सुश्री नीलांबरी शिर्के

? वाचताना वेचलेले ?

☆ बाळंतपण — अज्ञात ☆ संग्राहिका – सुश्री नीलांबरी शिर्के ☆

 बाळंत या शब्दाचाचं अर्थ मुळात बाळ तरी, नाही तर अंत तरी असा आहे.

गर्भात आकाराला आलेला जीव पूर्ण रुपात साकारताना मांडलेला जीवाचा आकांत म्हणजे बाळंतपण. 

बाळंतपण म्हणजे असतो बाईचा नवा पुनर्जन्म.

बाईपणातून आईपणात रूपांतर होणारी अत्युच्च पातळी म्हणजे बाळंतपण.

बाळंतपणाच्या प्रसूती वेदनांची तीव्रता असते तरी किती..? तर ४३ डेल इतकी… म्हणजे माणसाची २० हाडे फ्रॅक्चर झाल्यानंतर जितक्या वेदना होतात माणसाला तितक्या वेदना बाळंतपणात सहन कराव्या लागतात बाईला.

दुःखातून जन्म पावणाऱ्या वेदना वाहतात नेहमी दुःखाचा भार… पण इथं असतं उलटं…

वेदनेतून सुख जन्माला येतं आणि शेवटी मानते ती या वेदनांचेचं आभार.

वेदना कोणाला हवीहवीशी वाटेल…?

परंतू कितीही असह्य असल्या तरी  तिला त्या हव्याहव्याशा वाटतात.

वेदना नको म्हणून कुठलीही बाई नाकारत नसते कधीच बाळंतपण.

मरणयातना भोगून पुन्हा मिळणार असते तिला जिवंतपण.

वेदनेचं नी बाळंतपणाचं नातं असतं अतूट.

सोसत नसते तरी सोसते…अनावर किंकाळी फुटत असते.

व्याकुळ होते…कासावीस होते भान हरपून जात असते.

आणि जीवन मरणाच्या मधली झुंज बाई देत असते.

शेवटी बाळ तरी…नाही तर अंत तरी.

 

इतक्या अटीतटीची निकराची झुंज असते बाळंतपण म्हणजे.

कित्येक बाया बाळंतपणात आई होताना गेल्या आहेत हे जग सोडून… मागे एखादं गोंडस बाळ ठेऊन.

कित्येक आया आजही भोगताहेत बाळंतपणानंतरच्या कळा अजून.

पण नसते कधीच भीती तिच्या मनात अशा दुर्दैवी घटनांची.

किती मोठा त्याग असतो ना बाईचा…आई होण्यासाठी… शरीरासोबत जीवाचं समर्पण देते ती यासाठी.

 

शेवटी अनंत यातनेचा वेदनेचा अंत पाहणाऱ्या सहनशीलतेचा सामना करून होते ती बाळंत..

टाकते सुटकेचा निश्वास…देते एका जीवाला श्वास…जणू ओतते आपला जीव त्या जीवात.

हाडामासाचं जिवंत-साजिवंत सुंदर कलाकृती साकारणारी विश्वातली एकमेवाद्वितीय कलावंत असते ती म्हणजे बाळंतीण.

 

बाळ जन्म घेतो आणि बाईचाही आई म्हणून जन्म होतो.

सोपं नाही आई होणं ते दिव्य पार करावं फक्त बाईनं.

आईपणाच्या अंगावर फुटणारा पान्हा.. आणि छातीला बिलगून दूध पिणारा तान्हा…

आहे ना हा अद्भुत आणि अद्वैत नात्याचा नमुना..

बाईलाच आईपणाची का हो असते चाहूल..?.. वेदनेचा हा भोगवाटा बाईच्याच का वाट्याला ?

तिच्याच वाट्याला निसर्गानं का हे बाळंतपण दिलंय..?.. निसर्गानं नवनिर्मितीचं आणि सृजनशीलतेंच सौख्य एक मातीच्या आणि दुसरं मातेच्या पदरी घातलंय.

 

मातीच्या आणि मातेच्या नावात एका वेलांटीचा फरक आहे असं म्हणतात. .. खरंय ते…

जशी माती तशी माता… माती भिजते..ओलावते…पाझरते…तिच्या कुशीत बियाणं रुजत…पोसतं…फुलत…बहरतं.

अगदी तशीच माता ओलावणारी, पान्हावणारी, पोसणारी, मायेनं अखंड पाझरणारी.

 

माती कुणालाही अंतर देत नाही … कुणामध्येही भेद करीत नाही… मातीशी कसंही कुणी वागलं तरी माती कधीचं सोडत नाही आपलं मातीपण.

असंच आई जपत असते आपलंही आईपण.

मातीसारखंच मातेला आईच्या कसोटीवर उतरावं लागतं.

आणि म्हणूनच तर बाईला आईचं वरदान लाभलेलं असत.

सोपं नसतं आई होणं…

त्यासाठी बाईच्या जन्माला यावं लागतं… आणि आई होण्यासाठी प्रत्येक बाईला बाळंतपणातून जावं लागतं.

लेखक : अज्ञात. 

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments