श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ तेरी मिट्टी में मिल जावां ! भाग-2 ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
(या वीरांचे त्यांनी जे हाल केले होते ते पाहून राक्षसही लाजले असते!) – इथून पुढे —
दरम्यानच्या काळात भारतीय सैन्य अधिकाऱ्यांनी परिस्थिती हाताळण्यास आरंभ केला होता. घुसखोरांच्या हालाचालींवर नजर ठेवण्यासाठी कारगिल मधील तुर्तुकजवळच्या झांगपाल येथील पॉइंट ५५९० या पर्वतावरील सैन्यचौकी महत्त्वाची भूमिका बजावू शकत होती. तो पर्वत लवकरात लवकर आपल्या ताब्यात घेण्याची आवश्यकता होती. जमिनीपासून ही चौकी तब्बल १८००० फूट उंचीवर होती.
कॅप्टन हनीफुद्दीन
सतत उत्साहात असलेल्या कॅप्टन हनीफुद्दीन साहेबांनी या मोहिमेत स्वयंस्फूर्तीने नेतृत्व स्वीकारले. अत्यंत दाट धुके, प्रचंड बर्फवर्षाव, जीवघेण्या खोल दऱ्या आणि शत्रूची घातक नजर यांना तोंड देत साहेब आपल्या पाच सहकाऱ्यांसह सतत दोन दिवस रात्र हा पर्वत चढत होते…
अखेर त्या चौकीच्या केवळ दोनशे मीटर्स अंतरावर असताना ते शत्रूच्या गोळीबाराच्या टप्प्यात आले आणि त्यांच्यावर तुफान गोळीबार सुरू झाला. अर्थात साहेबांनी प्राणपणाने प्रत्युत्तर दिलेच. इतर सैनिकांना सुरक्षित ठिकाणी लपून बसायला आणि गोळीबार करायला उसंत मिळावी म्हणून हनीफुद्दीन साहेबांनी आपल्याजवळील दारूगोळा संपेपर्यंत गोळीबार केला. त्यात त्यांना अनेक गोळ्या वर्मी लागल्या आणि साहेब कोसळले!…त्यांचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे देह त्या बर्फात, वादळात तब्बल ४३ दिवस पडून राहिले… गोठून गेले!
हेमाजींना सात जून रोजीच ही दु:खद वार्ता कळवण्यात आली. त्यांच्या घरी सांत्वनासाठी येणाऱ्या लोकांची तोबा गर्दी उसळली होती. पण लेकाचा देहच ताब्यात नाही तर पुढचं काय आणि कसं करावं? किती भयावह परिस्थिती असेल? एकटी बाई! इथं नात्यातल्या कुणाचे निधन झाले तर दहा दिवस दहा युगांसारखे भासतात!
सैन्यप्रमुख अधिकारी महोदयांनी हेमाजींना भेटून परिस्थिती समजावली. त्यावर हेमाजी म्हणाल्या, “माझा लेक तर आता या जगात राहिलेला नाही. त्याचा देह आणण्यासाठी इतर सैनिकांना तिथे पाठवून त्यांचे जीवित धोक्यात टाकण्याची माझी इच्छा अजिबात नाही. मुलाचं जाणं किती क्लेशदायक असतं हे मी आता समजू शकते. ही वेळ कुणाही आईवर यावी, असं मला वाटत नाही. पण ज्यावेळी तिथे पोहोचणं शक्य होईल, त्यावेळी मात्र मला त्या पर्वतावर जायचं आहे, जिथं माझं लेकरू देशासाठी धारातीर्थी पडलं ती जागा मला पहायची आहे.”
भारताने युद्धात पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर आपल्या सैनिकांनी हनीफुद्दीन साहेब आणि आणखी एका सैनिकाचा मृतदेह पर्वतावरून खाली आणण्यात यश मिळवले. एवढा उंच पहाड चढून जाणे, तिथल्या हवामानाशी टक्कर देणे, बर्फात गाडले गेलेले देह शोधून ते बाहेर काढणे आणि ते कमरेएवढ्या बर्फातून पायी चालत, प्रसंगी खांद्यावर वाहून खाली आणणे हे अतिशय कठीण काम असते… यात सैनिकांच्या जीवावर बेतू शकते… पण या ‘ऑपरेशन शहीद हनिफ’ मध्ये आपल्या सैनिकांनी आपले प्राण पणाला लावले!
हेमाजी आपल्या लेकाचा देह पाहताच काही वेळ सुन्न राहिल्या. अवघ्या पंचवीस वर्षांच्या त्या सुकुमार देहाची ही अवस्था पाहून त्यांचे जग एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. पण ही एका शूराची आई! लगेचच त्या सावरल्या. आपल्या लेकाला निरोप देण्याची तयारी त्यांनी केली. त्याच्या कबरीवर लावायच्या स्मृतिस्तंभावरील वाक्ये त्यांचे स्वत:चे आहेत!
ज्या ठिकाणी हनीफुद्दीन साहेबांनी आपले प्राण देशासाठी अर्पण केले त्या सबसेक्टर ला आता ‘हनीफ सब सेक्टर’ असे नाव देऊन भारतीय सैन्याने त्यांचा गौरव केला आहे…. ‘वीर चक्र’ हा सन्मान त्यांना मरणोत्तर प्रदान केला गेला आहे.
प्रशिक्षणादरम्यान सुट्टीवर घरी आलेले असताना हनीफुद्दीन साहेब यांनी हेमाजींना भारतीय सैन्य बहादूर सैनिकांचा कशा प्रकारे गौरव करते त्याची उदाहरणे सांगितली होती… ते प्रत्यक्ष त्यांच्याच बाबतीत घडेल असे कुणाला वाटले तरी असते कां?
दिल्लीच्या शहीद स्मारकामध्ये शहीद कॅप्टन हनीफुद्दीन अजीज यांचे नाव कोरलेले पाहून या माऊलीचे काळीज थरथरले असेल. आपला मुलगा देशासाठी कामी आला याचे त्यांना समाधान आहेच. जिथे आपल्या लेकाने देह ठेवला तिथे भेट देण्याची त्यांची इच्छा त्यांनी जिद्दीने पूर्ण केली. त्या पर्वतावर त्या ठिकाणी आपल्या थोरल्या लेकासह त्या जाऊन आल्या… त्याच्या स्मृती मनात साठवत साठवत पर्वत शांतपणे उतरत गेल्या!
आजही हेमाजी सकाळी रियाजाला बसतात…. त्यांच्या कंठातून भैरवी आणि डोळ्यांतून आसवं ओघळू लागतात… हा आसवांचा ओघ अभिमानाच्या पायरी पर्यंत येऊन थबकतो… मनाच्या गाभाऱ्यात पुत्र विरहाच्या वेदनेला मज्जाव असतो… शूर मातांच्या!
आपण या सर्व मातांचे देणे लागतो… यांच्या कुशीत नररत्ने जन्म घेतात आणि आपल्याच संरक्षणासाठी मातीत मिसळून जातात.. कायमची!
ज्यांच्या कुलाचे दीपक विझून गेले, ज्यांचे पोटचे गोळे देशाच्या सीमा सांभाळत आहेत त्यांचेही आपण कृतज्ञ असले पाहिजे! सैन्यात एकच धर्म… देशसेवा. देव करो आणि असे आणखी हनीफुद्दीन या देशात जन्माला येवोत, ही भारतमातेच्या चरणी प्रार्थना.
कारगिल युद्ध सुरू होण्यापूर्वी कॅप्टन हनीफुद्दीन साहेबांबाबत ही घटना घडली होती. प्रसार माध्यमांना याबाबत माहिती नव्हती. मात्र क्रिकेट वर्ल्ड कप प्रत्येकाच्या ओठी होता!कारगिल युध्दाचे कव्हरेज नंतर मोठ्या प्रमाणात झाले. पण दुर्देवाने हनीफुद्दीन साहेबांचा पराक्रम सामान्य लोकांच्या नजरेस त्यावेळी येऊ शकला नाही! नंतर मात्र काही लेखक, वृत्तपत्रांनी दखल घेतली. माध्यमांनी कशाची दखल घ्यावी, हे खरंतर जनतेने ठरवले पाहिजे ! असो.
२६ जुलै हा भारताच्या पाकिस्तानवरील युद्धाचा स्मृतिदिन जसा साजरा व्हायला पाहिजे तसा होतो कां? असो. या ‘ऑपरेशन विजय’ ला यावर्षी चोवीस वर्षे पूर्ण झालीत. येते वर्ष हे या पराक्रमाचे पंचवीसावे, अर्थात रौप्य महोत्सवी वर्ष असेल… या वर्षात सामान्य लोकांना खूप काही करता येईल !
जय हिंद! 🇮🇳
– समाप्त –
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈