श्री विश्वास विष्णु देशपांडे
विविधा
☆ स्वदेशीचा जादू… भाग – ५ ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆
समृद्ध प्राचीन वारसा – ग्रामीण उद्योग
हेमाडपंती मंदिर पाहिल्यानंतर पिंकी आणि राजेश खुशीत होते. त्यातच खूप दिवसांनी उसाचा रस प्यायल्याने त्यांना आनंद झाला होता. गाडी घनदाट अशा अभयारण्यातून जात असल्याने प्रवासाची मजा काही औरच होती. एका ठिकाणी विश्रांतीसाठी जागा पाहून श्यामरावांनी गाडी थांबवली. ते ठिकाण डोंगरापासून अगदी जवळ होते. झाडांच्या गर्द सावलीत मध्यभागी मोकळी जागा होती. समोरच्या बाजूस असलेल्या भव्य डोंगररांगा लक्ष वेधून घेत होत्या. निरनिराळ्या पक्ष्यांचे आवाज कानावर पडत होते. मधूनच झाडांवर असलेली माकडे इकडून तिकडे मजेत उड्या मारीत होती. आपल्या छोट्या पिल्लाला छातीशी कवटाळून माकडिणी सुद्धा झाडांवर उड्या घेत होत्या. ते सगळे पाहून पिंकी आणि राजेशला खूपच गंमत वाटली. त्यांनी आपल्याजवळील बिस्किटे, घरून आणलेल्या नारळाच्या वड्या त्यांना खाण्यासाठी दिल्या.
मोकळी हवा, गर्द झाडी, प्रदूषणरहित आणि शांत वातावरण मन प्रसन्न करीत होते. श्यामरावांनी आपल्याजवळील कॅमेऱ्याने भोवतालच्या निसर्गाचे सुरेख चित्रीकरण केले. आता सगळ्यांनी झाडांच्या सावलीत असलेल्या मोकळ्या जागी सतरंजी टाकून जेवणाचा आस्वाद घ्यायचे ठरवले. सगळ्यांनाच भूक लागली होती. श्यामलाताईंनी घरून निघताना जेवणाची सगळीच तयारी करून घेतली होती. तांबड्या भोपळ्याच्या दशम्या, पोळ्या, वांग्याचं भरीत, शेंगदाण्याची चटणी, घरीच लावलेले मस्तपैकी दही, जोडीला नारळाच्या वड्या असा फर्मास बेत होता. रोज डायनिंग टेबलवर जेवण घेऊन कंटाळलेल्या मुलांना हे वनभोजन फारच आवडले.
श्यामराव म्हणाले, ‘ पिंकी आणि राजेश, जरा नीट ऐका मी काय म्हणतो ते ! आपण परत जाताना आलो त्याच रस्त्याने जायचं की जवळच एक छानसं खेडं आहे, त्या बाजूने जायचं ? तिथे माझा सोपान म्हणून एक मित्र राहतो. त्यालाही भेटता येईल. जाताना तुम्हाला रस्त्याने शेतं पण बघायला मिळतील. ‘
‘अहो बाबा, विचारताय काय ? आम्हाला तर ते खेडेगाव, शेती बघायला आवडेलच. आपण तिकडूनच जाऊ. ‘ पिंकी म्हणाली. राजेशने तर आज मज्जाच मज्जा म्हणून टाळ्या वाजवल्या. सगळे गाडीत जाऊन बसले. श्यामलाताईंनी आपल्या मोबाईलमध्ये जुनी गाणी लावली होती. त्यांना जुनी मराठी गाणी खूप आवडायची. ‘ ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी व्हाऊ दे…’ या गाण्याचा व्हिडीओ त्या पाहत होत्या. पिंकी आणि राजेश कुतूहलानं आई काय पाहतेय हे बघत होते. त्या गाण्यातील लोहाराचा भाता, ऐरण मुलं कौतुकानं बघत होती. गाणं संपलं. पिंकी म्हणाली, ‘ आई, हे गाणं किती छान आहे नाही. आणि गाण्यातली माणसं किती साधी आहेत ! ‘ आई म्हणाली , ‘ पिंकी, अग हे गाणं ज्या चित्रपटात आहे, त्या चित्रपटाचं नावसुद्धा ‘ साधी माणसं असंच आहे. ‘
‘अरे वा, किती छान ! ‘ पिंकी म्हणाली.
‘आई, हे गाणं लता मंगेशकर यांनी गायलं आहे ना ? ‘ राजेश म्हणाला.
‘हो, बरोबर आहे राजेश. पण आणखी एक गंमत आहे बरं का ! ‘
‘कोणती गंमत, आई ? सांग ना . ‘ राजेश म्हणाला.
‘अरे या गाण्याचं संगीत ऐकलंस ना ! किती छान आहे. हे संगीत कोणी दिलं माहिती आहे का ?
‘कोणी तरी प्रसिद्ध संगीतकार असतील त्या काळातले, ‘ पिंकी मध्येच म्हणाली.
‘बाळांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल पण या गाण्याच्या संगीतकार लतादीदीच आहेत. त्यांनी ‘आनंदघन ‘ या नावाने काही चित्रपटांना संगीत दिलं होतं ‘ श्यामलाताई म्हणाल्या.
तेवढ्यात गाडीने एक वळण घेतले आणि दूरवर गावाच्या खुणा दिसायला लागल्या. थोडं अंतर गेल्यानंतर एका मोठ्या कमानीतून गाडी आत शिरली. एका मोठ्या चिंचेच्या झाडाखाली शयमरावांनी गाडी पार्क केली. या गावात श्यामरावांचा बालमित्र सोपान राहत होता. श्यामराव आल्याचं कळताच सोपान मोठ्या आनंदानं त्यांच्या स्वागतासाठी पुढे झाला. दोन्ही मित्रांची खूप दिवसांनी भेट होत होती. दोघांनीही एकमेकांना घट्ट मिठी मारली.
श्यामराव म्हणाले, ‘ अरे सोपान, ही माझी मुलं. त्यांना एखादं खेडेगाव बघावं असं वाटत होतं. म्हणून तुझ्याकडे हक्काने आणले त्यांना. त्यांना जरा गावातून फिरवून आणू या. ‘
‘अरे हो पण आधी आपण घरी जाऊ. तुम्ही सगळे फ्रेश व्हा. मग जाऊ की मुलांना गाव दाखवायला. ‘ सोपान म्हणाला.
सोपानच घर म्हणजे एक जुना वाडा होता. दगडी बांधकाम आणि लाकडाचं छत. घरात स्वच्छता, उजेड भरपूर होता. बाहेरच्या उन्हाचा अजिबात ताप जाणवत नव्हता. निर्मलावहिनींनी सगळ्यांना घर दाखवलं. निर्मलावहिनी सगळ्यांसाठी गूळ घातलेलं कैरीचं पन्हं घेऊन आल्या. सगळ्यांच्या छानपैकी गप्पा झाल्या. श्यामलाताई मुलांना म्हणाल्या, ‘ बाळांनो, सोपानकाकांचं घर नीट पाहिलंत का ? ‘
‘हो आई,’ पिंकी आणि राजेश म्हणाले.
‘बाळांनो, तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का ? सोपानकाकांकडे फ्रिज नाही. ‘ श्यामलाताई म्हणाल्या. ‘ ‘ अग आई, खरंच की. ही गोष्ट लक्षातच आली नाही आमच्या. ‘ पिंकी म्हणाली.
बाळांनो, आता आपण कैरीचं पन्हं घेतलं. किती चवदार होतं ते ! थम्स अप, कोका कोला,पेप्सी यासारखी कृत्रिम शीतपेयं पिण्यापेक्षा घरीच बनवलेलं कैरीचं पन्हं, लिंबाचं सरबत, कोकम सरबत, यासारखी पेयं शतपटीनं आरोग्यदायी असतात. कृत्रिम शीतपेयात मोठ्या प्रमाणावर साखर आणि घातक रसायने असतात. शिवाय फ्रिजपेक्षा माठातील पाणी आरोग्याला अतिशय चांगले असते. ‘
‘व्हय व्हय पोरांनो, तुमची आई सांगते ते बरोबर आहे बरं का. आणि एक सांगतो. आमच्याकडे कोणीच चहा घेत नाही. गोठ्यात गाई आहेत. त्यांचे ताजे दूध असते. घरीच बनवलेलं ताक, दही आम्ही वापरतो. शेतातील ताज्या भाज्या, फळे आम्ही खातो. फ्रिजची गरजच नाही. ‘ श्यामराव हसत हसत म्हणाले, ‘ हे आमच्या सोपानरावांच्या उत्तम तब्येतीचं रहस्य आहे म्हणायचं. ‘
‘व्हय की. श्यामभाऊ आम्ही काही मोठा आजार असला तरच शहरात डॉक्टरकडे जातो. नाहीतर आम्हाला साधी गोळी बी म्हाईत नाय. ‘
मग सोपानकाका म्हणाले, ‘ चला रे मुलांनो. आमचं गाव दावतो तुम्हाला. तुमच्या शहरासारखं मोठं नाही बरं का ! बघा, आवडतं का तुम्हाला. ‘
श्यामराव म्हणाले, ‘ सोपान, अरे आम्ही पण येतो की. आपण सगळेच जाऊ. ‘
श्यामलाताई पण तयारच होत्या. सगळेच निघाले. गावात छोटी छोटी घरं होती. काही मातीची, काही सिमेंटची. काही घरे उंच अशा दगडी ओट्यावर होती. मुलांना मजा वाटत होती. गावाच्या एका कोपऱ्यात रामू लोहार राहत होता. एका उंच दगडी ओट्यावर त्याचे घर होते. मुले तिथे पोहोचली तेव्हा रामू कामच करीत होता. एका हाताने तिथे असलेला भाता खालीवर होत होता. त्याच्या हवेने भट्टीतील निखारे लालभडक फुलले होते. त्या भट्टीत त्याने काहीतरी लोखंडाची वस्तू ठेवली होती. ते सगळं पाहून मुलं काही काळ तिथं थबकली.
सोपानकाका म्हणाले, ‘ हे बघायचं का रे बाळांनो. ‘
पिंकी, राजेश दोघेही एकदम हो म्हणाले. शहरात त्यांना असं काही बघायला मिळत नव्हतं. पिंकीला आईने मघाशी लावलेलं गाणं आठवलं. ती म्हणाली, ‘ आई, आपण त्या गाण्यात पाहिलं, अगदी तसंच आहे ना इथे ! ‘
‘अगदी बरोबर आहे पिंकी. आता तू आणि राजेश बघा ते काका कसं काम करताहेत ते ! ‘ आई म्हणाली.
रामुकाकांनी मग भट्टीतील ती वस्तू बाहेर काढली. ती तापून चांगलीच लाल झाली होती. रामुकाकांनी एका मोठ्या सांडशीत पकडून ती ऐरणीवर ठेवली आणि आपल्याजवळ असलेल्या मोठ्या लोखंडी घणाने ते त्यावर घाव घालू लागले. तसतसा त्या वस्तूला आकार यायला लागला. कोणीतरी आज आपल्याकडे आपलं काम बघायला आलं आहे याचा रामुकाकांना कोण आनंद झाला होता. ‘ पोरांनो, वाईच बसा की. समदं नीट बघा. हेच आमच्या रोजीरोटीच साधन, ‘
‘काका, तुम्ही काय बनवताय ? ‘ राजेशनं विचारलं.
‘पोरा, आता शेतीचा हंगाम सुरु व्हईल. मंग वावरात कामासाठी निंदणीसाठी, कंपनीसाठी विळे, खुरपं लागत्यात. त्येच मी बनवतो आहे आता. शेतीसाठी, बैलगाडीसाठी लागणाऱ्या वस्तू बी बनवतो म्या.बैल, घोडे यांच्या पायामंदी नाल ठोकावी लागते. त्ये बी बनवतो. घरात लागणारी विळी, खलबत्ता, अडकित्ता आणि काय काय समदं बनवतो म्यां. पण आता आमचा धंदा लई कमी झालाय. लोकं मोठ्या गावात जाऊन वस्तू घेत्यात. ‘
मग रामूने आपण बनवलेल्या वेगवेगळ्या वस्तू मुलांना दाखवल्या. मुलं मोठ्या कौतुकानं ते पाहत होती. कारखान्यात बनणाऱ्या वस्तूपेक्षा एखादा कारागीर जेव्हा हाताने वस्तू तयार करतो, तेव्हा त्याला किती मेहनत घ्यावी लागते याची जाणीव मुलांना ते पाहून झाली. राजेश आणि पिंकीच्या मनात खूप सारे प्रश्न होते. श्यामलाताई म्हणाल्या, ‘ बाळांनो, आता सगळं व्यवस्थित बघून घ्या. मग जाताना मी तुम्हाला आणखी छान छान माहिती देणार ! ‘
आपल्या छोट्याशा बागेत काम करण्यासाठी मग श्यामरावांनी त्याच्याकडून एक कुदळ, एक फावडे आणि एक विळा विकत घेतला. रामूलाही खूप छान वाटले.
‘ मुलांनो, झालं का तुमचं समाधान ? आता आपण दुसरीकडे जाऊ. ‘ सोपानकाका म्हणाले.
मग सगळेच सोपानकाकाबरोबर पुढे निघाले. राजेश आणि पिंकीला आता सोपानकाका आणखी काय दाखवतात याची उत्सुकता होती.
क्रमशः…
©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे
चाळीसगाव.
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈