सौ. अर्चना सुरेश देशपांडे
विविधा
☆ पाऊस अंगणातला… पाऊस मनातला ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे☆
3 विविधा :
पाऊस अंगणातला, पाऊस मनातला
अर्चना देशपांडे
पाऊस अंगणातला….. पाऊस मनातला
व्हाट्सअप वर एक छान संवाद वाचण्यात आला पावसाबरोबरचा. एक माणूस पावसाला विचारतो “पावसा पावसा तुझे वय काय?”पावसाने छान उत्तर दिलं” जर तू पावसात नाचत असशील तर माझे वय दहा वर्षे, जर कविता करत असशील तर माझे वय 18 वर्षे जर तुला ट्रेकिंगला जावेसे वाटत असेल तर 24 वर्षे जर तुला बायकोला मोगऱ्याचा गजरा घ्यावासा वाटेल असेल तर मी तीस वर्षाचा” स्मित हास्य करत पाऊस म्हणाला. तू जसा अनुभवशील तेच माझे वय असेल.
पाऊस म्हटले की पावसाची विविध रूपे डोळ्यापुढे येतात , मृग नक्षत्रातला पहिला पाऊस आपल्याला आनंद देतो. पहिल्या पावसाने येणारा मृदगंध चित्तवृत्ती उल्हसित करतो. आषाढात संत धार तर श्रावणात पावसाची एक सर तर पुढल्या क्षणी ऊन, यावेळी पडलेले इंद्रधनुष्य पाहून डोळ्याचे पारणे फिटते ,काही वेळा अतिवृष्टी होऊन माळीन सारख्या गावाचे होत्याचे नव्हते तेव्हा मात्र जीव हळहळतो.
प्रत्येकाला वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या कारणासाठी पाऊस आवडत असतो.
काहींना तो रोमँटिक वाटतो तर शेतकऱ्याला तो अमृतधारा वाटतो.
तसे पाहता प्रत्येकाला पाऊस आवडतो .बालपणात तर मुलांना पावसात भिजायला आवडते, साठलेल्या पाण्यात उड्या मारून इतरांच्या अंगावर पाणी उडवण्यात मजा वाटते मग आपले बूट पायमोजे ओले झाले तरी त्याचे भान नसते .कागदाच्या होड्या करून डबकातल्या पाण्यात सोडण्यात त्यांना आनंद मिळतो.
वय वाढत जाईल तसं पावसाचा आनंद वेगवेगळ्या वळणावर भेटत राहतो .धो धो पावसात मित्राबरोबर भिजत आईस्क्रीम खाण्यात मस्त वाटतं, पावसात भिजून आल्यावर उबदार कपडे घालून गरम गरम भजी खाताना तर आनंद द्विगुणीत होतो .वर्षा सहलीत भिजताना तर वेगळीच अनुभूती मिळते. आपल्या थेंबाने चातकाची भूक भागवणारा ,मयूराला नाच करायचा उद्युक्त करणारा पाऊस सर्वांना हवाहवासा वाटतो .अंगणात पाणी साचलं की छान वाटतं .अंगणातल्या झाडं वेली नाहू-माखू. घातलेल्या लेकरासारख्या टवटवीत दिसतात. पक्षी कुडकुडत वळसणीची जागा शोधतात. पावसाने तुडुंब भरून वाहणारे नदी नाले पाहून डोळ्यांचे पारणे फिटते. पावसाची जातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याच्या झोपडीत पाणी गळत असले तरी पीक हाती येणार या विचाराने तो सुखावतो तर असा हा पाऊस सृष्टीला हिरवा शालू नेसवणारा ,धरणी मातेला सृजनाचं समाधान देणारा ,प्रत्येकाची तृष्णा भागावणारा असतो.
पण मनातल्या पावसाचे काय? मनातला पाऊस सतत चालूच असतो. तो कधी ढग होऊन बरसतो तर कधी मनातल्या मनात विरून जातो. पण जेव्हा इशाळ वाडीतील पावसाची कहाणी ऐकली तेव्हा मनातला पाऊस मूकपणे नयनातील…पाऊस ठरला. डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रुधाऱा अशाच असतात, पावसाच्या व यासारख्या. कधी लहानपणी हट्टाचे ,रडू,तर कधी टोचणाऱ्या शब्दांनी दुखावलेली कळ तर कधी कौतुकाने आलेले आनंदाश्रू तर कधी विरहाच्या दुःखाने घशात दाटलेला आवंढा. मनातला पाऊस माणसापासून सुरू होणारा आणि माणसापाशी संपणारा असतो.तो मायेच्या माणसाकडे व्यक्त होतो. कधी पावसाच्या पाण्याला पूर येतो तर कधी मनात आठवणींचा पूर येतो.मनात मायेचा ओलावा नाही आणि डोळ्यात अश्रू नाही असा माणूस शोधूनही सापडणार नाही.
© सौ. अर्चना सुरेश देशपांडे
पुणे
मो. ९९६०२१९८३६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈