श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ काय हरवले सांग शोधिसी…– भाग- २ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

(दोन महिने लेकीला हवं नको ते पाहिलं. नोकरी सांभाळत हे सगळं करत होते, मला कधी त्याचा त्रास वाटला नाही.” ती बोलतच राहिली. ) – इथून पुढे —- 

“मीनल, तुला खोटं वाटेल, पण मला पहिल्यांदा मुलगीच हवी होती. त्यानं माझी इच्छा पूर्ण केली. नंतर त्याच देवानं न मागता माझ्या पदरात मुलगाही टाकला. आणखी काय हवं?

इतकी वर्षे मी केवळ एका आशेवर तग धरून होते की माझा मुलगा माझं भविष्य बदलेल. माझे कष्ट आणि माझ्या भावना समजून घेईल. काठीला लटकवलेले गाजर पाहून त्या गाजराच्या आशेने मूर्ख गाढव जशी गाडी हाकत असते, अगदी तशा गाढवासारखी माझी स्थिती झालीय. एखाद्याच्या कष्टाचं चीज होणं नियतीलाच मंजूर नसावे. 

अलीकडे सोनू पैश्यासाठी सारखा तगादा लावत असतो, नाही म्हटलं की अंगावर धावून येतो. कॉलेजमधल्या विद्यार्थ्यात मी आवडती प्राध्यापिका असेन, पण घरांत मी अप्रिय कशी होत गेले हेच मला कळले नाही. माझ्याविषयी त्यांच्या मनांत हे नावडतीचं बीज कधी रोवलं गेलं हे माझ्या लक्षातच आलं नाही.       त्यांच्या सुखासाठी आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल होण्यासाठी म्हणून मी माझ्या स्वत:साठी कमी आणि त्यांच्यासाठी जास्त जगत असते. माझी ऐपत नसताना देखील मुलांनी मागितलेली प्रत्येक वस्तू आणून दिली. मी जगावेगळं काही केलं असा माझा भ्रम नाही. खूप वर्षापूर्वी लिहिलेल्या माझ्याच कवितेच्या ओळी ओठावर येतात. ‘ओंजळीत निखारे धरून ठेवले/ आपल्यांना उब मिळावी म्हणून/ निखाऱ्यांचं मला दु:ख नाही/पण असं का व्हावं?/ हात भाजत असताना देखील/ आपल्यांनीच त्यात तेल ओतावं !’ तू मानसशास्त्राची प्राध्यापिका आहेस ना? मग सांग मी आता माझ्या मुलाशी कसं वागावं?” 

सुसि हवालदिल झाल्यासारखी दिसत होती. अखेर आता तिच्या हाती काय उरलं होतं? एवढे कष्ट सोसून देखील जर त्याची कुणालाच जाणीव नसेल तर अशी विफलता येणं साहजिकच आहे. जीवनातल्या कित्येक अडचणीना तोंड देत तिने स्वत:ची अशी एक ओळख निर्माण केली होती.

“सुसि, वाढत्या मुलांशी कसे वागावे हा आजकालच्या सर्वच पालकांसमोरचा कळीचा प्रश्न आहे.  जगभरातील माता या प्रश्नाने धास्तावलेल्या आहेत. आपल्याला जे काही मिळाले नाही ते आपल्या मुलांना कसे मिळेल यासाठी पालक आपले आयुष्य पणाला लावतात. स्वतः वाटेल तो त्रास सहन करून, स्वतःच्या आवडी-निवडीला मुरड घालून मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक नियोजन करीत असतात.

माझ्या मते पालकांनी घरात होणाऱ्या आर्थिक व्यवहारामध्ये मुलांना स्थान द्यावे. त्यासंबंधी जी चर्चा होईल ती त्यांच्या कानांवर पडण्याने सुद्धा त्यांच्यात खूप फरक पडतो. घरासाठी किंवा शिक्षणासाठी घेतलेली कर्जे याची जाणीव मुलांना करून द्यायला हवी. त्या कर्जाचे हफ्ते किती, त्यावरील व्याज किती हे त्यांना कळायला हवे. वर्षाकाठी त्यांच्या शिक्षणासाठी होणारा खर्च हेही त्यांना कळायला हवे. घरातील छोटे-मोठे होणारे खर्च त्यांना लिहायला सांगावे.

खूप वेळा मुलांचे मित्र मैत्रिणी उच्चभ्रू परिवारातून आलेले असतात त्यामुळे त्यांना मिळणाऱ्या सुविधा किरकोळ वाटायला लागतात. या जगात आपल्यापेक्षा देखील बिकट परिस्थितीत राहणारे परिवार आहेत हे त्यांना पटवून द्यायला हवे. समाजात एक प्रतिष्ठित पंच म्हणून जो लोकांच्या समस्या सोडवत असतो त्या तुझ्या नवऱ्याला तर ही समस्या चुटकीसरशी सोडवता यायला हवी. यात कसलं आलंय मानसशास्त्र? त्यांच्यावर ही जबाबदारी टाक. बरं ते जाऊ दे. काय म्हणते, तुमची सुकन्या आणि छकुली नात? लेकीकडे मज्जा करून आलीस वाटतं.”   

तिच्या तोंडून “ठीक आहे.” एवढेच शब्द बाहेर पडले. माझ्या लक्षात आलं. तिच्या ओठांतून जे बाहेर पडलं होतं आणि तिच्या डोळ्यांतून दिसणारे भाव या दोन्हीत काही ताळमेळ दिसत नव्हता. 

ती हळूच म्हणाली, “अगं काय सांगू, माझ्या हातचं खाल्ल्याशिवाय जिचं पोटच भरायचं नाही, त्या कन्येला आताशा माझा स्वयंपाक आवडेनासा झाला होता. इथे आली तेव्हा रोज बाहेरून काहीतरी मागवण्याची फर्माईश असायची. मी प्रेमाने सगळं निमूटपणे करीत होते. तरी देखील जाताना लेक म्हणालीच, ‘आई, हे काय सगळ्याच आया करतात, तू काही वेगळं केलं नाहीस.’ लेकीचे ते शब्द मला कापत गेले. 

तिचं लग्न झाल्यापासून तिच्याकडे एकदाही गेले नव्हते आणि तूच आग्रह केलास म्हणून मी गेले. दुसऱ्या दिवशीच कन्येनं सांगितलं, ‘आई, तुला जायचं असेल तर जा, बाबा आणि सोनूचे हाल होतील.’ ते माझ्या जिव्हारी लागलं. मी कशी राहणार? माझं घर कन्येसाठी हक्काचं होतं, तिचं घर माझ्यासाठी थोडेच हक्काचे असणार आहे? 

मोठ्या बाता मारून गेलेल्या मला परत यायला तोंड नव्हतं. मी माझी वर्गमैत्रिण सुलभाने आग्रह केला म्हणून तिच्याकडे चार दिवस राहिले आणि परत आले. मीनल, आताशा मला असं काय होतंय, हे कळेनासे झाले आहे. सतत काहीतरी हरवल्याची जाणीव होते आहे, नेमके काय हरवले आहे ते मात्र कळत नाही अशी अवस्था झाली आहे.” ती हतबल दिसत होती.  

मी म्हटलं, “ सुसि, तू काहीही हरवलं नाहीस. तुझे आहे तुझ्यापाशी. निर्व्यसनी प्रेमळ पती, स्वावलंबी कन्या आणि वंशोद्धारक मुलगा सगळं तुझ्याकडे आहे. आम्हाला हक्क दाखवणारी अशी एक मुलगी हवी होती. सोनूसारखा एक मुलगा हवा होता. पण काय करणार?” तिनं सुस्कारा टाकत असं म्हटल्यावर, मीच एखाद्या हरलेल्या योद्ध्यासारखी तिच्यासमोर शस्त्रे टाकली. सुसिच मला कितीतरी वेळ धीर देत बसली.  

दूरवर कुठेतरी हळुवार आवाजात गाणं वाजत होतं. “गर्द सभोंती रानसाजणी तू तर चाफेकळी,  काय हरवले सांग शोधिसी या यमुनेच्या जळी?” 

 – समाप्त –

© श्री व्यंकटेश देवनपल्ली.

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments