वाचताना वेचलेले
☆ सगळ्यांना कशाला मिळायला हवा आहे शून्य? – ॲड. ऋचा मायी ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆
‘मुलांना एका विशिष्ट उंचीवरून सुरूवात करता आली तर आकाशाला हात लावणं सोपं होईल का? आपण दिलेल्या सोयींचा, वस्तूंचा देतानाच जर महत्त्व समजावून दिले तर मुलं त्याचा गैरवापर करत नाहीत असं माझं मत. नक्की सांगा तुमचे अनुभव, तुमची मतं.
प्रत्येकानेच शून्यापासून सुरूवात केली तरच ते यशस्वी होतात हे पटतं का तुम्हाला? की मुलांनाही पालकांच्या कष्टाची जाणीव असते ?
नक्की सांगा काय वाटतं?’
– ॲड. ऋचा मायी
सगळ्यांना कशाला मिळायला हवा आहे शून्य?
“बाबा मला बाईक हवी आहे. आजूबाजूला जायला बरी पडते, ऑटोमधे उगाच सारखे पैसे फार लागतात. ” कार्तिक बाबांना म्हणाला.
“अरे मग चाल की जरा, जवळपास जायला बाईक कशाला हवी? तुझे आजोबा दहा दहा मैल चालायचे रोज आणि तुझ्या बाबाला पण आम्ही बाईक दिली नव्हती, बसने जायचं किंवा सरळ चालत.
हे आजकाल नुसती चावी फिरवायची की निघायचं, ह्यामुळेच आजार वाढत चालले आहेत. तुम्ही आजकालची पिढी म्हणजे कठीण आहे. कॉलेजात पाय ठेवत नाही तर मागण्या सुरू. ” जुन्या काळात काटकसरीने, निगुतीने संसार केलेली आजी नातवाची कानउघाडणी करत होती.
“अगं आजी माझं कॉलेज बघ किती मोठं आहे! नुसतं हॉस्टेलपासून क्लासमधे जायचं तर भरपूर चाललं जातं. परत सुट्टीच्या दिवशी कुठे जायचं ठरतं मित्रांचं, मग सगळ्यांकडे वाहन असतं, फक्त माझ्याकडे नाही. मग ह्याला गळ घाल, त्याला गळ घाल करावं लागतं उगाच. बाबाला घेणं शक्य आहे म्हणूनच मागितली बाईक. ”
कार्तिक जरा वैतागला होता पण आजीशी आवाज वाढवून बोलायचा रिवाज नव्हता देशपांडेंकडे, थोडं ठसक्यात तो आपला मुद्दा सोडत नव्हता इतकंच.
“तुम्ही ते हायफाय कॉलेज निवडलं ना तेव्हाच खरं तर मला पटलं नव्हतं, मी बोलले पण होते बाबाला. आता सगळे चोचले पुरवावे लागतील देखादेखीमधे. आज बाईक, उद्या ब्रँडेड कपडे, परवा अजून काही, अभ्यास करायला गेला आहात एवढं ध्यानात ठेवा म्हणजे झालं. ”
आजीच्या बोलण्यात नातवाबद्दल धाकधूक दिसत होती. आपण खर्चाला मोकळीक दिली म्हणजे मुलं बिघडतात, हा एक साधा हिशोब पिढ्यानुपिढ्या ऐकत आली होती ती.
नातवावर प्रचंड जीव होता, त्यामुळेच त्याचं पाऊल कुठेच घसरता कामा नये ह्यासाठी तिला काहीही विचारलेलं नसताना तिचे सल्ले सुरूच होते.
“मुलांना जितकं आपण तावून सुलाखून वाढवतो तितके ते तयार होतात, जितके जास्त त्यांचे नखरे पुरवाल तितके अंगाशी येईल महेश, अनुभवाचे बोल आहेत हे. नका त्यांच्या सवयी बिघडवू.
आजोबा जर करू शकतात मेहनत, बाप जर करू शकतो तर मुलगाही करूच शकतो ना?”
आजी जरा आता ताणते आहे हे दिसल्यावर कार्तिक ने तिथून मी क्रिकेट खेळायला जात आहे सांगून पळ काढला.
“आई, अगं हे सगळं त्याच्यासमोर बोलायची काय आवश्यकता होती? मी काही लगेच बाईक देणार नव्हतोच पण जरा त्याच्या कलाने घेऊन समजावलं असतं ना. सगळ्या मित्रांकडे आहे तर वाटतं मुलांना. ” बाबांनी कार्तिकची बाजू घेत म्हणलं.
“पालकांना आपलं मूल बरोबर माहित असतं, कार्तिक अत्यंत विचारी मुलगा आहे आणि त्याला मिळालेल्या प्रत्येक संधीच, सुखसोयींचं तो सोनंच करेल ह्या आजोबाचे पण अनुभवाचे बोल आहेत.
हजारो मुलं गेली आहेत डोळ्याखालून इतके वर्षाच्या शिक्षकी पेशात नजर तयार आहे माझी. वाहीयात मुलं एका नजरेत ओळखू येतात. “
“आजोबा थॅन्क यू” म्हणत क्रिकेट खेळून घरात शिरणाऱ्या कार्तिकने पळत येऊन आजोबांना मिठी मारली.
आजोबांनी दाखवलेल्या विश्वासामुळे बळ तर मिळालं होतं पण एक जबाबदारी पडली होती खांद्यावर, मेहनत करून शून्यापासून पन्नास पर्यंत पोहोचलेली देशपांड्यांची गादी लवकरात लवकर शंभरी पार न्यायची.
लाखाचे बारा हजार करणारी आमची पिढी नाही हे आता सिद्ध करायचं ठरवलं होतं त्याने.
बाबा म्हणाले, ”आई ऑफिसहून आली की जाऊ बाईक बघायला, मग पुण्याला पोहोचलास की तिथेच डिलीवरी मागवू. ”
आजीने बटव्यातून पैसे काढून नातवाच्या हातात ठेवत म्हणलं, ”बाईकच्या आधी हेलमेट घ्यायचं कार्तिक, त्याच्याशिवाय चालवली ना तर आजीशी गाठ आहे. ”
कार्तिकला आजीचा विरोध मावळलेला बघून मनापासून आनंद झाला होता. आता एक डगर आई आल्यावर लढावी लागणार होतीच. कारण बाईक म्हणलं की आईचा विरोध असणार होता. लाड म्हणून नसला तरी सुरक्षिततेसाठी नक्कीच असणार होता. पण आई घरी यायच्या आधी आजी तयार झाली असल्याने आईला मनवणे सोपे जाणार होतं आणि नाहीतर आजोबा होतेच, हुकमी एक्का!
लेखिका – सुश्री ऋचा मायी
दिल्ली
संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈