? विविधा ?

☆ चांदोबाला अनावृत्त पत्र… अनामिक ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

प्रिय चांदोमामा,

         सस्नेह नमस्कार !

आज आबालवृद्ध भारतीयांना तुझी खूप खूप आठवण येत आहे. तुझ्या प्रत्यक्ष भेटीसाठी आम्ही नेहमीच आतुर राहिलो.आमच्यापासून तू आता फार दूर राहिलेला नाहीस. आमचा दूत चांद्रयान-3 तुझ्या कक्षेत आलाय.

चंदामामा, तुझा स्वतःभोवती आणि पृथ्वीभोवती फिरण्याचा वेग एकसमान असल्यामुळे तुझी दुसरी बाजू आम्हाला इथून कधीच दिसत नाही.पण आमच्या दूतानं त्याही बाजूची छायाचित्रं आम्हाला पाठवलीत. आजवर आम्ही तुझ्या छातीवर अंकित असलेला ससा पाहिला आणि त्यावरून तुला “शशांक’ असं नावही दिलं. आता तुझी दुसरी बाजूही आम्हाला दिसली आणि तीही तितकीच सुंदर आहे.

तुझं आणि आमचं नातं प्रभू श्री रामरायांपासून आहे.तुझ्याकडे पाहून लहानग्या रामचंद्रांनी तुझ्याशी खेळण्याचा हट्ट केला आणि कौसल्यामातेनं रामचंद्रांच्या हाती आरसा दिला. त्यात तुझं रूप पाहून प्रभू रामचंद्रांची कळी खुलली. तेव्हाच कदाचित राम आणि चंद्र हे शब्द एकत्र येऊन ‘रामचंद्र’ शब्दाचा उदय झाला असावा. तेव्हापासूनच प्रत्येक माता आपल्या बाळाला तुझं रूप दाखवते आणि बाळंही तुझ्याकडे पाहून हरखून जातात.

‘निंबोनीच्या झाडामागे । चंद्र झोपला गं बाई हे’। अंगाई गीत ऐकत येथे बाळ लहानाचं मोठं होतं. ‘चांदोबा, चांदोबा भागलास का? निंबोनीच्या झाडामागे लपलास का?’ हे पिढ्यानुपिढ्या लोकप्रिय बालगीत आजही कायम आहे.’चांदोबाची शाळा’ पाहण्याची उत्सुकता बालमनाला असते.’सुंदर चांदण्या,चंद्र हा सुंदर,चांदणे सुंदर पडे त्याचे’ ह्या प्रार्थनेतल्या ओळींनी शालेय शिक्षणाला सुरुवात होते.’चंदा है तू ,मेरा सुरज है तू’।,’उगवला चंद्र पुनवेचा’, ‘कैवल्याच्या चांदण्याला ,भुकेला चकोर’, ‘चंद्र व्हा हो पांडुरंगा। मन करा थोर।,’ चंद्र आहे साक्षीला’, ‘कोणता मानू चंद्रमा?’, ‘चौदाहवी का चाँद’, ‘हे सुरांनो,चंद्र व्हा।’ अशी कितीतरी गाणी येथल्या मनामनात रुजली आहेत.

प्रत्येक माता तुला मनोमन भाऊ मानते आणि त्यामुळे प्रत्येक बाळाचा तू ‘मामा’ बनतोस. तुझी आणि गणपतीबाप्पांची गोष्ट ऐकून आम्ही लहानाचे मोठे होतो. तरुणपणात तुला साक्षीदार मानून प्रेमाच्या आणाभाका घेतल्या जातात. प्रेमात यश मिळो वा अपयश, प्रेमाचं आजन्म स्मरण राहतं ते तुझ्यामुळेच. त्या आठवणी जपत लोक म्हातारे होतात. वयाला ऐंशी वर्षे पूर्ण होतात, तेव्हाही आम्ही ‘सहस्रचंद्रदर्शन’साजरं करतो.

तात्पर्य, जिथल्या प्रत्येक माणसाचा जन्मभर तुझ्याशी संपर्क असतो, अशा भारत देशाचे आम्ही नागरिक आहोत आणि आज तुझ्याशी प्रत्यक्ष संपर्क स्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहोत.

आज दि.23 ऑगस्ट 2023 संध्याकाळची 6 वाजून 4 मिनिटं ही वेळ आमच्यासाठी आणि आमचा नातलग असल्यामुळे तुझ्यासाठीही खूप महत्त्वाची आहे.चांद्रयान-3चं ‘विक्रम लॅंडर’ तुझ्या दक्षिण ध्रुवाला स्पर्श करण्यास व्याकूळ झालंय.

अपयशातून बोध घेऊन पुढे जाणाऱ्यांचा हा देश आहे. मागील वेळी अल्गोरिदमच्या अपयशामुळे तुला कवेत घेण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला होता. हा दोष यावेळी आम्ही दूर केलाय. यशापयशाचा खेळ आजन्म सुरूच असतो; पण आम्ही थकणारी माणसं नाही. तीनच दिवसांपूर्वी रशियाच्या “लुना-25′ यानाचा तुला स्पर्श करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला आणि मिखैल मारोव नावाच्या शास्त्रज्ञाला रुग्णालयात दाखल करावं लागलं. तुझ्या भेटीची आस किती तीव्र असते, हे एवढ्यावरूनच तू समजून जा!

आम्हा भारतवासीयांचं आणि तुझं नातं तर विज्ञानाच्या पलीकडचं. आमच्या भावविश्‍वात तुझं स्थान अढळ. म्हणूनच ‘विक्रम’ची आणि तुझी भेट होणं हा आमच्यासाठी केवळ ‘विक्रम’नसून, ते भावनिक मिलन आहे, हे ध्यानात ठेव.

शास्त्रज्ञांच्या मते, शेवटची पंधरा मिनिटं खूप महत्त्वाची आहेत. शास्त्रीय भाषेत ज्याला ‘सॉफ्ट लॅंडिंग’ म्हणतात, तीच खरी कसोटी. चांदोमामा, ही आपल्या नात्याचीही कसोटी आहे, असं समजून आम्हाला यश दे. रक्षाबंधनाचा दिवस फार दूर नाही. तुझ्या कोट्यवधी भारतीय बहिणींची माया फळाला येऊ दे. तुझे कोट्यवधी भाचे श्‍वास रोखून बसलेत. आम्हा सर्वांसाठी ‘मामाचा गाव’ किती महत्त्वाचा आहे, हे तू जाणतोस. आता तो हाकेच्या अंतरावर आलाय. तुझ्या ‘विक्रम’ला प्रेमानं कुशीत घे.एवढंच आत्मीय मागणं.

विश्वास वाटतो की,तू आमची मनस्वी इच्छा पूर्ण करशील.मामाला भेटण्याची अशी संधी पुन्हा पुन्हा मिळू दे.

बाकी सारे क्षेम.भेटीत अधिक बोलूयाच.

             तुझे लाडके,

तमाम भारतीय बंधू-भगिनी व भाचे मंडळी

संग्रहिका: सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments