श्री अरविंद लिमये
विविधा
☆ नकळत सारे घडते..! ☆ श्री अरविंद लिमये ☆
प्रचंड वेग,तीक्ष्ण धार आणि तीव्र प्रतिक्रिया या सगळ्यांना अतिशय मनापासून स्वतःत सामावून घेऊनही वरवर शांत,सौम्य वाटणारा पण त्या वेग,धार किंवा तीव्रतेमुळे अंतरंगी अफाट सामर्थ्य धारण करणारा असा हा अनोखा शब्द..आवेग!
या शब्दाचे विविध अर्थ पाहिले तर तो प्रत्येक अर्थ स्वबळावर ‘आवेग’ या शब्दाचा पैस सर्वांगाने व्यक्त करण्यास असमर्थ ठरतोय हे लक्षात येईल.
जोर, जोम,आवेश,झपाटा हे अर्थ आवेगाची सूचक रेखाकृती फारतर रेखाटू शकतील पण त्यात इतर विविध अर्थरंगभरण त्यांना शक्य होत नाही.तिरीमिरी, त्वेष, क्षोभ, प्रक्षोभ, मन:क्षोभ हे अर्थशब्द ‘आवेग’ या शब्दाच्या मुख्यत: करड्या रंगछटाच ठळकपणे व्यक्त करु शकतील. सळ,उबळ,उद्रेक,झटका, हे अर्थ फक्त आवेगामागची असह्यता सांगू शकतील तर त्वरा, घाई, लहर, लाट, हे अर्थ त्याक्षणीच्या मनोवस्थेतली अधीरता सूचित करतील आणि लोंढा,तीव्रता,धार,तडाखा यासारखे अर्थ वरवर शांतपणे तेवणाऱ्या ज्योतीसारख्या भासणाऱ्या ‘आवेग’ या शब्दातला चटका प्रत्ययास आणून देतील.
या सगळ्याच वरवर भिन्न वाटणाऱ्या अर्थशब्दांत आवेगाचं बहुआयामी व्यक्तिमत्त्व उलगडून दाखवणारी एकेक परस्परवेगळी रंगछटा लपलेली आहे!
असं जरी असलं तरी या सर्व अर्थशब्दांत एक समान धागाही आहेच.हे सगळे शब्द त्या त्या क्षणीची भावविवशता आणि भावनोत्कटताच व्यक्त करत असतात आणि त्याद्वारे या दोन्हीत लपलेल्या अधीर, उत्सुक, असह्य अशा विविध मनोवस्थाच सूचित करीत असतात.ते सूचन विविध रंगांमधून असलं तरी त्याक्षणीची मनाची अधीर हतबलताच व्यक्त करीत असते!
एका अल्पाक्षरी शब्दाचा हा अर्थपसारा खरोखरच अचंबित करणारा आहे. जोर, जोम, आवेश,द्वेष यातला प्रतिकारासाठीचा ठामपणा, तिरीमिरी,उद्रेक,झटका यातली असहायतेतून निर्माण झालेली अतिरेकी प्रतिक्रिया,क्षोभ,प्रक्षोभ यामधला तीव्र संताप, उमाळा,लाट यामधला मायेचा झरा, लोंढा,तडाखा,झपाटा यातून वेगाने होऊ घातलेला आघात,आणि उग्रता,धार यातली भयभित करणारी संतापाची तीव्रता हा सारा ऐवज सामावून घेणाऱ्या आवेगाचं या सर्व अर्थशब्दांतही लपलेलं एक वैशिष्ट्य म्हणजे भावना वेगात उमटणाऱ्या भल्याबुऱ्या, तीव्र, लोभस, उत्कट वा अतिरेकी अशा सर्वच प्रतिक्रियांमागची नेमकी मनोवस्था! त्या अवस्थेतल्या अधीर, उत्सुक, अस्वस्थ मनाला सारासार विचार ओझरता स्पर्शही करु शकत नाही. त्या अवस्थेत भावनांची उत्कटता एवढी पराकोटीची असते की सारासार विचारासाठी आवश्यक असणारं स्वस्थपणच त्याक्षणी मन हरवून बसलेलं असतं.मनाच्या त्या गारुडअवस्थेत आनंद असो दु:ख असो वा प्रेम, माया किंवा क्षोभही ते इतकं उत्कट किंवा तीव्र असतं की त्या झपाटलेल्या आवेगात उमटणारी प्रतिक्रिया त्या अंगभूत उत्फुर्ततेनेच व्यक्त होते.ती जाणिवपूर्वक व्यक्त केली जात नाही तर ती नकळत व्यक्त होते! संतापाच्या भरात उचलला गेलेला हात असो, अत्यानंदाने होणारी थरथर न् डोळ्यात दाटणारे अश्रू असोत, किंवा प्रेमाने दिलेलं उत्स्फुर्त आलिंगन असो ते सगळं नकळतच घडत असतं आणि त्या त्यावेळी भावनातिरेकातून नकळत उमटणाऱ्या या सगळ्याच अस्सल नैसर्गिक प्रतिक्रिया ही त्या भावनांमधील आवेगाचीच परिणती असते!!
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈