सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ मैत्र… लेखिका : सुश्री स्वप्नजा घाटगे – संकलक : प्रा. माधव सावळे ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

एकदा सहज मी म्हणाले होते,” त्याचं आणि माझं मैत्र आहे..! “

माझी मैत्रीण पटकन मला म्हणाली,”स्वप्नजा ,मराठी ची विद्यार्थिनी ना तू?तुला मैत्री म्हणायचं आहे का? “

” नाही ग मुली,मला मैत्रचं म्हणायचं आहे..”

ती हसत म्हणाली,” बोला. आता नेहमीप्रमाणे वेगळं काहीतरी सांगणार आमची आद्यजा…”

आद्यजा हे आरतीताईने दिलेलं नांव.

मी तिचा हात हातात घेत म्हणाले,” सखी, मैत्री होत असते,ठरवावी लागत नाही. मैत्र हे सहानुभावाने आत उतरत असतं. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ना..भूता परस्परे जडो मैत्र जिवांचे…! ते माझं मैत्र!

मैत्री आणि मैत्र यात फरक आहे थोडा वेलांटीचा.पण यातला गाभा समजून घेतला न, तर आपल्यासारखे आपणच सुखी.

मैत्री दोन समविचारी, समान आवडीनिवडी, सहवास,एखाद्याचा आपल्यावर पडत असलेला प्रभाव…यामुळे होत असते.

पण मैत्र एकमेकांच्या जवळ जसेजसे जाऊ तसतसं फुलतं,बहरतं.हे फुलणं असतं ना, सखे, जाणिवेच्या पल्याड असतं.असतं ते केवळ संवेदन.शब्दांच्या पलिकडे असणारं.

त्यासाठी रोज भेटायची गरज नसते,असते फक्त एकरुप व्हायची गरज!

मी लिहिलेल्या एखाद्या शब्दातून माझ्या मनातील खळबळ,वेदना ओळखते ते माझं मैत्र!

यात परत स्त्री-पुरुष अशी गल्लत करायची नाही.

पांचालीच्या मनातील द्वंद ओळखून तिला अबोल मदत करणारा कान्हा.हे त्याचं मैत्र!

सुदामाने काही मागितले नाही,द्वारकाधीशांनी काही दिलं नाही.पण सुदामाला सारं मिळालं.हे त्याचं मैत्र!

हे असं मैत्र आपल्या आसपास असलं ना, की आपण चिंतामुक्त असतो.

हे स्त्री-स्त्री,स्त्री-पुरुष , किंवा पुरुष-पुरुष असं लेबल लावलेलं नसतंच मुळी.

जो कोणी मैत्रभावाने आपल्या हृदयाशी जोडला जातो तेव्हाच होतं ते मैत्र!

जनाला मदत करणारा,तुकोबांची गाथा परत करणारा,चोखोबांची गुरं राखणारा,नाथांच्या घरी कावड  वाहणारा, पुंडलीकासाठी अठ्ठावीस युगे विटेवर उभा राहणारा…

सखी,त्याच्याजवळ मैत्रभावाने कोण कोण गेलं, तो त्यांचा झाला…

साध्याच शब्दात बोलूया …मैत्र म्हणजे एकरुपता!

जिथे शब्देविण संवाद असतो ते मैत्र!

मांचा फोनवर आलेला वेगळा आवाज ऐकून कासावीस होणारी माझी लेक.हे तिचं आणि माझं मैत्र!

ती माझी घट्ट मैत्रीण आहे असं म्हणण्यापेक्षा, तिचं अन् माझं  ह्रदयस्थ मैत्र आहे , असं म्हणू या न!

ज्ञानदेव म्हणतात,असं मैत्र विश्वात व्हावं.

हा मैत्रभाव सहजासहजी निर्माण व्हायचा नाहीच, पण अवघडही नाही.

आपण आपल्या परीने प्रयत्न करुन आपल्या भोवतालच्या परिघात का होईना,मैत्रभाव निर्माण करायला हवा.

त्यासाठी

मनाला सतत समजवायला हवं,कुणाचा मत्सर, द्वेष, ईर्षा,वैर,कुणाकुणाच्या माघारी बोलणं करु नकोस.

सखी,हे ह्यातलं थोडसं जरी आपल्याला जमलं, तरी आपण मैत्र या शब्दाच्या जवळ जाऊ शकू.कळलं?

ती मला मिठी मारत म्हणाली,यार हे लईच भारीय…तुझं माझं मैत्र असंच अखंड राहू दे…!

आमेन….असं म्हणत मी तिच्या पाठीवर थोपटत राहिले.

लेखिका : सुश्री स्वप्नजाघाटगे

कोल्हापूर.  मो 8888033332

संकलक: प्रा. माधव सावळे

प्रस्तुती : सुश्री शशी नाडकर्णी -नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments