श्री विनायक कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ पहाट… ☆ श्री विनायक कुलकर्णी ☆
(लवंगलता..८-८-८-४)
☆
पेंगुळलेली निशा लाजरी लाजत लाजत गेली
दरवळलेली उषा हासरी हासत हासत आली
☆
समारोप हा काळोखाचा रंगछटांनी झाला
शशी फिकासा हळूहळू मग क्षणात लपून गेला
☆
धुंद गारवा मंद मारवा मिरवत अलगद आला
उंच अंबरी उजळत गेली शतरंगाची माला
☆
नभ सोनेरी जल सोनेरी सोन्याचे जग सारे
अलगद नकळत इथे जलावर कुणी शिंपले पारे
☆
सुरू जाहली कैक खगांची किलबिल किलबिल शाळा
समीर घुमतो इकडे तिकडे पायी बांधुन वाळा
☆
© श्री विनायक कुलकर्णी
मो – 8600081092
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈