डाॅ.भारती माटे
🌸 जीवनरंग 🌸
☆ किंमत… भाग – 2 … श्री श्रीपाद सप्रे ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆
(आधी नुसता फेरफटका मारू, मग ठरवू काय करायचं ते, असा विचार करून तिने निरुद्देश चालायला सुरुवात केली. ) इथून पुढे —-
तंद्रीत अचानक ती स्विमिंग पूलच्या समोर येऊन उभी राहिली. तिथे तीन चार जण पाण्यात डुंबत होते. ती गडबडीने मागे फिरणार तेव्हढ्यात तिला हाक ऐकायला आली,
” ए मुली, लाजू नको. ये इकडे….”
पन्नास वयाची अट असताना इथे मुलगी कशी काय आली? हे पाहण्यासाठी तिने मान वळवली. नऊवारी साडीतल्या एक आजी स्विमिंग पूलमधून बाहेर येता येता तिलाच हाक मारत होत्या. पन्नाशी उलटलेली मुलगी ! तिला गंमत वाटली. तोपर्यंत आजी तिच्याजवळ पोहोचल्या होत्या. तिला शेकहॅंड करत त्या म्हणाल्या,
” मी अरुणा प्रधान. तुला पोहता येत नसलं तरी नुसतं डुंबायला येऊ शकतेस. अगं, पाण्यात शिरलं ना, की तन आणि मन आपोआप हलकं होऊन जातं. जगाचा विसर पडतो, षडरिपू गळून पडतात. मला तर आईला भेटल्यासारखं वाटतं.”
पाण्याला आईची उपमा दिलेली पाहून ती हळवी झाली. बराच वेळ त्या दोघी पाण्यात खेळत राहिल्या. खेळताना मध्येच ती प्रधान आजींना म्हणाली,
” मला तुमच्या बद्दल जाणून घ्यायला आवडेल.”
“आधी जेवूया मग झाडाखाली बसून गप्पा मारू.”
जेवण झाल्यावर एक छानशी जागा बघून तिथे ऐसपैस बसल्यावर आजी म्हणाल्या,
” माझ्याबद्दल मी तुला सांगते. तूही मनमोकळेपणाने स्वतः बद्दल सांग. आधी तू बोलत्येस की मी बोलू?”
“आधी मी बोलते.”
असं म्हणून तिने सकाळी घडलेला किस्सा सांगितला आणि म्हणाली,.. ” तीस वर्षं व्रतवैकल्यं केली,उपासतापास केले. जे केलं ते नक्की कोणासाठी केलं? असं आताशा माझ्या मनात यायला लागलं आहे. कारण जे काही मी करते ते मला वाटतं म्हणून करते, असा सर्वांचा भाव असतो. माझ्या राबण्याला, माझ्या भावनांना किंमत नाही असं आताशा वाटू लागलंय. पण आता बास झालं असं मी ठरवलं आणि इथे येण्याचा निर्णय घेतला. आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती….. आमच्या संसाराला तीस वर्षं झाली. आतापर्यंत नातं परिपक्व व्हायला हवं होतं नाही? पण, काहीतरी ‘मिसिंग’ आहे, असं उलटंच वाटायला लागलंय. ‘अपूर्णतेतंच खरा आनंद आहे ‘, ‘ भिन्नतेतच गंमत आहे ‘, वगैरे विचार डोक्यात येतात, पण हे सर्व भंपक आहे असंही वाटतं. तीस वर्षांनंतरही पावलोपावली मतभिन्नता? खरं तर आम्ही नाटक-सिनेमाला जातो, हॉटेलिंग करतो, वर्षांतून दोन तीन ट्रीप असतात. पण आता हेही सर्व रूटीन झाल्यासारखं वाटतं. सगळं निरस होत चाललंय. नवरा वाईट नाही, पण टिपीकल पुरुषी मनोवृत्ती आहे. सध्या मी गोंधळलेली आहे. मला नेमकं काय हवंय ते कळत नाहीये. पण खात्री आहे की कधीतरी सापडेल. तोपर्यंत शोध घ्यायचाय. त्याचाच भाग म्हणून मी इथे आल्येय.” .. दीर्घ श्वास घेऊन ती थांबली. आता आपण बोलायचं आहे हे ओळखून, प्रधान आजींनी डोळे मिचकावत तिला विचारलं,
” हं…. तर काय जाणून घ्यायचंय माझ्याबद्दल…..?”
” किती छान आहात तुम्ही. खरं तर स्वतः विषयी जे जे सांगाल ते सर्व ऐकण्याची उत्सुकता आहे.”
ह्या तिच्या वक्तव्यावर प्रधान आजी हसून म्हणाल्या,
” मी अरुणा प्रधान, वय वर्षे शहात्तर. एक मुलगा आहे, ऑस्ट्रेलियात असतो. पस्तीस वर्षं अर्धांगिनी होऊन संसार केला, आता गेली पंधरा वर्षं लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहते. नाही… नाही…. गैरसमज करून घेऊ नकोस. नवरा तोच आहे. माझ्यापुरतं मी स्टेटस बदललंय. आता मी अर्धांगिनी नाही आणि वामांगीही नाही. संसारात राहूनही अलिप्त झाल्येय. गरज असेल तेव्हा आम्ही एकमेकांना जमेल तेवढी मदत करत असतो. पण एकमेकांवर अवलंबून नाही, उत्तरदायी नाही. आम्ही एकमेकांना मोकळं केलं आहे.”
” म्हणजे एका वेगळ्याच प्रकारे तुम्ही वानप्रस्थाश्रम एन्जॉय करताय….” ती हसत हसत म्हणाली.
” अगदी बरोबर ! अगं, पंधरा वर्षांपूर्वी माझ्या स्टोरीत नवऱ्याची, मुलाची, सुनेची, नातवंडांची स्टोरी इतकी मिसळलेली होती की ती फक्त माझी स्टोरी नसायची. आता मात्र तसं नाहीये. माझी स्टोरी ही फक्त माझीच स्टोरी आहे. ‘ या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे,’ असं पाडगांवकरांनी म्हटलंय. पण असं प्रेम करण्यासाठी आपल्याला नोकरी-व्यवसाय करताना, संसाराचा गाडा ओढताना वेळ कुठे मिळतो? आणि म्हणूनच आपल्यासारख्यांच्या आयुष्यात, वानप्रस्थाश्रम महत्त्वाचा टप्पा ठरतो. सहजीवनातील प्रेम, आदर, मैत्री आणि सहवासाची गरज उतार वयातही असते. पण सहजीवनाच्या बरोबरीने स्वजीवनही असतंच की…. आणि म्हणूनच स्वजीवनाचा आनंद घेण्यासाठी मी स्वतःला बंधनातून मोकळं केलंय.”
” प्रधान साहेबांचं काय मत आहे? “
तिने उत्सुकतेने विचारलं.
” तुला काय वाटतं, तूच कल्पना करून सांग.”
प्रधान आजींच्या प्रश्नाने ती भांबावली. तिचा चेहरा पाहून त्या खळखळून हसल्या आणि म्हणाल्या,
“अगं, माझा नवरा जगावेगळा आहे. त्याचं म्हणणं असं आहे, की आपला संसार कसा असावा, आपलं नातं कसं असावं ह्याचा विचार समाजाच्या अदृष्य दडपणाखाली बरीचशी जोडपी ठरवत असतात. संसारातील गोडी टिकवायची असेल तर, प्रत्येक जोडप्याने दर दहा वर्षांनी किमान सहा महिन्यांसाठी वेगळं रहायला हवं. माझ्या नवऱ्याची अशी मतं असल्यामुळे मला निर्णय घेणं खूपच सोपं गेलं. ‘ लिव्ह इन रिलेशनशिप ‘ ही कल्पना त्याला बेहद्द आवडली. खरं सांगू, बंधन नसल्यामुळे आता आम्ही एकमेकांना उलट जास्तच समजून घेतो.”
तिचा गंभीर चेहरा पाहून आजींनी तिला जवळ घेतलं. तिच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवत त्या म्हणाल्या, ” नको काळजी करू एवढी. उद्या रात्रीपर्यंत इतकी धमाल कर, की घरी जाताना एकदम फ्रेश वाटलं पाहिजे. अधूनमधून इथे येत जा. वर्षातून एकदोनदा, दहा पंधरा दिवसांची सोलो ट्रीप कर. बघ तुझ्यात कसा आमूलाग्र बदल होतो की नाही ! शेवटी एकच कानमंत्र देते, जी गोष्ट सहज प्राप्य असते तिची किंमत नसते.”
— समाप्त —
लेखक – श्री श्रीपाद सप्रे
संग्रहिका : डॉ. भारती माटे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈