सौ. पुष्पा चिंतामण जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ कॅप्टन  सचिन गोगटे – कॅडेट नंबर ३४५० ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

कॅप्टन सचिन गोगटे यांनी मर्चंट नेव्हीमध्ये अनेक वर्षं काम केलं. साध्या शिकाऊ कॅडेटपासून प्रचंड मोठ्या ऑइलटँकरचे कॅप्टन म्हणून अनेक वर्षं ते कार्यरत होते.  या कार्यकाळातील स्वानुभवांवर आधारीत लेखनातून त्यांनी आपल्याला या वेगळ्या क्षेत्राचा थरारक आणि सखोल परिचय करून दिला आहे.

मेकॅनिकल इंजिनिअर झाल्यावर सचिन यांनी ‘टीएस राजेंद्र’ या भारत सरकारच्या जहाजावर मर्चंट नेव्हीचे प्रशिक्षण घेतले. नंतर काही वर्षं व्यापारी जहाजांवर काम केले.डेक कॅडेटपासून सुरू झालेला त्यांचा जीवनप्रवास चाळीस वर्षं अव्याहत या क्षेत्रात सजगतेने काम करून  ऑइल टँकरचे तज्ज्ञ कॅप्टन या पदापर्यंत पोहोचला. अनेक परदेशी व्यापारी  जहाजांवर त्यांनी कॅप्टन म्हणून उत्कृष्ट काम केले.तसेच ऑइल टँकर व ऑइल फील्ड्स यातील तज्ज्ञ व्यक्ती म्हणून  जगभर नाव कमावले. कंपनीच्या विविध जहाजावर जाऊन तिथल्या उमेदवारांना प्रशिक्षण देण्यासाठी त्यांना आवर्जून बोलाविले जाई. त्यासाठी त्यांना  सततचा विमान प्रवास करावा लागला. त्यांनी जगातल्या १२० देशांना भेटी दिल्या. सहावेळा पृथ्वी प्रदक्षिणा घडली.

एखाद्या परदेशी बंदरात पोचल्यावर पाच सहा तासात तिथले व्यापार-व्यवहार समजून घेणे आणि त्याबद्दल बोटीवरील सहकाऱ्यांना व्यावहारिक प्रशिक्षण देणं त्यांनी महत्त्वाचं मानलं. जहाजाच्या आणि सहकाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य दिलं.

इराण- इराक लढाई, अंगोला, सिरीया अशा युद्धक्षेत्रात  काम करताना जीवावरच्या प्रसंगांना तोंड द्यावं लागलं. समुद्री चाचेगिरीच्या प्रदेशात सुरक्षित राहणं ही फार महत्त्वाची गोष्ट असते. ही सुरक्षितता कशी मिळवावी याचं प्रशिक्षण देण्यासाठी त्यांनी अनेकदा सोमालीया, पश्चिम आफ्रिका, इंडोनेशियाच्या प्रदेशात जाऊन काम केलं. ऑइल टँकर्सवर काम करताना तिथल्या सुविधा वापरून जहाजांवरच्या मोठ्या आगींना तोंड देण्याचे प्रशिक्षण त्यांनी बारा वर्षे दिलं.

कॅप्टन सचिन यांनी आधुनिक विज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानाचे अत्याधुनिक  शिक्षण घेऊन स्वतःला सतत काळाबरोबर ठेवलं. त्यामुळे ते अनेक जहाजांचे दूर संपर्काने (रिमोटली) जहाजाच्या ब्लॅक बॉक्सचं विश्लेषण करणे,नेव्हिगेशन ऑडिट करणे अशी कामे करू शकले.

या धाडसी क्षेत्रातला पैसा आपल्याला दिसतो पण त्यासाठी भरपूर शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक कष्ट  करावे लागतात. सलग ३६ तास ड्युटी बऱ्याच वेळा करावी लागते. जमिनीचं दर्शनाही न होता अथांग सागरात अनेक दिवस काढावे लागतात. भर समुद्रात भयानक वादळांना तोंड द्यावे लागते.कुटुंबापासून महिनो महिने दूर राहावं लागतं. अनेकदा सचिन यांनी सागरी चाचेगिरीच्या संकटातून शक्तीने आणि युक्तीने जहाजाला सहीसलामत बाहेर काढले. कुठल्याही व्यापारी जहाजाचा किंवा ऑईलटँकरचा त्या त्या बंदरातील व्यवहार आपल्याला वाटतो तितका सरळ, साधा, सोपा कधीच नसतो. त्याला राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि दहशतवादाचे अनेक पैलू असतात.

सचिन  कॅप्टन असलेल्या सर्व जहाजांवर खूप कडक शिस्त स्वतःसह सर्वांनी पाळावी यासाठी ते  आग्रही असंत. तसेच सहकाऱ्यांच्या आरोग्याची, कुटुंबीयांची योग्य प्रकारे काळजी घेतली जाईल यावरही त्यांचे लक्ष असे .स्वतःच्या निर्व्यसनी, निर्भिड,धाडसी वागणुकीमुळे तसेच स्वच्छ चारित्र्यामुळे त्यांचा दरारा होता. बंदराला बोट लागल्यानंतर अनेक गैरव्यवहार  (बाई, बाटली, स्मगलिंग , अमली पदार्थ) होत असतात. सचिन यांनी कुणाकडूनही कसलीही भेट स्वीकारली नाही आणि स्वतःच्या जहाजावर कुठलाही गैरव्यवहार होऊ दिला नाही. यामुळे कंपनीचे वरिष्ठ अधिकारी त्यांच्यावर नेहमी खुश असत.

या त्यांच्या साऱ्या प्रवासात त्यांच्या पत्नी मीना यांनी मोलाची साथ दिली. लहानग्या ईशानसाठी आई आणि वडील दोघांची भूमिका समर्थपणे निभावली. निगुतीने संसार केला. सचिन यांना कसल्याही कौटुंबिक अडचणी न कळवता हसतमुखाने पाठिंबा दिला.ईशानचे शिक्षण आणि सर्व आर्थिक व्यवहार, नातेसंबंध उत्तम रीतीने सांभाळले. त्यावेळी आजच्यासारख्या मोबाइल ,इंटरनेट अशा कुठल्याही सोयीसुविधा नव्हत्या. जेव्हा कधी मीना यांना सचिन यांच्या जहाजावर जाण्याची संधी मिळाली तेव्हा लहानग्या ईशानसह सगळे आंतरराष्ट्रीय प्रवास एकटीने  करून ज्या बंदरात सचिन यांचे जहाज असेल ते बंदर गाठावे  लागे. जहाजावरही कॅप्टनची बायको म्हणून वेगळेपणाने न वागता मीना यांनी जेवणघरातील कूकपासून सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवले.

मीना यांना एकदा अशा प्रवासात एका भयानक प्रसंगाला तोंड द्यावे लागले. मीना यांना इजिप्तच्या कैरो या विमानतळावर पोहोचून तिथून प्रवासी गाडीने २२० किलोमीटर प्रवास करून अलेक्झांड्रिया या बंदरात सचिन यांची बोट गाठण्यासाठी जायचे होते. त्यांच्याबरोबर सचिन यांचे एक सहकारी होते. हा प्रवास थोडा आडवळणाचा आणि वाळवंटातील होता. वाटेत रानटी टोळ्यांची भीती असे. म्हणून काळोख व्हायच्या आत अलेक्झांड्रिया इथे पोहोचणे आवश्यक होते. परंतु विमानतळावरील एजंटच्या हलगर्जीपणामुळे प्रवास सुरू व्हायलाच संध्याकाळचे चार वाजले. थोडा प्रवास झाल्यावर ड्रायव्हरने त्यांना वाळवंटातील एका छोट्या हॉटेलमध्ये नेले व रात्र इथेच काढा असे सांगून तो पसार झाला. हॉटेलमधील त्या आडदांड परपुरुषांच्या वखवखलेल्या नजरा त्यांच्यावरून फिरत होत्या. धोका ओळखून त्यांनी  रूममधील सर्व फर्निचर ढकलत नेऊन दाराला टेकवून ठेवले. रात्रभर त्यांच्या दरवाजावर मोठ मोठ्या थापा मारल्या जात होत्या. पण मीना मुलाला कवटाळून गप्पपणे कॉटवर बसून होत्या. सकाळी उजाडल्यावर तो ड्रायव्हर आला आणि त्या कशाबशा अलेक्झांड्रियाला पोहोचल्या. संपर्काचे कुठलेही साधन नसल्यामुळे सचिन खूप काळजीत होते पण मीनाने विलक्षण धैर्याने साऱ्या प्रसंगाला तोंड दिले.

दैवगती खूप अनाकलनीय असते. सचिन एकदा कामासाठी तुर्कस्तानमध्ये इस्तंबूल इथे गेले होते. त्यांना रात्रीचं विमान पकडून सिंगापूर इथे जायचं होतं. संध्याकाळी काहीतरी खायला म्हणून ते रेल्वेस्टेशनकडे निघाले होते तेवढ्यात कानठळ्या बसवणारा स्फोटाचा आवाज आला आणि सचिन उलटे लांबवर फेकले गेले. त्यांच्या नाकातून कानातून रक्त वाहत होते अतिरेक अतिरेक्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटचा त्यांना असा फटका बसला. कसबसे उठून त्यांनी विमानतळ गाठला. सिंगापूरला पोहोचले. पण तिथे गेल्यावर त्यांना चालायला खूप त्रास होऊ लागला. हालचालीवर बंधनं आली. त्या रोगाचे निदान एम एन डी (मोटर न्यूरॉन डिसीज) असे झाले. शरीरातील सर्व नर्व्हस सिस्टीम क्षीण होत गेली. कुटुंबीयांसोबत या आजाराबरोबर चार-पाच वर्षे झगडून सचिन यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या कर्तृत्वाला मनःपूर्वक नमस्कार 🙏

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments