श्री मोहन निमोणकर 

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ “नागपंचमी …नागपूजेच्या पलिकडे…” – लेखक : अज्ञात ☆ श्री मोहन निमोणकर

साप आपले मित्र आहेत, निरुपद्रवी आहेत हे प्रत्यक्ष कृतीतून निलिमकुमार खैरेंनी दाखवले…त्यासाठी किती मोठे धाडस केले…त्याचा हा छोटासा वृत्तांत…

थोड्याच दिवसांत प्रकाश कर्दळे (निवासी संपादक, इंडीयन एक्सप्रेस) यांनी ही बातमी देशभर व्हायरल केली … ‘नीलिमकुमार खैरे बहात्तर विषारी सापांच्या सान्निध्यात बहात्तर तास राहून नवा जागतिक विक्रम प्रस्थापित करणार…’

बातमी देशभर पसरली. आम्ही सगळेच जोशात तयारीला लागलो. अण्णा (निलिमकुमार खैरे) त्या वेळी ब्लू डायमंडमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होता. जगप्रसिद्ध उद्योगपती शंतनुराव किर्लोस्करांचे धाकटे बंधू कै. पी. एल. किर्लोस्कर हे त्यावेळी ब्लू डायमंड हॉटेलचे कार्यकारी संचालक होते. खूपच सरळमार्गी आणि  सज्जन उद्योगपती असा त्यांचा लौकिक होता. अण्णाच्या आगामी विश्वविक्रमाची योजना आम्ही त्यांच्यासमोर मांडली. त्यांना ती पसंत पडली. आपल्या कंपनीचा एक तरुण कर्मचारी जागतिक विक्रम करण्याचा प्रयत्न करतोय याचं त्यांना समाधान वाटलं. त्यांनी आर्थिक सहाय्य करण्याचंही मान्य केलं. माझा मित्र सुहास बुलबुले तेव्हा बी. जे. मेडिकल कॉलेजचा ‘कॉलेज रिप्रेझेंटेटिव्ह’ होता. त्याच्यामुळे बी.जे.च्या मैदानावर हे वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचं ठरलं. आवश्यक त्या परवानग्या मिळवल्या आणि आम्ही खोली बांधण्याच्या मागे लागलो. ॲक्रिलिक शीट्स वापरून १० फूट बाय १० फूट आकाराची पारदर्शक खोली तयार केली. खाली वाळू पसरली. आतमध्ये बसण्यासाठी एक आरामखुर्ची ठेवली. दुसरीकडे विषारी साप गोळा काम सुरू होतं. आमचा सर्पप्रेमी मित्र राजन शिर्के याच्या नेतृत्वाखाली पुण्यातल्या सर्व सर्पमित्रांनी विषारी साप जमवायला सुरुवात केली. कलकत्ता स्नेक पार्कचे संस्थापक दीपक मित्रा अण्णाबद्दलची बातमी वाचून त्यांच्याकडचे विषारी साप घेऊन स्वतः पुण्यात आले. अखेर ठिकठिकाणाहून नाग, माया घोणस, फुरसं आणि पट्टेरी मण्यार अशा एकूण ७२ विषारी सापांची जमवाजम झाली. दरम्यान, मी इंग्लंडच्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स या कंपनी संपर्क साधून होतो. या रेकॉर्ड्ससाठी त्याच क्षेत्रातील दोन व्यक्तींची रेफरी किंवा पंच म्हणून नेमणूक केली जाते. मुंबईच्या हाफकिन इन्स्टिट्यूटचे उपसंचालक तसंच सर्पविषतज्ज्ञ डॉ. नीलकंठ वाड आणि पुण्याच्या मॉडर्न कॉलेजच्या प्राणिशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एस. वाय. परांजपे या दोन प्रतियश शास्त्रज्ञांची अण्णाच्या वर्ल्ड रेकॉर्डसाठी रेफरी म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी एक रजिस्टर तयार केलं होतं. दर तासाला अण्णाच्या आणि सापांच्या हालचालीच्या डोळ्यात तेल घालून नोंदी घेऊन त्यावर दोघांना सह्या करायच्या होत्या.अखेर सगळी तयारी झाली आणि २० जानेवारी १९८० रविवारी या दिवशी दुपारी चार वाजता अण्णाने सापांच्या खोलीत प्रवेश केला. पुढचे बहात्तर तास नाट्यमय असणार होते. अण्णाला काही होणार नाही याची मनोमन खात्री होती. तरीही थोडी धाकधूक होतीच. अण्णा आत गेला तेव्हा त्याच्या आरामखुचीवर काही साप आरामात विराजमान झालेले होते. बऱ्याच वेळाने अण्णाला खुर्चीवर बसायला जागा मिळाली. या काळात काही सापांनी एकमेकांशी भांडणं उकरून काढली. अण्णानेच ती सोडवली. थंडीमुळे काही साप त्याच्या टी- शर्टमध्ये घुसले. अण्णाने एकेका सापाला हलकेच धरून बाहेर काढलं पण एकाला काढलं की त्याच्या जागी दुसरा हजर! शेवटी हताश होऊन अण्णा तसाच झोपून गेला. दहा-बारा सापही त्याच्या टी-शर्टमध्येच झोपले. आम्हालाही बाहेर डोळा लागला. सकाळ झाल्यावर अण्णाने एकेका सापाला हलकेच बाहेर काढून बाजूला ठेवलं आणि चहा घेतला. नियोजित वर्ल्ड रेकॉर्डच्या बहात्तरपैकी चौदा तास संपून गेले होते. अजूनही अठावन्न तास बाकी होते. दरम्यान, ब्लू डायमंड हॉटेलमधून खास अण्णासाठी सॅण्डविचेस आणि फुट ज्यूस आला होता. अण्णाने फक्त थोडा ज्यूस घेतला. सॅण्डविचेस आम्ही संपवली.

आता अण्णा आणि साप जणू एकमेकांसोबत एकरूप झाले होते. सुरुवातीला त्या खोलीत ७२ साप आणि एक माणूस होता. पण आता मात्र एका खोलीत एकत्र नांदणारे ते ७३ प्राणी होते.

अण्णाचा हा विक्रम बघण्यासाठी तीनही दिवस पुणेकरांची प्रचंड गर्दी होत होती. एवढे विषारी साप अंगाखांद्यावर खेळत असूनही माणसाला चावत नाहीत, हा लोकांसाठी चमत्कारच होता. त्यामुळे थक्क होऊन लोक त्याकडे पाहत राहत. ज्या कारणासाठी आम्ही काम करत होतो आणि ज्यासाठी अण्णाने हा जागतिक विक्रम करण्याचा घाट घातला होता तो सफल होताना पाहून समाधान वाटत होतं. अत्यंत थरारक आणि नाट्यमय असे तीन दिवस होते ते. अण्णासाठी तर होतेच, पण आमच्यासाठीही होते. त्या तीन दिवसांत आई-दादांची अवस्था काय झाली असेल याची कल्पनाच केलेली बरी. ते दोघंही खाणंपिणं आणि झोप -सोडून घरीच थांबले होते. आई तर तीन दिवस देव पाण्यात ठेवून बसली होती.

अखेर ७२ तास संपत आले. जागतिक विक्रम घडण्याची वेळ आली! या आगळ्यावेगळ्या विक्रमाच्या पूर्ततेप्रसंगी शंतनुराव किर्लोस्कर स्वतः जातीने हजर होते. पुण्यातले आणि राज्यातले आमचे सर्प आणि प्राणिमित्रही गोळा झाले होते. दीपक मित्रांसारखी राज्याबाहेरून आलेली मंडळीही होती. बुधवारी, २३ जानेवारीला दुपारी चार वाजता दीपकने केबिनच्या दाराची कडी काढली. बाहेर येताच अण्णाने त्याला आलिंगन दिलं. त्या दोघांचे आणि आमचेही डोळे आनंदाश्रूंनी भरून वाहत होते. त्यानंतर पत्रकार परिषद पार पडली. अण्णाचे अनेक फोटो काढले गेले. त्यानंतर मी ‘गिनीज बुक’च्या लंडनमधल्या मुख्य कार्यालयात जागतिक विक्रम प्रस्थापित झाल्याचं वृत्त विश्रामबाग- वाड्याजवळच्या ऑफिसमधून तारेने कळवून टाकलं. अण्णाने जागतिक विक्रम कला होता. ७२ तासांपूर्वी माणसांचा एक प्रतिनिधी सापांच्या सान्निध्यात रहायला गेला आणि ७२ तासांनंतर तो सापांचा प्रतिनिधी बनून माणसांत आला होता! पुढे आयुष्यभर अण्णा सापांचा अन् प्राण्यांचा प्रतिनिधी म्हणूनच काम करत राहिला. आजही करतो आहे.

— ‘सोयरे वनचरे’ (ले.अनिल खैरे) या पुस्तकातून

(माहिती संकलन : सतीश खाडे,पुणे)

प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments