श्री नंदकुमार पंडित वडेर
प्रतिमेच्या पलिकडले
☆ आभाळाचा वाढदिवस… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
.. आभाळाचा वाढदिवस.. हो हो तुमच्या आमच्या माणसां सारखाच आभाळाचा वाढदिवस…कितवा वाढदिवस? म्हणून किती कुत्सितपणे शंका काढताय ना… तुमचं सगळयांचं असचं ठरलेलं असतं.. वाढदिवसाला मोजमाप लावयाचं.. त्याची जन्मतारीख कोणती? ते कोणतं वर्ष होतं.. मग आता किती पूर्ण झाली? ( अजुन उरली किती?) किती गणिती प्रश्न उभे कराल… एखाद्याला जन्मतारीख ठाऊकच नसेल… नसेल त्यावेळी तशी नोंद करून ठेवायची पध्दत तर त्याने त्याचा कधी नि कसा साजरा करावा वाढदिवस?.. तुम्हीच सांगा! त्याला वाटत नसेल आपलाही वाढदिवस साजरा करावा म्हणून.. आणि अश्या कितीतरी गोष्टींच्या सहवासात आपण आलेलो असतो… मग घरच्या नित्योपयोगी वस्तू असतील.. संस्था, आस्थापना, प्राणी, वाहन, सारं सारं काही… आपल्या संपर्कात आल्यापासून त्याची कालगणना आपण सुरू करतो… कदाचित त्याची एक्सपायरी डेट सुध्दा आपल्या ठाऊक असते… त्याची वारंटी गारंटी चा कालावधी लक्षात ठेवतो आणि मग अभिमानाने दर वर्षी त्याचा वाढदिवस साजरा केलाच तर, करण्यात आनंद मानतो… पण चंद्र सूर्य तारे, ग्रहगोल, हवा,पाणी, नद्या, तळी, समुद्र, आकाश ,डोंगर निसर्ग याचं काय.. ते करत असतील का स्व:तापूरता वाढदिवस साजरा.? .. आपल्या नकळत..निसर्गाची पूजा दरवर्षी या ना त्या नावाने आपण करत असतो तोच दिवस त्याचा वाढदिवस म्हणून साजरा करायला काय हरकत आहे…वसुंधरादिन …काही वेळा वर्षातून दोन तीनदा देखील आपण त्याचे पूजन करतो तेव्हा तेव्हा देखील वाढदिवस करायला काय हरकत आहे… आपण नाही का तारखेने, तिथीने तर वाराने वगैरे वगैरे वाढदिवस एकाहून अधिक वेळा साजरा करतो मग यांचा केला म्हणून बिघडले कुठे. त्या सगळयांनी सतत निरपेक्ष आपल्या सेवेला हजर असावे आणि बदल्यात आपण त्यांना काय देणारं… साधं गिफ्ट पण आपण कधीच देत नाही पण तरीही ते रिटर्न गिफ्ट मात्र भरभरून देत असतात… आपला तो हक्कच आहे असे समजून ते घेत असतो…निळे पांढरे, जांभळे, नारिंगी, सोनेरी, लाल, रूपेरी… रंगांचे आकाश छतासारखे डोक्यावर पसरलेले…हसत प्रसन्न पणे पाहत असते… मग त्याला आनंद होईल, उत्साह दुणावेल, प्रसन्नता वाटेल अशी एक तरी गोष्ट त्याला द्यायला… निदान हवेने भरलेले फुगे अंतराळात सोडून दिले तरी त्या आकाशाचा बालका सारखा आनंद गगनात मावेनासा झालेला आपल्याला नाही का कळणार…
© नंदकुमार पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈