय. उद्या रात्री जेऊनच येईन. मला यायला उशीर झाला तरी तुम्ही काळजी करू नका, माझ्याकडे किल्ली आहे. मी दार उघडून येईन. तुमची झोपमोड होऊ देणार नाही.”
…. अशी कशी काय ही अचानक जात्येय या विचाराने तिघांच्या तोंडातला घास तसाच राहिला होता.
आपल्या टायमिंगवर ती बेहद्द खूष झाली. नवऱ्याने अडकलेला घास पाण्याच्या घोटाबरोबर आत ढकलला. मुलाने चेहरा शक्य तितका भावनारहित ठेवला होता. ‘ ठीक आहे, हा तुमचा निर्णय आहे ‘ असं दर्शवत सुनेने किंचित खांदे उडवले.
“अगं, कुठे जाणार आहेस, काय करणार आहेस, कोणाबरोबर जाणार आहेस, काही सांगशील की नाही.”
आवाजावर नियंत्रण ठेवत नवऱ्याने विचारलं.
” पन्नासच्यावर वय असलेल्या व्यक्तींची ‘मुक्त छंद’ नावाची संस्था आहे. मी ह्या ग्रुपबद्दल कोणाकडून तरी ऐकलं होतं. हा ग्रुप महिन्यातून दोन दिवस एक रिसॉर्ट बुक करतो. ते दोन दिवस, तिथे जमलेले सर्वजण एकमेकांशी गप्पा मारतात, चर्चा करतात. अगदी वैवाहिक जीवनापासून ते साहित्य, संगीत, व्यावसायिक करिअर अशा कोणत्याही विषयावर गप्पा होतात. विषयाचे बंधन नाही. तुम्ही तुमच्या जिव्हाळ्याच्या विषयावर समविचारी पार्टनरसोबत गप्पा मारायच्या. कंटाळा आला की खायचं, प्यायचं, आराम करायचा, गाणी गायची. थोडक्यात, तुमचं मन जे म्हणेल ते करायचं. तिथे दोन सिंगल बेड असलेली बरीच कॉटेजेस आहेत. शिवाय एक दोन डॉर्मेटरीज आहेत. कॅरम, बुद्धिबळ, पत्ते असे बैठे खेळ आहेत. लायब्ररी आहे. स्विमिंग पूल, रेन डान्स, कराओके असं बरंच काही आहे.”
“समजा कॉटेजमध्ये झोपण्याचा निर्णय घेतलास आणि कोणी महिला पार्टनर मिळाली नाही तर?”
आपली अस्वस्थता लपवत नवऱ्याने विचारलं.
” तर…. खरं म्हणजे, तसा विचार केला नाही, पण अगदीच वाटलं तर डॉर्मेटरी आहेच. एवढा घाबरू नकोस रे…. तुझ्या बायकोची पन्नाशी उलटल्येय. आता कोणी उचलून पळवून नेणार नाही तिला.”
…. आपल्यात इतका व्रात्यपणा अचानक कुठून आला हे तिला कळत नव्हतं. तिची सून तर अवाक् होऊन पहात होतीच, पण तिच्या उत्तराने मुलाच्याही चेहऱ्यावरचे भाव बदलले होते.
“आणि मीही तुझ्याबरोबर आलो तर?”
कित्येक वर्षांनी आपला नवरा इतका पझेसिव्ह झाला आहे, हे बघून तिच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या.
” काहीच हरकत नाही. फक्त दोन दिवस तू तुझे पार्टनर शोधून त्यांच्यासोबत रहायचं आहे. तशी त्या संस्थेची अटच आहे.”
” बाबा, तुम्ही आधी नीट विचार करा आणि निर्णय घ्या. कारण दोन दिवस अनोळखी व्यक्तींसोबत रहाणं, तुम्ही एंजॉय कराल का?”
मुलाने वास्तवाची कल्पना दिल्यावरही तो म्हणाला, ” तिथे टीव्ही असेलच ना, मी टीव्ही बघत बसेन.”
मुलाने आणि सुनेने एकाच वेळी हैराण होऊन त्याच्याकडे पाहिले. ती मात्र खाली मान घालून नाश्ता संपविण्यात मग्न होती.
“तू मजा करायला चाललीस, आमच्या जेवणा-खाण्याचे काय?” चिरक्या आवाजात नवऱ्याने अंतिम अस्त्र काढलं. तिने उत्तर न देता शांतपणे सुनेकडे पाहिले. त्या थंडगार नजरेचा सुनेने ह्यापूर्वी कधी अनुभव घेतलेला नव्हता. ती गडबडीने म्हणाली .. ” बाबा, मी आहे ना. आपण मॅनेज करू काही तरी.”
कपडे, आवडती एक दोन पुस्तकं आणि आणखी किरकोळ वस्तू भरून तिने बॅकपॅक खांद्यावर टाकली. पायात स्पोर्ट्स शूज घातले. डोळ्यावर गॉगल चढवला. घराबाहेर पाऊल टाकताना तिने विवंचना घरातच सोडल्या होत्या.
सोनचाफ्याचं फूल, पेन-नोटपॅड, कॉटेजची किल्ली देऊन सर्वांचं रिसॉर्टवर स्वागत करण्यात येत होतं. कॉटेजमध्ये बॅग ठेवून ती चहा प्यायला गेली. एका मोठ्या आमराईत चहा कॉफीची व्यवस्था करण्यात आली होती. एखाद्या झाडाखाली बसून चहा पिण्याचं सुख ह्यापूर्वी तिने कधीच अनुभवलं नव्हतं. चहापान झाल्यावर एका हॉलमध्ये सर्वांना बोलावण्यात आलं. छोट्याश्या स्टेजवर सत्तरीचे गृहस्थ आणि साधारण त्याच वयाच्या बाई उभ्या होत्या…..
” ‘मुक्त छंद’ ह्या उपक्रमात आम्ही तुमचं मनःपूर्वक स्वागत करतो. पुढचा दीड दिवस हा फक्त आणि फक्त तुमचा आहे. ह्या दीड दिवसात काय करायचं ते तुम्ही ठरवायचं आहे. जे कराल त्यातून स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करा. समविचारी मित्र मैत्रिणी शोधा. अर्थात, तसा आग्रह अजिबात नाही हं…. कारण तुम्हीच स्वतःचे ‘प्रथम मित्र’ आहात. खूप धमाल करा…..आणि बरं का, एंजॉयमेंटचंही अजीर्ण होतंय असं वाटलं तर ह्या विस्तीर्ण आमराईत कुठेही जाऊन ध्यानस्थ व्हा. वाटलं तर एखाद्या झाडाखालच्या पारावर अंग सैलावलंत तरी चालेल.”
…. आधी नुसता फेरफटका मारू, मग ठरवू काय करायचं ते, असा विचार करून तिने निरुद्देश चालायला सुरुवात केली.
— क्रमशः भाग पहिला…
लेखक – श्री श्रीपाद सप्रे
संग्रहिका : डॉ. भारती माटे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈