श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “मला अश्रु देशील का ?” – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर  ☆

शनिवारी दुपारीच बंड्याचा फोन आला. “उद्या सकाळी वृध्दाश्रमाला भेट द्यायला येता का ?”

“ओके “! मी ही तयार होतोच. नाहीतरी बरेच दिवसांपासून वृद्धाश्रम बघायचं होतं.

सकाळी लवकर उठून बंड्याबरोबर निघालो. वाटेत बंड्याने चिवडा, मिठाई, पत्ते असे बरेच काही घेतले. आत शिरताच तिथली मंडळी खूष झाली. ” हाय हिरो ! ” हाय चिकण्या”!! अशा हाका सुरू झाल्या. सगळे वृद्ध आजी आजोबा आपले वय विसरुन बंड्याला हाका मारीत होते. बंड्याही त्यांच्याशी हसत उत्तरं देत होता. हातातील सर्व वस्तू ऑफिसमध्ये जमा करून फक्त एक छोटा मिठाईचा बॉक्स हातात घेऊन कोपऱ्यातल्या खोलीत शिरला.

त्या खोलीत व्हीलचेअरवर एक वृद्धा बसली होती. पंचाहत्तर एक वय असेल तिचे, पण चेहऱ्यावरील बुद्धिमत्तेचे तेज काही लपत नव्हते. डोळ्यातही वेगळीच चमक होती.

” ओय बुढी, कैसी हो ?” बंड्याने तिला पाहताच आरोळी ठोकली.

” नालायका आहेस कुठे ? तुझ्या मैत्रिणीला विसरलास की काय “? तिने खणखणीत आवाजात उत्तर दिले आणि हात पसरले.

बंड्या हसत हसत तिच्या मिठीत शिरला. माझी ओळख करून देताच तिने माझ्याकडे पाहून विनयाने हात जोडले. मी खाली वाकून पायाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करताच नको नको म्हणत तिने व्हीलचेअर मागे घेतली.

” ही माझी मैत्रीण. थोडी म्हातारी दिसतेय, पण लय खोडकर. एकमेकांना शिव्या दिल्याशिवाय दिवस जात नाही आमचा. मेल्यावर तिची सर्व इस्टेट माझ्या नावावर करणार आहे, म्हणून सहन करतोय तिला,” असे बोलून बंड्या हसला.

” काही मिळणार नाही तुला माझ्याकडून. मरणावर टपलाय माझ्या. डायबिटीस आहे हे माहीत असूनही गोड मिठाई आणतोस नेहमी. माझी इस्टेट तुझ्या नाही तर तुझ्या नातवाच्या नावावर करणार आहे मी”, तिने जोरात उत्तर दिले.

आश्चर्यचकित झालेला माझा चेहरा पाहून दोघेही हसू लागले. मग ती सांगू लागली, “मी जयमाला. पेशाने शिक्षिका, विद्यार्थ्यातून चांगले नागरिक घडवायची जबाबदारी माझी. एका शाळेतून प्रिन्सिपॉल म्हणून निवृत्त झाले. घरात नवरा आणि मी, मुलगा हुशार होता म्हणून बाहेर गेला आणि तिकडचीच गोडी लागली आणि तिकडचाच झाला. आज कुटुंबाबरोबर सुखात आहे. मुलगी लग्न होऊन चांगल्या घरात गेली  पंचवीस वर्षे संसार केला, पण माझ्याइतके आयुष्य नाही लाभले तिला. पाच वर्षांपूर्वी तीही एका छोट्या आजाराचे निमित्त होऊन देवाघरी गेली. त्या गोष्टीचा धसका माझ्या नवऱ्याने घेतला आणि दोन वर्षांपूर्वी तेही गेले .

मुलाने माझ्यासाठी चोवीस तास बाई ठेवली. परदेशातून पैसे पाठवत राहिला. मलाही हे गुडघ्याचे आजारपण सुरु झाले आणि ही व्हिलचेअर माझ्या नशिबात आली. माझ्या असल्या अवस्थेमुळे कुठलीच बाई टिकत नव्हती. मुलगी गेल्यावर जावयाने पण संबंध तोडले. मुलाला इकडे यायची इच्छा नाही. खूप निराश झाले होते मी.

शेवटी मुलाने नाइलाजाने वृध्दाश्रमाचा पर्याय आणला आणि मी आनंदाने स्वीकारला. इथे आल्यावर अवती भवती सर्व असायचे, पण एकटेपणाची भावना काही कमी व्हायची नाही. तेव्हढ्यात बंड्या भेटला. तो आणि त्याचे मित्र अनाथ आणि निराधार व्यक्तींवर आपले नातेवाईक समजून अंत्यसंस्कार करतात. देवा…. ! असेही लोक असतात तर समाजात. मग हे लोक मला आपले वाटू लागले.

हा बंड्या नेहमी हसरा. याला दुःख म्हणजे काय ते माहीत नसावे, असेच वाटते. कोणाच्या अंत्यसंस्काराची तयारी करताना याचा चेहरा गंभीर, पण डोळ्यांत दुःख दिसत नाही. पहिल्यांदा मला भेटला तेव्हा मिठाईचा तुकडा हाती दिला. मी म्हणाले, मला डायबिटीस आहे, तर म्हणाला, “असे किती वर्ष जगायचे आहे तुम्हाला ? पुरे झाले आता आयुष्याची आणि तब्बेतीची काळजी करत जगणे. मरण लवकर येऊ दे म्हणता आणि तब्बेतीची काळजी घेता, खा गप्प, तेवढीच वर्ष कमी होतील. मन मारून जगू नका, आणि मीच येणार आहे तुम्हाला पोहचवायला” . त्याचे हे प्रवचन एकून दिवसभर हसत होते.

त्या दिवसापासून माझे आयुष्य बदलून गेले. आता फक्त प्रसन्न रहाणे, स्वतःवर हसणे एवढेच मला माहितीय.”

त्यांचे बोलणे ऐकून आम्ही हसू लागलो.

मी म्हटले ” हो. हा असाच आहे, मीही याला कधी गंभीर बघितले नाही “.

“बंड्या आज फ्रेंडशीप डेच्या निमित्ताने मला एक गिफ्ट देशील ?”  तसा बंड्या हसला.

“च्यायला या वयातही तुझ्या इच्छा आहेतच का ? काय पाहिजे ग तुला ? तुझे अंत्यसंस्कार तर मीच करणार. दिवस ही करू का ?”

“नको. दिवस नको करुस, फक्त थोडे रडशील का माझ्यासाठी ? आपण मेल्यावर आपल्यासाठी कोणी रडणार नाही ही कल्पनाच काहीतरी वाटते रे ? तुला मी मित्र मानते, पण तूही रडणार नाहीस याची खात्री आहे मला. म्हणून नाइलाजाने आज तुझे अश्रू मागतेय, देशील का रे ?”

अनपेक्षित मागणी ऐकताच बंड्या हादरलाच, एका क्षणासाठी त्याचा चेहरा दुःखाने पिळवटून निघाला.  मी ही अस्वस्थ झालो.

“च्यायला! म्हातारे, काहीही मागतेस!”, असे म्हणत बंड्याने तिचे हात हातात घेतले.थोडा वेळ स्तब्ध होऊन तिच्या डोळ्यात पाहिले आणि डोळे पुसत पराभूत योद्ध्यासारखा खोलीच्या बाहेर पडला. पण डोक्यात “तुझे अश्रु मागते” हे शब्द फेर धरून नाचत होते…

संग्राहिका – सौ उज्ज्वला केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments