श्री सतीश मोघे
मनमंजुषेतून
☆ स्पेस आणि बॅकस्पेस… भाग-१ ☆ श्री सतीश मोघे ☆
संगणक वापरतांना आणि अलीकडे कुटुंबात वावरतांना एक गोष्ट नेहमी द्यावी लागते, ती म्हणजे ‘स्पेस’. संगणकावरील लिखाणात दोन शब्दात स्पेस दिल्याने वाक्याचा अर्थ समजणे सुकर होते तर कुटुंबात स्पेस दिल्याने नाती राखणे सुकर होते. ‘स्पेस’ या मराठीत रुळलेल्या इंग्रजी शब्दाचा शब्दकोशातला अर्थ अवकाश, अंतर, प्रदेश, जागा असा आहे. पण नात्यांमध्ये हा शब्द वापरतांना तो उसंत, वेळ, मोकळीक, स्वस्थता, सवलत, सूट अशा अनेक भावछटांच्या अभिव्यक्तीसाठी उपयोगात आणला जातो.
‘मला स्पेस हवी’, ‘मला थोडी स्पेस द्या’ अशी मागणी अलीकडेच मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे,हे खरे असले तरी स्पेस देण्याघेण्याची ही क्रिया पूर्वापार चालत आली आहे. फक्त तेव्हा स्पेस मर्यादेत व ठरलेल्या वेळी, आई-वडील जेव्हढी देतील तेव्हढीच घेतली जायची. कुटुंबात स्वत:चे व्यक्तिमत्व स्वतंत्रपणे अधोरेखित करण्याची वृत्ती नव्हती. डब्यांमध्ये ठरलेले अंतर ठेऊन कुटुंबाची ‘समझोता एक्सप्रेस’ ठराविक वेगात, ठराविक वेळेत धावत असायची. स्पेस मागायला जागाच नसायची आणि स्पेस मागायची वेळही यायची नाही. कारण छोटी घरे आणि भरपूर कामे. छोट्या घरांमुळे याची रुम वेगळी, त्याची वेगळी असे शक्यच नसायचे. एकाच खोलीत आजी-आजोबा, तिथेच बाबा, तिथेच मूले. स्पेस घ्यायची म्हटली तरी दुसरी मोकळी जागा उपलब्धच नसायची. तसेच भरपूर कामांमूळे स्पेस घ्यायला वेळच नसायचा. पाणी भरा, दळण दळून आणा, भाजीबाजार, रेशनिंग, किराणा, धुणी-भांडी, अभ्यास ही सर्व कामे कुटुंबातील सर्वांनीच विभागून करायची. या कामात संपूर्ण दिवस निघून जायचा. स्पेस घेण्यासाठी वेळही शिल्लक नसायचा. मुलांची धडपड, प्रयत्न, आई वडिलांचे कष्ट कमी करुन आई वडिलांना स्पेस (म्हणजे कष्टातून उसंत) देण्यासाठी तर आईवडिलांची धडपड मुलांनी स्पेसमध्ये (अवकाशात) भरारी घ्यावी म्हणून त्यांच्या पंखात बळ भरण्यासाठी, याची जाणीव दोघांना असल्यामुळे सर्व व्यवहार हदयाचा. बद्धीचे ‘पण’ ‘परंतू’ हे शब्द शब्दकोशातच नव्हते. त्यामुळे वेगळ्याने “स्पेस हवी… स्पेस द्या” असे चिडून वैतागून म्हणण्याची वेळ यायची नाही. आईवर कधीतरी हे वेळ यायची. कुटुंबात कामाच्या ओझ्याने दबलेली आईच असायची. तिच्यामागे काही हट्ट, अभ्यासातली शंका यासाठी खूप मागे लागलो की कधीतरी ती म्हणायची, “आता जरा थांब. मला माझे हे काम करु दे”. अर्थात ती देखील निवांत बसण्यासाठी नव्हे तर हातातले काम वेगाने पूर्ण करण्यासाठी ही स्पेस मागायची.
मध्यमवर्गीय आणि श्रीमंत कुटुंबात स्पेस घेणे आणि देणे हल्ली अनिवार्य आणि त्याच जोडीला सहज शक्य झाले आहे. कारण मोठी घरे आणि बऱ्यापैकी मोकळा वेळ. प्रत्येकाला वेगळे बेडरुम. मोकळीक हवी असली की आपल्या बेडरुमध्ये शिरायचे की मिळाली स्पेस. घरात धुणी-भांडी,केरकचरा, स्वयंपाकाला मोलकरणी, किराणा, भाज्या, पीठ इ. सर्व घरपोच. त्यामूळे मुलांना अभ्यास सोडला तर इतर कामे नाहीत,त्यामुळे स्पेस घ्यायला बऱ्यापैकी मोकळा वेळ, असे झाले आहे खरे. याबद्दल तक्रार करण्याचेही कारण नाही. कारण नशिबाने ही सर्व सुखे त्यांना, आपल्याला मिळाली आहेत. ही जरुर उपभोगावीत . पण एव्हढी सुखे आणि भरपूर स्पेस मिळत असूनही जेव्हा कुटुंबातील एखादा सदस्य दुसऱ्याला, “तू माझ्या डोक्यात जातेस/जातोस” असे सरळ तोंडावर बोलून, रागाने पाय आपटत आपल्या खोलीचे दार धाडकन आपटून आपल्या खोलीत जाते आणि बराच वेळ बाहेर येत नाही, तेव्हा या ‘स्पेस’ घेण्यावर आणि त्याला स्पेस देण्यावर विचार करावा लागतो.
हे असे का घडते? याचा विचार केला तर दिवसेंदिवस कमी होत जाणारी सहनशीलता, हे त्याचे उत्तर म्हणावे लागेल. जीवन म्हणजे सहन करणे आहे. स्वत: ला आणि इतरांनाही. आपण जर संवदेनशील असलो तर आपल्या वागण्यातल्या चुका लगेच समजतात. रागावलो तरी थोड्याच वेळात वाटते, उगाच रागावलो. कुणाला काही हिताचे सांगितले आणि तो नाराज झाला की वाटते उगाच आपण सांगत बसलो. हे असे बऱ्याचदा घडले की आपलाच स्वभाव आपल्याला सहन होत नाही. थोडक्यात ‘काही करू पहातो, रुजतो अनर्थ तेथे’ , असे होते आणि या नैराश्यात आपलाच आपल्याला राग येऊन आपण कोपऱ्यात जावून बसतो. नको तेवढी स्पेस द्यायला आणि घ्यायला सुरुवात करतो. आपल्याला आपण सहन करू शकत नाही. तसेच इतरांनाही आपण सहन करु शकत नाही. कुटुंब, प्रवास, नोकरीचे ठिकाण आणि जिथे जिथे आपल्याला जावे लागते अशा सर्वच ठिकाणी भिन्न प्रकृतीच्या,स्वभावाच्या व्यक्ती असतात. अशा व्यक्तींना सहन करण्याची आपली क्षमता अत्यल्प असल्याने तिथेही आपण अंतर ठेवून आणि मौन राखून राहायला लागतो. आपण अंतर ठेवले तरी त्या व्यक्ती जवळ यायच्या थांबत नाही.बोलायच्या थांबत नाहीत. अशा व्यक्ती जवळ आल्या,काही बोलल्या की त्या डोक्यात जातात. त्रास आपल्यालाच होतो. हा त्रास कमी करायचा तर स्पेस घेण्याची वृत्ती न वाढविता सहनशीलता वाढविणे आवश्यक आहे.
सहनशीलता ही बाल वयातच वाढू शकते. पूर्वी संस्काराचे वय सोळा वर्षापर्यंत होते. आता ते कमी होऊन सात ते आठ वर्षापर्यंत आले आहे. या वयातील मुलेच तुम्हाला समजून घेण्याच्या, स्वत: त बदल करण्याच्या, सहनशीलता वाढविण्याच्या मनस्थितीत असतात. या वयात त्यांच्यावर योग्य ते संस्कार झाले पाहिजेत. काका-काकू,वडीलधारी पाहुणे मंडळी घरी पाहूणे म्हणून आले तर मुलांना त्यांना नमस्कार करायला सांगितले पहिजे. “त्यांना खाली झोपता येत नाही.त्यांचे गुडघे,पाठ दुखतात. ते तुमच्या बेडरूममध्ये बेडवर झोपतील. तुम्ही हॉलमध्ये गादी घालून खाली झोपा”,असे त्यांना प्रेमाने सांगितलेच पाहिजे. दिलेली स्पेस केव्हा सोडायची, बॅक स्पेसला कधी जायचे, हे त्यांना समजले पाहिले.
या बाबतीत एका मित्राने सांगितलेला प्रसंग खरंच विचार करायला लावणारा आहे. पत्नीचे निधन झाल्यावर त्याचे व्यवसायाचे ठिकाण सोडून मुलाकडे राहण्याची इच्छा त्याने व्यक्त केली. मुलगा म्हणाला, ” हरकत नाही. पण माझी मुले त्यांचे बेडरुम कुणाला शेअर करू देत नाहीत. तेव्हा तुम्हाला हॉलमध्ये झोपावे लागेल.” मुलांना स्पेस देणाऱ्या या वृत्तीला काय म्हणावे ! बरे मुलांची वयेही ७ वर्षे आणि ९ वर्षे. या वयातच त्यांना स्पेस कधी सोडायची हे शिकविता येते. कारण आई बाबा सांगतात ते योग्यच आहे, अशी ठाम समजूत असल्याने शिकवितांना ते नाराज होण्याची शक्यता कमी असते आणि नाराज झाले तरी वाद न घालता ते कृती करत असतात. तसे न करता आपण त्यांना नको तेवढी स्पेस देवून आपल्या जन्मदात्यालाच बेडरूममधे झोपायला स्पेस नाही, असे म्हणत असू ,तर ही स्पेस नात्याच्या, जिव्हाळ्याच्या, कुटुंबव्यवस्थेच्या विनाशाकडे नेणारी आहे, हे निश्चित.
– क्रमशः भाग पहिला.
© श्री सतीश मोघे
मो – +91 9167558555
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈