सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 195
☆ भेटीगाठी… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
☆
काही भेटीगाठी…
असतात सुखाच्या..निखळ आनंदाच्या !
पन्नास वर्षानंतर..
भेटलो शाळेच्या प्रांगणात !
आणि आठवले शाळेचे,
फुलपंखी दिवस..
भुर्रकन उडून गेलेले !!
किती बरं झालं असतं ?
असं झालं असतं तर…
किती बरं झालं असतं…
तसं झालं असतं तर…
क्षणभर चमकून गेले
हे विचार…
नियतीने बहाल केलेले…
हे गाठीभेटीचे क्षण
किती अनमोल,
या जर तर च्या
गुंत्यात न अडकता…
मनमुक्त घेतलेल्या…
त्या आनंदाची
शाल पांघरून,
मिरवत रहावं,आयुष्यभर
गाठीभेटीच्या गोड क्षणांसह !
कारण घडून गेलेलं
खोडून टाकता येत नाही,
हे ही…आणि ते ही !
☆
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈