श्री कौस्तुभ परांजपे
विविधा
☆ “खरेदीचे साइड इफेक्ट…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆
साइड इफेक्ट बऱ्याचदा औषधांचे, तेलाचे, क्रिमचेच असतात आणि ते नंतर दिसतात किंवा जाणवतात अस काही नाही. त्याचा त्रास ते घेणाऱ्याला होतो हे खरंय. पण लागोपाठच्या आणि सततच्या खरेदीचे सुद्धा साइड इफेक्ट असतात आणि ते आपल्या वागण्यात दिसतात अस लक्षात आल. आणि त्याचा त्रास समोरच्याला होतो.
खरेदी करायला कोणाला आवडत नाही… पण पुरुषांना सगळ्याच खरेदीत तेवढाच उत्साह असतो अस नाही. काही खरेदीत तो असतो… तर काहीवेळा तो आणावा लागतो. बायकांच्या बाबतीत खरेदी म्हणजे नशाच असते. उतरल्याच जाणवतच नाही. खरेदी जेवढी जास्त तेवढी ती चढतच जाते. मग आपली स्वतःची नसली तरीही.
आमच्याकडे एक कार्य होत. मग काय? खरेदीचा सुळसुळाट आणि उत्साहाचा महापूर आला होता. महापुरात सगळीकडे पाणीच पाणी दिसत. तसच या सुळसुळाटात आणि उत्साहात हातात पिशव्या आणि खिशात यादीच सापडत होती. याशिवाय अनेक सुचना होत्या त्या वेगळ्या. कुठे जायच, काय घ्यायच, तिथे काय घ्यायच नाही. भाव किती असेल. भावाच्या बाबतीत तुम्ही बोलू नका. त्यातल तुम्हाला काही कळत नाही. (नाहीतरी कशातल कळतंय….. अस पण हळूच बोलून होत होत.) सामान उचलण्याची घाई करू नका. हल्ली सामान घरपोच देतात. या आणि अनेक. या सुचनांमुळे काहीवेळा सुचेनासे होत.
घरचा माणूस म्हणून जवळपास सगळ्याच ठिकाणी माझी उपस्थिती अगदी प्रार्थनीय नसली तरी हवी होती. निदान गाडी घेऊन तरी चला…….. बाकीच आम्ही पाहून घेऊ. असे सांगत प्रार्थनीय उपस्थिती असणाऱ्यांची सोय झाली होती. गरज होती ती गाडीची आणि त्यांच्या सोयीच्या वेळेत. (याला म्हणतात काॅन्फिडन्स…….)
कार्यासाठी दागिने खरेदी करतांना यातच पण वेगळी डिझाईन, हिच डिझाईन पण वजनाला यापेक्षा थोड कमी किंवा जास्त. थोड लांब किंवा अखूड. दोन पदरी किंवा मोठं पेंडेंट. असा संवाद सारखा कानावर पडत होता. सोनं पिवळंच असल्याने त्यात वेगळा रंग मागायची सोय नव्हती. पण ती रंगाची कमी आम्ही दागिन्यांवर लावलेल्या खड्यांच्या रंगात आणि आकारात उभ्या उभ्या म्हणजे खडेखडेच शोधत होतो. घडणावळ जास्त आहे, हे वाक्य. आणि मधे मधे कॅरेट हा शब्द होताच. रेट मात्र फिक्स होता.
सोन्याच्या दुकानात भाव करण्याची सोय नसते. पण त्या विकणाऱ्याल्याच एक दोन दिवसात भाव काही कमी होण्याची शक्यता आहे काहो?…… अशीही विचारणा होत होती… कमी नाहीच पण वाढण्याची शक्यता आहे….. असे तो चेहऱ्यावरचे भाव न बदलता सांगायचा. त्याच बोलणं मनाला बरं वाटतं होतं. एकतर आज थोड स्वस्त मिळेल याचा आनंद. नाहीतर दोन दिवसांनी याच तिकीटावर हाच खेळ परत करायला लागेल याची काळजी.
इतर खरेदित या रंगात, त्या डिझाईन मध्ये, आणि त्या प्रकारात अशी विचारणा हातरुमाल, पर्स, पिशव्या, साड्या, पॅन्ट आणि शर्ट पिस, चप्पल, बुट अशा शक्य त्या सगळ्या वस्तुंच्या बाबतीत झाली. डिस्काउंट वर घसघशीत घासाघीस झाली.
किराणा मालातील साबण आणि पेस्ट या सारख्या काही वस्तू सोडल्या तर तांदूळ, पोहे, रवा, डोक्याला लावायचे तेल, चहा या सारख्या वस्तू सुद्धा सुटल्या नाहीत. रवा जाड हवा. पोहे जास्त पातळ हवे, किंवा नको. वेगवेगळ्या नावाचे पण पोहे असतात हे मला याचवेळी समजले. चहा मिक्स हवा, ममरी नको, हे माझ्या मेमरीत फिट्ट बसले. तांदूळ बासमतीच हवा, चिनोर, कोलम नको. तुकडा चालणार नाही. असं पाहतांना एक एक वस्तू आणि त्यांची खरेदी याचा तुकडा पाडला जात होता. म्हणजे खरेदी संपत नसली तरी काही प्रमाणात आटोपत होती.
त्यामुळे प्रकार, रंग, डिझाईन, भाव, डिस्काउंट या गोष्टी त्या काही दिवसात पाठ झाल्या होत्या. पाठ म्हणजे इतक्या पाठ की त्या पाठ सोडायला तयार नव्हत्या.
पण या सगळ्या खरेदीचा साइड इफेक्ट कार्य संपल्यावर जाणवला. नंतर परत बॅंकेतून पैसे काढण्यासाठी गेलो तेव्हा कॅशीयरला सुध्दा सांगितले. सगळ्या एकाच प्रकारच्या नोटा देऊ नका. वेगवेगळ्या द्या. त्यावर त्याने सुद्धा विचारले. काही कार्यक्रम आहे का?… हे झाले पैशाचे.
सलून मध्ये पण असंच झालं. कटिंग करायला बसल्यावर त्याने विचारले. कसे कापू? जास्त की साधारण?….. मी विचारल पैसे दोघांचे सारखेच लागतील नं? त्यावर त्याने ज्या नजरेने माझ्याकडे पाहिल ते त्याच्या आरशात मला दिसल…..
कार्याची दगदग झाल्यावर नंतर तब्येत थोडी नरमगरम वाटली. डाॅक्टरांकडे गेलो. त्यांनी तपासून तीनचार गोळ्या व एक बटलीतले औषध लिहून दिले.
औषधाच्या दुकानात तोच प्रकार. अरे या पॅकिंगमध्ये गोळ्या कशा आहेत ते दिसत नाही. जरा आकार आणि रंग दिसणाऱ्या दाखवा ना…… बाटलीत यापेक्षा वेगळा आणि लहान आकाराच्या नाही का?… किमतीत काही कमी जास्त…… गोळ्या यातच लहान नाही का?…. गिळायला बऱ्या असतात.
मी अस विचारल्यावर औषध विकणाऱ्याने चेहरा खाऊ का गिळू असा केला. पण साइडने त्याच्या चेहऱ्यावर माझ्या बोलण्याचा झालेला इफेक्ट मला दिसलाच…..
माझ्या लक्षात आलं. सतत रंग, डिझाईन, वजन, लहान, मोठ अस विचारत केलेल्या सततच्या खरेदीचा हा साइड इफेक्ट आहे……
असच एक कार्य बऱ्याच वर्षांपूर्वी माझ्याचसाठी घडवून आणल होत. त्याही कार्याचे काही साईड आणि वाईड इफेक्ट आता दिसायला लागले आहेत. पण त्यावर नंतर बोलू.
© श्री कौस्तुभ परांजपे
मो 9579032601
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈