श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ चळवळ – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

(मागील भागात आपण पहिले –  आपल्याला फक्त दहा मिनिटाची वेळ दिलेली आहे. तेव्हा तुम्ही आणि तुमचा साक्षीदार विश्वास चक्रवर्ती बंगालमधून पुण्याला का आला हे मला कळणे महत्त्वाचे आहे. आता इथून पुढे )

जय सरकार – नेने असोशिएट्स च्या सुरेश नेनेंनी प्रश्न केला तुम्ही आणि तुमचा साथीदार विश्वास चक्रवर्ती बंगालमधून पुण्याला का आलात ? याकरिता सहा वर्षापुर्वीचा काळ डोळ्यासमोर आणावा लागेल. बंगालमधील एका लहान शहरात माझे आईबाबा राहत आहेत. दोघेही तेथील कॉलेजमध्ये प्रोफेसर. मी जय आणि छोटी कॉलेजमध्ये जाणारी बहिण तनुजा. आई वडिल प्रोफेसर्स असले तरी चळवळीतील होते. आंदोलनात भाग घेत होते. अन्यायाविरुध्द बोलत होते. लिहित होते. आमच्या घरी आंदोलनकर्त्यांची उठबस असायची. थोडक्यात आंदोलनकर्त्यांचे मुख्य केंद्र आमचे घर होते. सहा वर्षापूर्वी बंगालमध्ये मुंबईच्या उद्योगपतीने मोटर कारखाना सुरु करण्याचे ठरविले. त्याकरिता बंगाल सरकारने जबरदस्तीने शेतकर्‍यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या. त्या विरुध्द आंदोलन झाले. माझे आईबाबा आंदोलनात सक्रिय होते. एकदा जिल्हाधिकार्‍याकडे या जमिनींबद्दल मोर्चा होता. हजारो लोक मोर्च्यात सामील झाले होते. माझ्या आईवडिलांना आधीच स्थानबध्द केले होते, पण माझी कॉलेजमध्ये जाणारी बहिण तनुजा. तिचा कॉलेजमधील मित्र विश्वास चक्रवर्ती आणि शेकडो कॉलेज विद्यार्थी या मोर्चात सामील झाले होते. या वेळी पोलीस अधिक्षक होते विजयकुमार चौहान. मोर्चा मोडून काढण्याचा त्यांनी हुकूम केला. पहिल्यांदा अश्रूधुर आणि नंतर गोळीबार करण्याची ऑर्डर दिली. त्यात तीस माणसे गोळी लागून मृत झाली. माझी १९ वर्षाची बहिण तनुजा त्यापैकी एक होती. विश्वासच्या दंडाला गोळी लागली पण तो बचावला. आम्हा सर्वांची लाडकी बहिण एवढ्या तरुण वयात आम्हाला सोडून गेली. माझ्या आईवडीलांवर आणि अशा कित्येक पालकांवर असा मोठा प्रसंग आला. विश्वास चक्रवर्तीची तनुजा खास मैत्रिण. दोघांचे एकमेकांवर विलक्षण प्रेम होते. मोर्चात विश्वास आणि तनुजा बाजू-बाजूला होते. विश्वास थोडक्यात बचावला. त्याला हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केल्यानंतर माझा हात हातात घेऊन त्याने पोलीस अधिक्षक चौहान यांना ठार मारण्याची प्रतिज्ञा केली. आणि त्यासाठी माझे सहाय्य मागितले आणि मी त्याला शब्द दिला. पण चौहानला मारणे तेवढे सोपे नव्हते. त्यांना कडेकोट पोलीस संरक्षण होते. म्हणून मी आणि विश्वास नक्षलवादी संघटनेत सामील झालो. नक्षलवाद्यांकडे संघटना होती. कार्यकर्ते होते, हत्यारे होती, पैसा होता. समाजातील अनेक प्रतिष्ठित लोकांची त्यांना सहानुभूती होती. आमच्या मनाची तडफड त्यांना समजली. त्यांनी सर्व प्रकारचे मदत करण्याचा शब्द दिला. दरम्यान चौहान पुण्याला स्थायीक झाल्याचे कळले. आमचे कार्यकर्ते त्यांच्या मागावर होतेच. मी आणि विश्वास या आधी चार वेळा पुण्याला येऊन गेलो. चौहानांचे घर, त्यांची सोलापूर रोडला असलेली शेतजमीन, याची माहिती, नकाशे आमच्याकडे होते. चौहान रोज सकाळी साडेनऊला आपल्या घरातून बाहेर पडतात आणि दहा वाजता आपल्या शेताकडे पोहोचतात हे माहित झाले होते. तसेच त्यांच्या गाडीत एक अंगरक्षक असतो हे कळले होते. पुण्यातून सोलापूर रोडला वळून दोन मिनिटावर स्पॉट निश्चित झाला होता. विश्वास मोटरसायकल चालवणार होता आणि मी पिस्तुल घेऊन मागे बसलो होतो. दोघांच्याही अंगात निळे जॅकेट होते. प्लॅननुसार सर्व पार पडले. पण अंगरक्षकाने गोळीबार केला आणि विश्वासला वर्मी गोळी लागली आणि त्याचा गाडीवरील ताबा सुटला. मी रस्त्यावर पडलो. आणि पळण्याचा प्रयत्न करत होतो परंतु लोकांच्या तावडीत सापडलो. खरं तर माझ्या पिस्तुलात भरपूर गोळ्या होत्या, त्या रस्त्यावरील लोकांवर मी वापरल्या नाहीत, कारण ते माझे दुश्मन नव्हते. दुश्मन फक्त चौहान होता. त्याला संपवायचे होते. तो संपला पण तनुजानंतर तिचा आणि माझा जवळचा मित्र विश्वास पण गेला.  

जय नेनेंकडे वळून म्हणाला – ‘‘मी पोलीसांकडे हत्येचा कबुली जबाब लिहून दिलेला आहेच, तेव्हा वकिलसाहेब तुमची ही तरुण सहकारी माझा कसला बचाव करणार? आता मला जगायचे नाही, माझी लाडकी बहिण मारली गेली, मित्र विश्वास मारला गेला आमच्या घरी माझे आईवडिल जिवंत आहेत फक्त, खरंतर त्यांच्यातला जीव कधीच गेलाय.’’ जय बोलायचा थांबला. नेनेसाहेब स्तब्ध झाले होते. माधुरी स्तब्ध होती.

‘‘ओके. तरीपण वकिल म्हणून आमचे कर्तव्य आहे, तुम्हाला या हत्येच्या आरोपातून मुक्त करणे. गरज पडेल तेव्हा माधुरी तुम्हाला भेटेलच. तिला सहकार्य करा. आम्ही तुमची केस कोर्टात लढणार.’ एवढे बोलून नेने आणि माधुरी बाहेर पडली.

नेनेंची गाडी जेलमधून निघाली आणि पाच मिनिटानंतर गाडी एका बाजूला उभी करुन नेने म्हणाले, माधुरी या जयची कथा विलक्षण आहे, चुटपुट लावणारी आहे. युपीएस्सी परीक्षेत देशात पंचेचाळीसावा आलेला तरुण आज हत्येच्या आरोपाखाली तुरुंगात आहे आणि त्याला फाशी होण्याची शक्यता आहे. सरकार आणि पोलीस यंत्रणा त्यांच्या हातात असलेल्या अधिकाराने कायदा धाब्यावर बसवतात आणि चौहानांसारखे पोलीसांमधील अधिकारी सत्ता राबवतात. आंदोलने चिरडतात आणि त्यातून तनुजासारखे कोवळे जीव नाहक मरतात. काही वेळा आपल्या देशात लोकशाही आहे की हिटलरशाही असा प्रश्न पडतो.’’

माधुरी गप्प होती. जयच्या व्यक्तिमत्त्वाने माधुरी दिपून गेली होती. त्याचे दिसणे, त्याचे बोलणे, त्याचे सद्गदीत होणे सारेच वेगळे. नेने सरांनी गाडी पुन्हा सुरु केली. ‘‘माधुरी नितिनला सांगून या केसविषयी लागतील ती कागदपत्रं मिळव. जय आणि विश्वासचे विमान तिकिट, हॉटेलमधील वास्तव्य, त्यांनी वापरलेली गाडी, सोलापूर रोडवरील साक्ष दिलेले लोक यांची भेट घे. पोलीसांच्या तपासात चुका या होतातच. त्या चुकांवर लक्ष दे. शिवाय बंगालमध्ये जाऊन त्याच्या नातेवाईकांना भेट. त्याकरिता कलकत्त्याला जावे लागले तरी हरकत नाही. आणि वेळोवेळी मला रिपोर्ट देत जा. पण माधुरी तुला सांगतो मला हा जय सरकार फार फार आवडला. खरंतर तो एक आदर्श, हुशार सरकारी अधिकारी व्हायचा ते सोडून काय झाले बघ!’’

गाडी ऑफिसजवळ आली आणि माधुरी गाडीतून उतरुन आपल्या केबिनमध्ये गेली. खुर्चीत बसली आणि तिच्या डोळ्यासमोर आला तरुण, रुबाबदार जय सरकार. तिने मोबाईलमध्ये पाहिले. प्रतिक, तिच्या चार महिन्यानंतर होणार्‍या नवर्‍याचे दोन मिस्डकॉल होते. मघा तुरुंगात जय समोर असताना मोबाईल स्विच ऑफ केला होता. तिने तो चालू केला. प्रतिकचा मेसेज पण आला होता फोन करण्यासाठी. पण माधुरीने त्याकडे दुर्लक्ष केले. यावेळी तिच्या डोळ्यासमोर होता जय.

माधुरीने नितीनला बोलावले आणि चौहान हत्येसंबंधी सर्व पुरावे जमा करायला सांगितले. तसे जेट विमान ऑफिसमध्ये जाऊन जय आणि विश्वास यांच्या आगमनाची तारीख, हॉटेलमधील वास्तव्य, खरेदी केलेली मोटरसायकल, पेट्रोल भरण्याची जागा इत्यादी सर्वांची खात्री करायला सांगितली. ती स्वतः शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गेली. आणि इन्स्पेक्टर कोल्हेंकडून हत्येची माहिती घेतली.

सायंकाळी थकून माधुरी घरी पोहोचली. तेव्हा तिच्या अवतीभवती जय होता. प्रतिकला फोन करण्याची तिला इच्छा होईना. वॉश घेऊन माधुरी गॅलरीत बसली तेव्हा तिला तुरुंगात जय बोलत असतानाचा शब्द न् शब्द आठवत होता. कल्पनेनेच तिला जयचे आईवडील, चळवळीतील त्याचे सहकारी, कॉलेजमध्ये जाणारी लहान बहिण तनुजा, तिचा मित्र विश्वास चक्रवर्ती सारे कसे डोळ्यासमोर येत राहिले. युपीएस्सीचा अभ्यास करणारा जय, युपीएस्सीची परीक्षा देणारा जय आणि नंतर तनुजाच्या मृत्युने कोळसलेले जय आणि त्याचे आईबाबा, विश्वास सारे सारे कल्पनेनेच डोळ्यासमोर येत होते. मग जय आणि विश्वास यांचे नक्षली चळवळीत सामील होणे, वारंवार पुण्याला येणे, चौहानांचा पाठलाग करणे, मोटरसायकलवरुन चौहानांवर गोळ्या मारणे आणि मग विश्वासचा डोळ्यासमोर मृत्यु पाहणे, मग लोकांकडून आणि मग पोलीसांकडून पकडले जाणे, किती मार खाल्ला असेल जयने? पोलीस अधिक्षकांची हत्या करणार्‍याला पोलीसांनी किती छळले असेल? कल्पनेनेच माधुरीच्या डोळ्यात पाणी आले. गळ्यात हुंदका आला. आता काय करु शकते मी जयसाठी ? मी त्याला सोडवू शकते का? माधुरीच्या जीवाची घालमेल होत होती. दोन वेळा जेवणासाठी आई हाक मारुन गेली पण माधुरीचे लक्ष नव्हते.

रात्री जेवताना आईशी ती जय सरकारबद्दल बोलली. तिचा प्रत्येक घास जय च्या आठवणीतून तोंडात जात होता. तुरुंगात जयला कसले अन्न मिळत असेल? या विचाराने तिचा घास घशात अडकत होता. दुसर्‍या दिवशी वकिलरुममध्ये तिची मैत्रिणी सुवर्णा भेटली.

सुवर्णा – ‘‘काय गं माधुरी, काल चौहान हत्येच्या खुन्याला भेटायला गेलेलीस ना तुरुंगात? भिती नाही वाटली?’’

माधुरी – ‘‘भिती! कदाचित कालची भेट आयुष्यातील सर्वोत्तम भेट ठरावी. मी भेटायला गेलेला तरुण गुन्हेगार खराच पण युपीएस्सी परीक्षेत देशात पंचेचाळीसावा आलेला, सुशिक्षित आईबाबांचा मुलगा, तरुण, देखणा, अतिशय संवेदनाशील असा अठ्ठावीस वर्षाचा तरुण होता. त्याला भेटणे ही अविस्मरणीय घटना ठरली माझ्या आयुष्यात.’’ आणि माधुरी सुवर्णाला जय सरकारबद्दल सांगत सुटली. माधुरी कोसळणार्‍या धबधब्यासारखी बोलत राहिली आणि सुवर्णा ऐकत राहिली. एवढं ऐकून घेतल्यावर सुवर्णा म्हणाली – ‘‘माधुरी तु जयच्या प्रेमात पडली की काय?’’ तिच्या या प्रश्नाने माधुरी भानावर आली.

‘‘नाही गं, काय तरी काय?’’ असे म्हणत माधुरीने फाईलमध्ये लक्ष घातले. पण त्या फाईलमध्ये तिचे लक्ष कोठे लागायला ? माधुरीच्या लक्षात आल प्रतिकचे दोन फोन येऊन गेले कालपासून या गडबडीत त्याचा फोन घेणे काही जमले नाही. तिने त्यास सायंकाळी ५ वाजता वैशाली कॅफेमध्ये भेटूया असा मेसेज केला.

क्रमश: भाग-२ 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments