श्री व्यंकटेश देवनपल्ली
जीवनरंग
☆ आंबटगोड नातं…– भाग- २ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆
(माझ्याकडून तुम्हाला हा घ्या किंडल रीडर !. मी पैजेतून जिंकलेल्या आणि माझ्या बचतीच्या पैशातून घेतला आहे, बरं का !” असं म्हणून पैठणी घेऊन वहिनी आत गेल्या.) – इथून पुढे –
मी साहेबांना विचारलं, “ साहेब, वहिनींशी कसली पैज लावली होती हो? ”
साहेब मिश्कीलपणे म्हणाले, “अरे, काय आहे ना, तिने आजवर मला कित्येक वेळा बुद्धिबळाच्या डावांत हरवत पैजा जिंकल्या आहेत.”
मी म्हटलं, “ साहेब, काय सांगताय? तुम्ही तर बुद्धिबळातले चॅम्पियन ! तुम्हाला हरताना मी तरी कधीच पाहिलं नाही.”
“वसंता, अरे दिवसभर टीव्ही किती वेळ पाहत बसणार? काहीतरी विरंगुळा हवा ना? मग एकदा बुद्धिबळाचा डाव मांडला. दोन तीन चालीतच मी तिला शह दिला. त्यानंतर ती पुन्हा खेळायलाच तयार होत नव्हती. मग एकदा पैज लावली. तिनं मला हरवलं तर मी पाचशे रूपये द्यायचे आणि ती हरली तर तिने काहीच द्यायचे नाहीत. बराच वेळ खेळून झाल्यावर मी मुद्दामच हरलो. त्यानंतर मी दरवेळी मुद्दामच हरत गेलो. माझ्या टाईमपासची सोय झाली आणि पैसे काय माझ्या पाकिटातून तिच्या पर्समध्ये!” मला टाळी देत साहेबांनी खुलासा केला.
इतक्यात सुधा वहिनी व सविता तयार होऊन आल्या. धूपछांव रंगांची पैठणी नेसलेल्या सुधावहिनींना साहेब कौतुकाने न्याहाळत होते. आम्ही चौघे कॅंडल डिनरसाठी एका हॉटेलात गेलो. हलकंफुलकं खाऊन परत आलो.
सकाळीच जाग आली ती वहिनींच्या बडबडण्याने. “ किती वेळा सांगून झालं, लाद्या पुसत जाऊ नका म्हणून.. एक शब्द ऐकतील तर शप्पथ. अचानक पाय घसरून पडले तर कितीला पडेल ते…”
“तू ऐकतेस काय माझं? कंबर दुखेपर्यंत एक एक फरशी घासत बसतेस ते.” साहेब बोलत होते. मला पाहताच म्हणाले, “ वसंता, चल बाहेर चक्कर टाकून येऊ.” मी हो म्हणून तोंडावर पाणी मारून कपडे करून आलो.
“सुधा, अग माझ्या चपला कुठायत? रात्री इथंच काढून ठेवल्या होत्या. ह्या बाईला सवयच आहे माझ्या चपला लपवायची..”
“समोर शूज दिसताहेत ना, निमूटपणे घालून जा. एक तर मधुमेह. पायाला जपायचं नावच नाही. शूज असले तरी चपलाच पाहिजेत..” वहिनींचा तोंडाचा पट्टा सुरू होता.
साहेब शूज घालून निघाले. वॉकिंग ट्रॅक असलेली बाग खूपच छान होती. आम्ही फिरून आलो. आल्या आल्या वहिनींनी फक्कड चहा दिला.
मी म्हटलं, “अहो, वहिनी बाग छान आहे हो. मी तर म्हणतो, तुम्हीही साहेबांच्या बरोबर रोज जायला हवं.”
“तुमचे साहेब सकाळी उठून चोरासारखे कधी बाहेर पडतात हे मला कळायला हवं ना. मगच त्यांच्याबरोबर जायचा विचार करता येईल.” असं ताडकन बोलून त्या आत गेल्या.
साहेब मला हळूच म्हणाले, “अरे, माझं काय, मी बेडवर पडल्या पडल्या डाराडूर झोपतो. पण तिला लवकर झोपच लागत नाही. पहाटे पहाटे तिला छान झोप लागलेली असते. साखरझोपेतून तिला कशासाठी उठवा, म्हणून मी हळूच सटकतो.”
“साहेब, आज कामवाली आली नाही का? तुम्ही लादी पुसत होता म्हणून ….” मी सहज विचारलं.
“ती नाही आली. ती आमची कामवाली बाई नाही, ती आमची केअरटेकर आहे. अरे तिच्या मुलीचं बाळंतपण ह्याच आठवड्यात आहे. बिचारी काल दुपारीच गेलीय. वसंता, तुला एक सांगू? एका विशिष्ट मर्यादेपलिकडे वय वाढल्यावर माणसाला कुठलंही काम केलं की थकायला होतं. कुठलीही दगदग नकोशी वाटायला लागते. हळूहळू ही माणसे मग कृतिशील आयुष्यातून निवृत्त होत जातात. निवृत्ती म्हणजे विश्रांती. पण निवृत्ती म्हणजे चोवीस तास रिकामपण असेल तर मात्र त्याचाही कंटाळा आल्यावाचून राहात नाही. त्याकरिता आपल्या प्रकृतीला झेपतील अशा बेताने आपण आपली कामे करायला हवीत.”
“तुला सांगतो, बागेत रोपे लावून, त्यांची निगा ठेवत राहिल्याने सुद्धा आपल्याला बाह्य जगाशी जिवंत संबंध जोडल्याचा आनंद मिळतो. परिणामी आपले मन ताजे व टवटवीत रहाते. बरेच लोक फ्यूज जोडायचं काम स्वत: करतात. स्क्रू ड्रायव्हर वगैरे हत्यारे घरी ठेवतात आणि सवड असेल तेव्हा छंद म्हणून का होईना छोटीमोठी कामे करत असतात. हे लोक कधीच कंटाळलेले नसतात. ह्या उलट आपल्या कौशल्याचा उपयोग करण्याची संधी मिळाल्याबद्दल ते स्वत:वरच खूश असतात. ‘बोअरडम’ विषयी मोराव्हिया नावाच्या लेखकाने लिहिलेलं असंच काहीबाही वाचलेलं मला आठवतं.”
“वसंता, आमची मुलं गुणी आहेत. त्यांचं आमच्यावर खूप प्रेम आहे. पण निवृत्तीनंतर मला जाणवायला लागलं की आम्ही दोघे एकमेकांच्या आनंदासाठी कधी जगलोच नव्हतो. फक्त मुलांच्या स्वप्नपूर्तीसाठीच जगत होतो. मी तेव्हाच ठरवून टाकलं की जीवनाच्या ह्या सांजसमयी आम्ही दोघांनी एकमेकांचे आधार बनून राहायचे. आयुष्यात उरलेले अनमोल क्षण एकमेकांच्या आनंदासाठी समर्पित करायचे. मी तर म्हणतो वृद्धापकाळातच पतीपत्नींच्या नात्यातल्या सहवासाची खुमारी अधिकच वाढायला लागते.”
दोन दिवसानंतर अगदी जड मनाने आम्ही त्या उभयतांचा निरोप घेऊन बाहेर पडलो. थ्री टायर एसीच्या बोगीत येऊन बसलो. थोडेसे स्थिरस्थावर झाल्यावर, सविता म्हणाली, “आपले चार दिवस इथे किती मजेत गेले ना? त्या दोघांची दिवसभर कशी अविरत जुगलबंदी चाललेली असते. नवरा-बायको या नात्याची गंमतच काही और असते. काय ते, लुटुपुटीचं भांडण आणि काय तो एकमेकांचा प्रेमाचा वर्षाव. त्या दोघांच्या दरम्यान असलेलं आंबटगोड नातं मला पहिल्यांदाच इतक्या जवळून पाहायला मिळालं.”
“अग, मी सुद्धा पहिल्यांदाच साहेबांचे आणि वहिनींचे हे रूप पाहत होतो. त्यांचा एकमेकांवरचा लटका राग, लोभ, त्यांचे रुसवे, फुगवे, त्यांचे परस्परांतील प्रेम, आदर सगळं काही किती लोभस वाटत होतं. चपला लपवल्या म्हणून रागावणारे साहेब आणि मधुमेही साहेबांच्या पायांची काळजी करणाऱ्या वहिनी, कामवाली बाई आली नाही म्हणून लाद्या पुसणारे साहेब आणि ‘अचानक पाय घसरून पडले तर’ म्हणून काळजी करणाऱ्या वहिनी, वहिनींच्या आवडीची पैठणी आणणारे साहेब आणि साहेबांच्या वाचनाची आवड ओळखून त्यांना किंडल रीडर भेट देणाऱ्या वहिनी …. अशी कितीतरी मनोहर रूपं आपल्याला पाहायला मिळाली. पण एक जाणवलं, त्या दोघांच्या एकमेकांच्या विरूद्धच्या तक्रारीत, लुटुपुटीच्या भांडणात तर त्यांचं परस्परांविषयी असलेलं प्रगाढ प्रेम व काळजीच दडलेली जाणवत होती. सगळं कसं स्वच्छ, पारदर्शी असं ते आंबटगोड नातं ! ”
“सविता, तू पाहिलंस ना, लिंबाचं लोणचं जितकं अधिक मुरत जातं, तितकी तिची चव अधिकच बहारदार होत जाते. अगदी तसंच, साहेबांचे आणि वहिनींचे हे नाते प्रेमाने छान मुरत गेलेले आहे. नवरा बायकोचे नाते असेच असते कधी गोड तर कधी आंबट. लग्नानंतर फुलत फुलत जाणारे हे नाते आयुष्यात सुखाचा गोडवा घेऊन येते. वैवाहिक जीवन हे वेगवेगळ्या अनुभवांनी समृद्ध होत जाते. कधी प्रेम तर कधी भांडणे अशा प्रकारे आयुष्य पुढे सुरु राहते. आंबट गोड असे हे नाते हळुवारपणे जपायचे असते. लुटुपुटीची भांडणं हा सहजीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. त्या भांडणातून प्रेम वाढत जायला हवे आणि परस्परांतील नाते आणखी फुलत जायला हवे.”
“होय ना? मग आजपासून आपणही तसंच भांडायचं का? ” असं म्हणत सविता जोरजोरात हसत होती आणि मीही मनमोकळेपणाने हसत तिच्या हास्यात सामील झालो. आजूबाजूचे लोक आमच्याकडेच पाहत होते…!
– समाप्त –
© श्री व्यंकटेश देवनपल्ली.
बेंगळुरू
मो ९५३५०२२११२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈