? वाचताना वेचलेले ?

☆ “आधिपत्य…”  ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

दोघेही खूप दिवसांनी जोडीने मॉलमध्ये गेले होते, एरवी मुलं बसमधून शाळेत गेली, की तो ऑफिसमध्ये जाई आणि ती घरातलं काम आवरे.सासू, सासऱ्यांना वेळेवर नाष्टा आणि जेवण देण्यासाठी भराभर कामं आटोपण्याच्या मागे ती लागे. पण आजचा दिवस खूप वेगळा होता तिच्यासाठी.मुलांची बस येणार नव्हती.सासू सासरे एका लग्नासाठी दोन दिवस गावी गेलेले आणि त्याला सुट्टी होती.तो म्हणाला, “सकाळी लवकर आटोपून घे, मुलांना शाळेत सोडू आणि तसंच फिरायला जाऊ परस्पर, येताना मुलांना घेऊन येऊ.”

नेहमीच्या रुटीनपेक्षा वेगळा दिवस म्हटल्यावर तिला चुकल्या चुकल्यासारखं झालं. लग्नानंतर फिरायला गेलेले दोघे.त्यानंतर बहुधा पहिल्यांदाच दोघे बाहेर जात होते.एरवी जात, पण लग्न समारंभात किंवा वाढदिवसालाच फक्त… नाहीतर सासू सासरे सोबत असताना.

तिने छानपैकी तयारी केली.  दोघेही निघाले. मुलांना शाळेत सोडलं. तिला खूप वेगळं वाटत होतं.स्वयंपाकाला उशीर होईल, घरातली कामं बाकी आहेत याची हुरहूर लागली , पण मग सासू सासरे घरात नाहीत,असं आठवलं नि परत निर्धास्त झाली.

त्याने मॉलकडे गाडी वळवली. मॉलमधले मोठमोठे शॉप्स बघत दोघे चालत होते.ती तिथल्या बायकाही बघत होती.

वेगवेगळ्या प्रकारचे शॉर्टस, वनपीस.मेकप मध्ये असलेल्या तिच्याहून अधिक वयाच्या बायका. एकदम मॉडर्न.अन तिला उगाच वाटत होतं की आज तिनेच छान तयारी केली होती.जग खूप पुढे गेलेलं, स्त्रिया खूप बदलल्या होत्या, पण ती अजूनही तशीच होती. पंजाबी ड्रेस, अंगभर ओढणी, साईडच्या दोन लट मध्ये घेऊन लावलेलं क्लचर…

एका दुकानापाशी थांबली.होम डेकोरचं साहित्य होतं तिथे. ती हात लावून एकेक बघत असताना तो म्हणाला, “साधं प्लास्टिक आहे हे. काही कामाचं नाही. चल इथून.” दुसरीकडे प्लॅस्टिक नसून एक चांगल्या क्वालिटीचं  मटेरियल होतं, “हे मटेरियल वेगळं वाटतंय ना जरा?”

“काही वेगळं नाही, तुला नाही समजत त्यातलं.तू चल इथून.”

ती निघाली,

पुढे एका भांडयांच्या दुकानात ती थांबली,

चांगल्या धातूच्या सुंदर कढया बघू लागली,

पोहे करायला एक कढई लहान व्हायची तिला, आणि भाजीला दुसरी कढई मोठी व्हायची, ही कढई अगदी परफेक्ट दिसतेय, तिला आनंद झाला.

तो म्हणाला, “जड आहे खूप.”

“चांगल्या धातूची दिसतेय म्हणून.”

“असं काही नसतं.तुला नाही कळत त्यातलं.चल.”

तिने कढई तिथेच ठेवली आणि पुढे निघाली.

नाष्टा करण्यासाठी ते टेबलापाशी बसले.

ती म्हणाली, ” मी मुलं खातात, तसा पिझ्झा खाणार.”

तो म्हणाला, “मी ऑर्डर देऊन येतो.”

“मी जाऊ का? तुम्ही बसा.”

तो हसला,”तुला नाही जमणार.मॉल मध्ये आहोत आपण.कोपऱ्यावरच्या साई वडापाववाल्याकडे नाही.”

तीही हसली.तिनेही आपलं ‘न जमणं’ मान्यच केलेलं.

तो काउंटर वर गेला.गर्दी होती तिथे.

ती आजूबाजूला बघू लागली.

एका ठिकाणी एक कार्यक्रम चालू होता.

मॉलमध्ये त्या फ्लोरच्या मधोमध एक छोटासा स्टेज होता. आजूबाजूला बरीच गर्दी होती.माईकवरुन आवाज येत होता.

काय असेल? तिला कुतूहल वाटलं.

नवरा लाईनमध्ये उभा होता. त्याला वेळ लागेल हे लक्षात येताच ती स्टेजजवळ गेली.

“Now next contestant? Please step forward.”

तिथे वेगवेगळे खेळ खेळले जात होते. सगळ्या सो कॉल्ड मॉडर्न बायका हिरिरीने भाग घेत होत्या. ती बघायला पुढे गेली आणि स्पर्धकांमध्ये केव्हा लोटली गेली, तिला नाही.तिथल्या मुलांनी ती आणि तिच्या बाजूच्या चार बायकांना पुढे यायला सांगितलं तसा तिला घाम फुटला.

अरे देवा, हे कुठलं संकट…!

ती मागे फिरू बघत होती, पण तो मुलगा ओरडला,

“ओह मॅडम, तिकडे कुठे? इकडे या.”

ते ऐकून ती अजूनच घाबरली.

स्टेजवर जाऊन आपल्या नवऱ्याला शोधू लागली. तो अजून लाईनमध्येच होता आणि त्याचं लक्षही नव्हतं.

त्या पाच बायकांना एक खेळ खेळायचा होता.

 

इंग्रजीमधले अवघड स्पेलिंग त्यांना बोर्डवर लिहायला लावणार होते. ज्याचं चुकलं तो आऊट होणार होता.

तिला दरदरून घाम फुटला.

सगळ्या बायका शिकलेल्या, इंग्रजी बोलणाऱ्या, तिला कुठे काय येत होतं?

त्यांना पहिला शब्द दिला-

लेफ्टनंट.

सगळ्या बायकांनी बोर्डवर लिहिलं.

तिला आठवलं,

सासऱ्यांचा एक मित्र लेफ्टनंट होता.त्याची बातमी इंग्रजी वृत्तपत्रात छापून आलेली.तिने ती बातमी आणि नाव खूप वेळा वाचून काढलेलं.

तिने बरोबर स्पेलिंग लिहिलं.

बाकीच्या 2 जणी आऊट झाल्या, 3 उरल्या,

पुढचं स्पेलिंग- बुके.

तिला आठवलं, मुलांचे तपासलेले पेपर घरी आलेले, तेव्हा मुलाने हे स्पेलिंग चुकवलं होतं. टीचरने करेक्ट स्पेलिंग लिहून दिलं.ते तिच्या लक्षात होतं.

एक बाई आऊट झाली.

आता फक्त ती आणि दुसरी एक बाई उरली.

पुढचं स्पेलिंग- रेस्टरन्ट.

तिच्या डोक्याला मुंग्या आल्या.सगळं गरगर फिरायला लागलं, तिला हे काही येत नव्हतं.डोळ्यात पाणी जमू लागलं.

नवीन लग्न झालं तेव्हा सासरचा जाच ती आईकडे बोलून दाखवायची, तेव्हा आई बोलायची ते वाक्य आठवलं, “उत्तरं आपल्या आजूबाजूलाच असतात.

फक्त नजर तीक्ष्ण हवी.”

तिला येईना. तिने आजूबाजूला पाहिलं.

लक्षात आलं, नवरा जिथून ऑर्डर घेत होता तिथेच वर लिहिलं होतं,

“कॉंटिनेंटल रेस्टोरेंट.”

तिने ते वाचलं, बोर्डवर लिहिलं.

दुसऱ्या स्त्रीने चुकवलं होतं,

ती जिंकली.

सर्वांनी टाळ्या वाजवल्या.

तिकडे नवरा ट्रे घेऊन बायकोला शोधत होता,

माईकवर तिचं नाव ऐकलं, तसा तो ट्रे टेबलवर ठेवून तिकडे पळाला.

त्याला सगळं समजलं. तो हैराण झाला.

सर्वांनी तिचं अभिनंदन केलं.सोबतच्या मॉडर्न आणि इंग्रजी बोलणाऱ्या बायकांना ही साधी स्पेलिंग जमली नव्हती. मॉडर्न कोणाला म्हणावं मग? तिला प्रश्न पडला…

ती आनंदाने त्याच्यापाशी आली,”तू आणि इंग्रजी स्पेलिंग खेळात जिंकलीस? पहिली दुसरीतली स्पेलिंग विचारलेली की काय? हा हा हा.” तो या गोष्टीकडे गंमत  म्हणून बघून हसत होता.

“अशी स्पेलिंग होती, जी तुम्हालाही जमली नसती.”

“मग तुला कशी जमली?”

“कसं आहे ना,

आजवर तुला काही जमणार नाही, तुला काही समजत नाही, तुला काही येत नाही, हेच ऐकत होते. आणि त्यावर माझाही विश्वास बसलेला.तुम्ही सोबत होतात तेव्हा याच गैरसमजात असायचे मी.पण आज तुमच्यापासून काही काळ दूर गेले आणि मी स्वतःला गवसले.कदाचित, उशिराच…”

तो खजील झाला, त्याच्या नजरेत ते दिसू लागलं..

नजर चुकवत तो पिझ्झा खाऊ लागला.सोबत आलेलं सॉस चं छोटं पॅकेट फोडायचा प्रयत्न करू लागला. काही जमेना..

तिने त्याच्या हातातून ते घेतलं आणि म्हणाली,

“सोडा, तुम्हाला नाही जमणार.”

जोडीदाराचा प्रयत्न असला पाहिजे की माझ्याइतकाच माझा जोडीदार सक्षम व्हायला हवा, प्रत्येक ठिकाणी जोडीदाराला कमी समजून स्वतः पुढे होणं याला संसार नाही, आधिपत्य गाजवणं म्हणतात.

प्रस्तुती : सौ.शामला पालेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments