सौ कल्याणी केळकर बापट
विविधा
☆ “सुखी व्हा, समाधानी रहा…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆
काल एका गुरुजींनी आशिर्वाद देताना म्हंटले “सुखी व्हा, समाधानी रहा,” आशिर्वाद जाम आवडला आणि पटला. समाधान ह्या शब्दामध्ये मन गुंतले आणि विचारात देखील पाडले.समाधान ही गोष्ट आपल्याला मिळवावी लागते, अनुभवावी लागते.”स्वाद लियो तो जानो”ह्या सारखं ती अनुभवल्या वरच खरी तिची लज्जत, खुमारी ही कळते.समाधान म्हणजे खरतंर वर्णन करायला शब्दही तोकडे पडतात अशी गोष्ट.समाधान ही अनुभवण्याची एक गोष्ट.बरं ही गोष्ट अनुभवली तर अगदी इटुकल्या पिटुकल्या ,साध्यासुध्या गोष्टीतही मिळते.फक्त ही गोष्ट मिळवण्याचं कसब मात्र हवं हं.
अलार्म बंद केल्यानंतर जी पुन्हा डुलकी लागले ती खरी झोप.आणि ह्या साखरझोपेतून मिळतं एक वेगळंच स्वप्नाळू समाधान.
महिनाअखेर अचानक साडीच्या घडीतून मिळालेले पैसे म्हणजे खरा धनलाभ. आणि ह्या अचानक धनलाभातून मिळतं घबाडाएवढं समाधान.
कडकडून भूक लागली असता मस्त जमून आलेली पिठलं भाताची पंगत म्हणजे खरी मेजवानी.आणि ह्या मेजवानीतून मिळतं एक भरपेट ओतप्रोत,तुडुंब आनंदायी समाधान.
एखाद्या गोष्टीचे अप्रुप वाटत असतांनाच अचानक अलगद ओंजळीत पडलेली ती गोष्ट म्हणजे खरे सुदैव.आणि ह्या सुदैवातून मिळतो “अच्छे दिन” वालं साक्षात्कारी समाधान.
आपल्याला काय मिळाले ह्याचा ताळेबंद बघुन यापेक्षा आपल्याला खूप काही मिळाले ह्याची जाणीव म्हणजे खरी त्रुप्ती.आणि ह्या त्रुप्तीतुनचं मिळते उद्याचे उज्ज्वल आशादायी समाधान.
रात्री गादीवर पाठ टेकताच लागलेला डोळा म्हणजे खरे सुख.आणि ह्या सुखातुनचं मिळतं एक आत्मिक समाधान.
मी तरी स्वतः ला खूप नशीबवान समजते.कारण ह्याची अनुभुती मी पावलोपावली घेते.तुम्हीही समजून बघा खूप मस्त वाटेल. ह्या जन्मावर,ह्या जगण्यावर,शतदा प्रेम करावे.
© सौ.कल्याणी केळकर बापट
9604947256
बडनेरा, अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈