सौ.मंजुषा आफळे
विविधा
☆ भारतमातेस पत्र… 🇮🇳 ☆ सौ. मंजुषा आफळे ☆
हे भारत माते,
……. शि. सा. न. वि. वि.
आई तुझी आठवण नित्यनेमाने येते. तुझ्या पोटी जन्मलो आम्ही खूप भाग्यवान आहोत. रोज तुला नमन करूनच, आम्ही उद्योगाला सुरुवात करतो. चंदेरी मुकुट धारण केलेली निळसर झोपाळ्यावर, हिरवीगार पैठणी नेसलेली तू किती भारदस्त व मोहक दिसतेस.!! अवघ्या विश्वात शोभून दिसतेस.!!
तुझी लेकरे आम्ही सर्व भारतवासी सुखी, आनंदी व समाधानी आहोत. तू दिलेल्या संस्कृतीचा ठेवा जपताना आम्हाला खूप अभिमान वाटतो.तुझ्यामुळे आम्हाला जे निसर्गाचे वरदान लाभले आहे, ते आम्हाला समृद्ध करीत आहे. देवभूमी, रामायण, महाभारत, भगवद्गीता, संत महिमा यामुळे अवघ्या विश्वात तुझेच नाव श्रेष्ठत्वाने घेतले जाते. तू तर विश्व जननी शोभतेस.!!येथे तुझ्यामुळे निर्माण झालेले दिव्य तेज, शांती, आनंद मनाला तृप्तता देणारे आहे.
तुझ्याच प्रार्थनेत, निर्माण होणाऱ्या संस्कारांमुळे आम्ही भारतवासी समृद्धीकडे वाटचाल करीत आहोत. तू निर्माण केलेल्या अन्नरसामुळेच आम्ही बलवान व सामर्थ्यवान झालो आहोत.देशवासीयांची देशभक्ती व बुद्धिमत्ता जगात सर्वांनाच अचंबित करते आहे.
तुझी रक्षा करणे हेच आमचे प्रथम कर्तव्य आहे. व याचा आम्हाला कधीही विसर पडणार नाही हेच तुला सांगावेसे वाटते.
आई ,आम्ही अथक प्रयत्नांती नित्य नवे सुयश संपादन करीत राहू. सर्व त्रुटींना संपुष्टात आणून, आम्ही सर्व क्षेत्रात विश्वविक्रम करण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहोत.
ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी तूच आम्हाला बळ देतेस. इतिहासातील पाऊलखुणा आम्हाला सतत मार्गदर्शन करतात.
तुझे कृपाशीर्वाद सतत पाठीशी असावेत हीच नम्र विनंती.🙏
इकडील सर्व काही ठीक. काळजी नसावी.
(ता.क…. “वसुधैव कुटुंबकम्” हे मनावर ठसले आहे.)
तुझ्याच सेवेत हरघडी
आम्ही भारतवासी.
जयहिंद
👳♀️👲🏻👷🏻♂️🧕👮♀️👷♀️👱♂️👱♀️
© सौ.मंजुषा सुधीर आफळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈