सौ.वनिता संभाजी जांगळे
कवितेचा उत्सव
☆ सांज… ☆ सौ. वनिता संभाजी जांगळे ☆
सांज पंखात मिटते
उगी उदास वाटते
गडद झाल्या सावल
भय मनात दाटते
मन फकीर होते
दूर क्षितिज धावते
काजव्याच्या उजेडाने
कधी का? वाट सरते
चिडीचूप झाले घरटे
चोचित मिटून जाते
गहिवरल्या नजरेने
गाय वासरा भेटते
खिन्न खुरट्या आठवांचे
मना येई भरते
खोल भुयार भावनेचे
मन बैरागी होते
© सौ.वनिता संभाजी जांगळे
जांभुळवाडी-पेठ, ता. – वाळवा, जिल्हा – सांगली
संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈