श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ ये रे घना.. ये रे घना… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

आजही जेव्हा जेव्हा मी अशी खिडकी जवळ बसुन असते… बाहेर पावसाची रिमझिम रिमझिम सुरू झालेली बघत राहते… मनाला केव्हढं सुख मिळतंय म्हणून सांगू… हवा कुंद झालेली काळ्या ढगांची शाल पांघरलेली बाहेरचं जग पाहते.. व्रात्य मुलासारखे पावसाचे उडणारे तुषार अंगावर पडत जातात अंगावरील  स्वेटरवर इवलसे मोती चमचमताना दिसतात.. मधुनच एखादी थंडगार झुळूक अंगाला लपेटून जाते ,तेव्हा सुरकुतलेल्या कायेवर शिरशिरीचा काटा  थरारतो… झुळूक कानात काही बोलून जाते.. ‘काय कुठे लागलीय तंद्री? तरुणाईतली ऐकू येतेय वाटतं वाजंत्री!’.. तिचा चेष्टेचा सूर झंकारतो..मनात विचारांचा पिंगा घुमू लागतो… गतकाळातील एकेक आठवणींची सर सर ओघळू लागते…दु:खाचे नि आनंदाचे तुषार मनात उडत असतात…घरातले एकाकीपण  वाकुल्या दावतात…पोटच्या पिलांनी पंखातले बळ अजमावण्यासाठी करियरचे क्षितीज लांब लांब विस्तारले,. आणि मायेच्या ओढीला नाईलाजाच्या आवरणाखाली आचवले.. प्रपंचाचा गाडा ओढता ओढता धन्याने जीवनाची इतिकर्तव्यता साधली.. चार सुखाचे दिवस पाहण्यासाठी मला मागेच ठेवली.. भावनेचा कल्लोळ तो उठतो मनात ,पण शब्द जुळवून येता ओठी ते तिथेच अडकतात.. कातर होतो गळा नि हुंदका होई गोळा… पाऊस बाहेर पडत राहतो.. पाऊस मनातही उसळत राहतो.. आठवणींच्या गारा टपटप पडत राहतात.. एकेक गार हळूहळू वितळत जाते… नि माझं मनं विषण्ण विषण्ण होत जाते…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments