सुश्री शोभना आगाशे

? काव्यानंद ?

☆  हिंदुनृसिंह…. स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

☆  हिंदुनृसिंह…. स्व. वि. दा. सावरकर ☆

हे हिंदुशक्ति-संभूत-दिप्ततम-तेजा

हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा

हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतिच्या साजा

हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा

करि हिंदुराष्ट्र हें तूतें । वंदना

करि अंतःकरण तुज, अभि – नंदना

तव चरणिं भक्तिच्या चर्ची। चंदना

गूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या

हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा

 

हा भग्न तट असे गडागडाचा आजी

हा भग्न आज जयदुर्ग आसवांमाजी

ही भवानीची ह्या पुन्हा गंजली धारा

ती म्हणुनि भवानी दे न कुणा आधारा

गड कोट जंजिरे सारे । भंगले

जाहली राजधान्यांची । जंगले

परदास्य – पराभवि सारी । मंगले

या जगती जगू, ही आज गमतसे लज्जा

हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा

 

जी शुद्धि हृदाची रामदास शिर डुलवी

जी बुद्धि पांच शाह्यांस शत्रुच्या झुलवी

जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी

जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी

ती शुद्धि हेतुची कर्मी । राहुं दे

ती बुद्धि भाबड्या जिवां । लाहुं दे

ती शक्ति शोणितामाजीं । वाहुं दे

दे मंत्र पुन्हा तो दिले समर्थें तुज ज्या

हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा

 –  कवी – वि. दा. सावरकर

☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

प्रस्तुत कविता स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ते रत्नागिरी येथे स्थानबद्ध असताना १९२६ मधे लिहिली आहे. (ते शाळकरी असताना लिहिली असा कांही लोकांचा गैरसमज आहे.)

या कवितेत प्रखर बुद्धिमंत सावरकरांनी फारशा प्रचलित नसलेल्या पण चपखल अशा मराठी व संस्कृत शब्दांचा वापर केला आहे. उदा. संभूत, दिप्तितम, चर्ची, गूढाशा, शोणित इ. या कवितेची रचना भूपतिवैभव या मात्रावृत्तात केलेली आहे.

छत्रपती शिवाजीमहाराज हे भारतीयांचे स्फूर्तिस्थान आहेतच पण त्यांच्याविषयी सावरकरांसारखा प्रखर देशभक्त जेंव्हा स्फुर्तीगीत लिहितो तेंव्हा ते महाराजांच्या भवानी तलवारीसारखं तेजःपुंज व धारदार होतं. पं. हृदयनाथ मंगेशकर व गानकोकिळा लता मंगेशकर या द्वयीने हे गीत स्फूर्तिदायक व रोमांचक बनवण्यात मोलाचं योगदान दिलेलं आहे. त्यांचे सूर व संगीत इतकं अर्थवाही आहे की गीत ऐकल्यानंतर कुणीही भारतीय रोमांचित झाल्याशिवाय रहात नाही. या तीन कडव्यांच्या गीताच्या पहिल्या कडव्यात महाराजांचं स्तुतीपर वर्णन करून त्यांना वंदन केलेलं आहे. दुसर्‍या कडव्यात हिंदुस्थानातील सद्यस्थितीचं (त्या काळातलं -१९२६ मधलं) वर्णन केलं आहे आणि तिसऱ्या कडव्यात महाराजांकडं मागणं मागितलेलं आहे. जेणेकरून आपला स्वातंत्र्य लढा यशस्वी होईल.

पहिल्या कडव्यात ते महाराजांचं वर्णन ” हिंदूंच्या शक्तीतून प्रकट झालेलं तेज, हिंदूंच्या वर्षानुवर्षांच्या तपस्येचं फलित म्हणून जन्मलेला तेजःपुंज ईश्वरी अवतार, हिंदुदेवतेचा सौभाग्यालंकार, नरसिंहाप्रमाणे दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी अवतरलेला प्रभूचा अवतार” असं केलं आहे. आणि ते म्हणतात हे हिंदुराष्ट्र तुला वंदन करीत आहे, चंदनाचा लेप लावून तुझं पूजन करीत आहे, अंतःकरणपूर्वक अभिनंदन करीत आहे. सावरकर म्हणतात, ” माझ्या मनात ज्या गूढ आशा आहेत त्या मी तुला कथन करू शकत नाही. तरी त्या ओळखून, हे नृसिंहाचा अवतार असणाऱ्या शिवाजीराजा माझ्या या इच्छा तू पूर्ण कर. ” ही कविता लिहिली तेंव्हा सावरकर स्थानबद्धतेत असल्यामुळे स्वातंत्रप्राप्तीची इच्छा प्रकट करू शकत नव्हते म्हणून ‘गूढाशा’ हा शब्द वापरला आहे.

दुसर्‍या कडव्यात परकीय आक्रमणामुळे देशाच्या झालेल्या दुरावस्थेचं वर्णन केलं आहे. महाराजांनी निर्माण केलेल्या, जतन केल्या गड किल्ल्यांची अवस्था सांगितली आहे. कुठे तट भंगले आहेत, गड, कोट, किल्ले, जंजिरे भग्न पावले आहेत, राजधान्यांची जंगले झाली आहेत, साऱ्या मंगलगोष्टी परदास्यामुळे पराभूत झाल्या आहेत. महाराजांसारखे वीरपुरूष नसल्यामुळे भवानी तलवारीची धार गंजली आहे. अशातच आई भवानीही आधार देत नाही. अशा या जगात जगणं अत्यंत लज्जास्पद झालं आहे.

तिसऱ्या कडव्यात सावरकर म्हणतात, ” ज्या शुद्ध हृदयाच्या राजाला रामदास स्वामींनी आपलंसं केलं होतं, ज्या बुद्धिमान राजाने विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, बिदरची बरीदशाही व वऱ्हाडची इमादशाही अशा पाच शाह्यांना ‘त्राहि भगवान’ करून सोडलं होतं, जो राजा कूटनीतीचा युक्तीने उपयोग करून, वेळप्रसंगी तह करून, बलवान शत्रुला गाफील ठेऊन पराभूत करीत असे ; त्या राजाची अंतःकरणाची शुद्धी आमच्या कृतीत उतरू दे. ती बुद्धी माझ्या भाबड्या देशबांधवांना लाभूदे. ती शक्ती आमच्या नसानसातून (रक्तातून) वाहू दे. हे राजा, जो स्वराज्याचा मूलमंत्र तुला समर्थ रामदास स्वामींनी दिला, तो मंत्र तू आम्हाला दे. म्हणजे त्या मंत्रसामर्थ्याने, ती शक्ती व युक्ती वापरून, त्या शुद्धी व बुद्धीच्या योगाने आम्ही हिंदुस्थानचे बांधव परकियांना येथून हुसकावून स्वातंत्र्यप्राप्ती करून घेऊ. “

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments