प्रा. सुनंदा पाटील
जीवनरंग
☆ पाचवा कोपरा… भाग – 2 ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆
(मित्रांशी गप्पा मारून , नेट वरून श्रद्धा ताईंनी “मित्र परिवार” वृद्धाश्रम निवडला. आणि एक दिवस निश्चयाचा उजाडला.) इथून पुढे —
रात्रीच त्यांनी बॅग भरून ठेवली . दोन साड्या , दोनतीन मोजके ड्रेसेस आणि काही डायऱ्या , पुस्तकं , पेन बॅगेत टाकलं . बँकेचं पासबुक, चेकबुक , ए.टी.एम. कार्ड , आधार कार्ड , पॅनकार्ड , पासपोर्ट एका पाऊच मधे घातलं . ब्रश ,पेस्ट ,पावडर , टिकलीचं पाकीट , कंगवा घेतला. बॅग हॉलमधे ठेवली.
त्यांना मिळालेल्या एका छोट्या कपाटातील सामान वेगळ्या सुटकेस मधे भरून ठेवले . कपाट रिकामं केलं .
सर्वांचा सकाळचा नाश्ता , डबे तयार करून ठेवले. देवाची पूजा केली .
तोवर सकाळी तिघंही उठले . “आई ही बॅग ? कुठे निघालीस ?” असं मुलाने विचारलं . श्रध्दाताईने “मित्र परिवारचा” पत्ता सांगितला . म्हणाल्या , ” अरे वाईट वाटून घेऊ नका. सोहमला खोली हवीय. ती मी रिकामी केलीय. माझे अनेक मित्र मैत्रिणी आहेत परिवारात . स्वतंत्र खोली आहे तिथं. माझं छान निभेल तिथे. आणि याच शहरात आहे की मी. ही सोय आहे रे तात्पुरती .”
मुलगा दुखावला , पण सूनबाईला मात्र मनातून आनंद झाला होता. विना औषधीने खोकला गेला होता. सोहम आता मोठा असल्याने तो शाळेतून आल्यावर फ्लॅटचा दरवाजा उघडून आत येऊ शकत होता. सोहम लहान असतानाचे तिचे गरजेचे दिवस संपले होते.
लगेच ताईंनी कॅब बुक केली. कुणाचेच चेहरे न वाचता त्या लिफ्टने खाली आल्या.
मित्र परिवारात त्यांचं छान स्वागत झालं . दोन तीन दिवसातच त्या तिथे रुळल्या . नवीन तंत्रज्ञानाशी त्यांनी नोकरीत असतानाच जुळवून घेतलं होतंच . इथे आणखी टेक्नोसॅव्ही मित्र मिळाले. सोशल मिडियावर त्या ॲक्टिव्ह झाल्या. पेन्शन होतीच. तब्येतीची कुरकुर नव्हती. आता त्यांनी खरंखुरं आयुष्य जगायला सुरुवात केली होती.
इथे आल्यानंतर काही दिवसांतच एका पूर्वी लिहिलेल्या कादंबरीचं त्यांनी पुनर्लेखन केलं . रीतसर त्याचं पुस्तक झालं , ” पाचवा कोपरा ” .तीनच महिन्यात त्यांना तब्बल तीस लाखांची कमाई त्यांच्या पुस्तकाने करून दिली होती.
सकाळी त्यांनी ते चेक्स पेन्शन अकौंटला न टाकता मुलासोबतच्या अकौंटला टाकले. त्यांच्याच बँकेचे चेक्स असल्याने ते लवकरच जमा झाले . लंच ब्रेकमधे अचानक तीस लाखांचा क्रेडिट मॅसेज बघून मुलाचे डोळेच विस्फारले. त्याला कळेना हे कुठले पैसे? कारण एवढी मोठी रक्कम गोंधळात टाकणारी होती.
ऑफिसमधे सांगून त्याने सरळ बँक गाठली. तेव्हा त्याला एवढंच कळलं , की कुठल्या तरी प्रकाशन संस्थेचे ते चेक्स आहेत. पण आईकडे कसे? याचं उत्तर त्याला लगेच मिळालं नाही. तो घरी आला, पण पैशाबद्दल तो कुणाशी काहीच बोलला नाही .
कविता , कथा , कादंबरी , वैचारिक असं लेखन ताई करीतच राह्यल्या . आजवर मनात साठलेलं आता अक्षर रूप घेत होतं. पुस्तकं प्रकाशित होत होती.
काही काळातच ताईंच्या अकौंटने एक कोटीची रक्कम पार केली .
मुलाला बँकेचे क्रेडिट मेसेजेस येतच होते.
साहित्याच्या बागेतलं असं कोणतंच फूल नव्हतं , की ते ताईंजवळ नव्हतं . सर्व साहित्य प्रकारांवर त्यांचं प्रभुत्व होतं. सर्वत्र संचार होता ताईंचा.
आताशा रोजच वृत्तपत्र , टी व्ही वर ताई असायच्या. आणि मुलाला सर्व उलगडा होऊ लागला . मात्र आईला भेटायला जाण्याची हिंमत त्याच्यात नव्हती.
आवडत्या छंदात रमल्याने ताईंची तब्येतही आता छान होती. पैसा, आणि प्रसिद्धी चारही बाजुंनी येत होती. आताशा त्यांना कार्यक्रमांना “हो ” म्हणणं कठीण होई इतके कार्यक्रम येऊ लागले. प्रसिद्धीच्या वलयानं ताई आणखीच तेजस्वी झाल्या होत्या.
मुलाला सुनेला त्यांची चूक कळली होती. पण ते बोलू शकत नव्हते.
अशातच एक दिवस त्यांचे मुलाला पत्र आले . त्यांनी लिहिले होते ,” बाळ, सूनबाई आणि सोहम् ला धन्यवाद द्यायचेत मला. तुझ्या घरातून बाहेर पडल्यावरच मी स्वतः ला ओळखू शकले . तेही या वृद्धाश्रमात . आता मी खरी जगतेय. केवळ अन्न , वस्त्र , निवारा म्हणजे जगणं नव्हे . कला आणि साहित्याच्या क्षेत्रातल्या वावराने मला “मी ” कळले . माझ्यातली ऊर्जा मला जिवंत ठेवू शकली . तुम्हाला हवा तेवढा पैसा तुम्ही वापरून आता फोर बीएचके असं मोठं घर घेऊ शकता . कारण आपलं अकौंट जॉईन्ट आहे. आयदर ऑर सर्व्हायवर ऑपरेशन आहे. तू कितीही पैसे काढू शकतोस. तसेही शेवटी ते तुझेच आहेत. मला आता घराची गरज नाही . इथे मला ते मिळालंय . आणि महत्वाचं म्हणजे सम वैचारिक मित्र परिवार मिळाला . फक्त एक काम करशील माझं . काही आठवणीतले गरम कपडे आणि दुर्मिळ अशा आवश्यक पुस्तकांची एक बॅग तुझ्या घरीच आहे. शक्य असेल तर इथे आणून दे. तेवढीच भेट होईल आपली. बाळा , घराचा थकलेला *पाचवा कोपराही कधी कधी खूप उपयोगी ठरतो , हे लक्षात ठेव. सर्वांना आशीर्वाद ! थांबते. “
मराठी शब्दांची आणि वृद्धाश्रमाची ताकद आता बाळला आणि सुनबाईला कळली होती.
वृद्धाश्रम या शब्दाकडे कणव म्हणून बघितलं तर दया येते . संधी म्हणून बघितलं तर उत्तम तऱ्हेनं जगता येतं हे श्रद्धाताईंनी सिद्ध करून दाखवलं होतं.
सकाळी वृद्धाश्रमाच्या अंगणात ताई मित्रांसोबत चहा घेत बसल्या होत्या. तेवढ्यात दाराशी रिक्षा थांबली . रिक्षातून सुप्रसिद्ध कवयित्री विजया ब्रह्मे उतरत होत्या . आणखी एक पाचवा कोपरा स्वतःला सिद्ध करणार होता.
– समाप्त –
© प्रा.सुनंदा पाटील
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈