सुश्री विनिता तेलंग
🌸 विविधा 🌸
☆ ॥ श्रीकृष्ण ज्ञानदेव मैत्रभाव॥ ☆ सुश्री विनिता तेलंग ☆
देवकीया उदरी वाहिला, यशोदा सायासे पाळिला, का शेखीं उपेगा गेला, पांडवासी..
असा तो.देवकीने प्रसवला,यशोदेने वाढवला,आणि तो झटला पांडवांकरता.वसुदेवाचा अंश होता, पण नंदाचे भाग्य झाला.अष्टनायिकांचा नाथ,सोळा सहस्रांचा आधार.गोपिकांचे सुखनिधान,राधिकेचा प्राण.गोपालकांचा सखा,गोधनाचा पाठीराखा.दुष्टांचा मारक,सज्जनांचा तारक.अधर्माचा विच्छेदक आणि धर्माचा संस्थापक.परम ईश्वराचा पूर्णावतार आणि मानवपणाचा साक्षात्कार.
सर्वांना तो त्यांचा वाटे.कदंबाखाली गोपालांशी खेळताना किंवा वृंदावनात रस रचताना त्यातल्या प्रत्येकाला वाटे,तो आपलाच.सुदाम्याला वाटले हा माझा सहचर ,कुब्जेला वाटले ‘हे माझ्यास्तव.’
पण साऱ्यांचा असून तो कुणाचाच नव्हता. गोकुळ सोडलं,प्राणप्रिय बासरी परत कधी अधरावर धरली नाही.अष्टनायिकांच्या मोहात, राधिकेच्या त्यागात, कृष्णेच्या सख्यत्वात,कुंतीच्या ममत्वात कशा कशात गुंतला नाही तो.
जिथे गेला तिथे पूर्णांशाने त्यात होता. तिथले प्रयोजन संपताच कमलपत्राच्या निर्लेपपणे आपला आभाळासारखा निळा शेला उचलून निघून जायची त्याची रीत. पण एका जागी मात्र हा जगन्नायक गुंतून पडला.त्याच्या शेल्याचं टोक अडकून पडावं अशी एकच जागा होती -अर्जुन !
धर्म भीमांना नमस्कार करणारा,नकुल सहदेवांना आशीर्वाद देणारा कृष्ण अर्जुनाला मात्र उराउरी भेटत असे.’पांडवांमध्ये मी अर्जुन’ असे त्याने म्हणावे इतके त्याचे याचे एकत्व! ‘अप्रांतमती’ लेखात द.भि. कुलकर्णी म्हणाले, ‘देवकी,यशोदा,गोप-गोपी,राधा,द्रौपदी सारेजण कृष्णाला दर्पण करून आत्मदर्शन घेत होते;एकटा अर्जुन असा होता की जो कृष्णाचा आरसा झाला होता-कृष्ण अर्जुनात आत्मदर्शन घेत होता!’ काय नितळ मन असेल अर्जुनाचं!
हे कृष्णाचं गुंतणं जाणलं ज्ञानदेवांनी.गीतेचं तत्त्वज्ञान सांगताना योगेश्वराचा स्वर कुठे हळुवार झाला, कुठे त्याचा कंठ दाटून आला, कुठे त्याला अर्जुनप्रीतीचे भरते आले, कुठे त्याला काळजी वाटली, कुठे तो हलके रागे भरला,हे त्यांच्या हळुवार अंतःकरणानं हलकेच टिपलं.त्या अर्थी ज्ञानेश्वरही आरसा झाले.ज्ञानेश्वरीत त्यांनी कृष्ण होऊन श्रोत्यांना अर्जुनाच्या जागी बसवलं,आणि कृष्णाहून हळुवार होऊन आपल्यातील अर्जुनाला समजावलं!
दभि म्हणाले तसं ‘ज्ञानेश्वरांना कृष्णाचे सर्वस्पर्शित्व नेमके आकळले आणि त्याचे केंद्रही गवसले होते. त्याचे पूर्णकाम,निरिच्छ,जीवन्मुक्त असणे त्यांनी जाणले.आणि तसेच अर्जुनातले त्याचे गुंतणेही!’ ज्ञानेश्वरांचे निर्मळ,उन्नत आणि संवेदनशील मनच हे जाणू शकते.
ज्ञानेश्वरीतले कृष्णार्जुन प्रेमाचे दाखले फार लोभस आहेत!
पाचव्या अध्यायात योगशास्त्राचे महत्व ऐकल्यावर अर्जुन म्हणतो की हे सारं फार छान आहे. हे मला पुन्हा एकदा नीट समजाव .आणि अर्जुनाला योगमार्गाविषयी गोडी निर्माण होते आहे हे जाणून आनंदलेल्या कृष्णाचे वर्णन करताना माऊलींनाही आनंदाचे भरते आले आहे .
आधींच चित्त मायेचे, वरी मिष जाहले पढियंताचे, आता ते अद्भुतपण स्नेहाचे, कवण जाणे!
आधीच प्रेमाचं माणूस ,त्यात शिकायची इच्छा,त्यामुळे आता जो अपूर्व भाव उमलेल तो अद्भुत असेल खास !
ते म्हणो कारुण्य रसाची वृष्टि,की नवया स्नेहाची सृष्टि,हे असो नेणिजे दृष्टी,हरीची वानू.
जे अमृताची वोतली,की प्रेमचि पिउनी मातली,म्हणोनि अर्जुन मोहे गुंतली,निघो नेणे!
श्रीहरीचे ते पार्थाकडे पाहणे कसे होते म्हणून सांगू ?त्यात कारुण्याची वृष्टी आहे की नव्याने उचंबळलेल्या स्नेहाने परिपूर्ण अशी भगवंताची दृष्टी आहे ? ती दृष्टी म्हणजे जणू अमृताची वोतीव पुतळी होती, जी त्या अद्भुत क्षणात निर्माण झालेला प्रेमरस पिऊन अशी मातली, की अर्जुनाच्या प्रेमाच्या विळख्यातून तिचा पाय निघेना !
पुढे ज्ञानदेव म्हणतात की ही कल्पना किती फुलवावी तितकी फुलेल पण मला त्या प्रेम दृष्टीचे अचूक वर्णन करता येणार नाही .परमात्म्याचे प्रेम इतके अथांग आहे त्याचे वर्णन कसे शक्य आहे? पण ज्याअर्थी त्यांनी अर्जुनाला आधी ‘परिस बापा’ असे संबोधले त्या अर्थी हा प्रेमाचा गुंता आहे असे मला खचित वाटते !
पुढे सहाव्या अध्यायात ब्रह्मविद्या सांगताना तर ज्ञानदेवांच्या योगेश्वराच्या मनात भय दाटून येते. की खरेच मी ही गुह्यविद्या याला देणे योग्य आहे का ? अर्जुनाच्या मनात जर अद्वैताचा भाव जागा झाला आणि हा याचा देहाचा अहंभाव विसरून माझ्यात मिसळून गेला तर मी याच्या प्रेमाच्या सुखाला मुकेन !मी एकटा करू काय ?
विपाये अहंभाव याचा जाईल, मी तेची हा जरी होईल, तरी मग काय कीजेल, एकलेया..
दिठीचि पाहतां निविजे, कां तोंड भरुनी बोलिजे, नातरी दाटून खेंव दीजे,असे कोण आहे!
आपुलिया मना बरवी, असमाई गोठी जीवी, ते कवणेंसी चावळावी, जरी ऐक्य जाहले..
ज्याला पाहताच दृष्टी निवावी आणि ज्याच्यापाशी मन मोकळे करावे किंवा उत्कटपणे ज्याला मिठी मारावी असं अर्जुना वाचून दुसरं आहे कोण ? हा जर माझ्याशी एकरूप झाला तर माझ्या मनाला भावलेली एखादी गोष्ट मी सांगावी कुणाला ?आनंदाने माझे अंतःकरण उचंबळून येईल आणि मनात हर्ष अगदी मावेनासा होईल तेव्हा मी ते कुणापुढे ओतावे ? आणि मग योगेश्वराने एक तलम पडदा तसाच ठेवला जेणे करून दोघांचे द्वैत अबाधित राहील.
या ओव्या वाचताना वाटलं,ज्ञानदेवांनी भोगलेलं एकटेपणच या ओव्यांमधून हळुवार संयतपणे व्यक्त झालंय.कोवळ्या वयात हरपलेले मायबापांचे छत्र,सोसावे लागलेले समाजाचे वार,निवृत्तीनाथांची योग्यता जाणून त्यांची गुरु म्हणून केलेली सेवा,लहानग्या मुक्ता सोपानाची काढावी लागणारी समजूत,समाजापुढे स्वतःला सिध्द करण्यासाठी करावी लागलेली दिव्ये ..या साऱ्या झंझावातात हा बालयोगी निचळ एकटा उभा राहिला.या साऱ्या सोसण्याचा अस्फुटसाही उद्गार साऱ्या साहित्यात कुठेही नाही.पुसटसाही नाही.पण साऱ्या विश्वाचा भार वहाणारा जगजेठी एकटा असतो,अगदी एकटा,हे ज्ञानदेवांइतकं कुणाला समजेल ?
ज्याला आपले बालसुलभ हर्षखेद सांगावेत,कधी शोक झाला,हृदय विव्हल झालं तर खांद्यावर डोकं ठेवावं,आनंदाने विभोर होऊन मिठी मारावी असं बरोबरीचं मैत्र त्यांच्या वाट्याला होतं कुठे ? मग साऱ्या भूतमात्रांनाच मित्र केलं त्यांनी.गुरु-शिष्य,माता-बालक, ईश्वर-भक्त अशी अनेक नाती ज्ञानेश्वरीत उलगडली पण पसायदानात स्थान मिळालं ते मैत्रभावाला.भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे !
गीता समजून घेताना कृष्ण त्यांचा सखा बनला असणार.गीतेचं तत्त्वज्ञान आत्मसात करताना त्यांच्या तरल प्रज्ञेला गीतेतलं कृष्णार्जुनाचं भावविश्व जाणवलं असणार.त्यामुळंच कृष्ण जे थेट बोलला ते आणि न बोलताही त्यानं जे सांगितलं ते,दोन्ही त्यांनी आपल्याला उलगडून दाखवलं..
एकाच तिथीला जन्मलेली ही दोन अप्रांतमती व्यक्तित्वे एकमेकांत अशी मिसळून गेलेली वाटतात.
तूं तो माझें, मी तो तुझे ,ऐक्य जाले तेथें कैचें दुजें !
© सुश्री विनिता तेलंग
सांगली.
मो ९८९०९२८४११
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈