कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 189 – विजय साहित्य
☆ अहो तुम्हाला माहेरपण लाभते का? ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
स्वर्गाची तुमच्या महती
आम्हाला नका सांगू देवा
भोगून पहा माहेरपण
नक्कीच कराल आमचा हेवा ll
मनसोक्त काढलेली झोप
आणि तिच्या हातचा गरम चहा
सुख म्हणजे काय असतं ,
देवा एकदा अनुभवून पहा ll
नेलेल्या एका बॅगेच्या
परतताना चार होतात
तिच्या हातचे अनेक जिन्नस
अलगद त्यात स्वार होतात ll
नेऊन पहा तिच्या हातच्या
पापड लोणचे चटण्या
सगळे मिळून स्वर्गात
कराल त्यांच्या वाटण्या ।।
शाल तिच्या मायेची
एकदा पहा पांघरून ।
अप्रूप आपल्याच निर्मितीचं
पाहून जाल गांगरून ll
लाख सांगा देवा हा
तुमच्या मायेचा खेळ l
तिच्या मायेच्या ओलाव्याचा
बघा लागतो का मेळ ?
फिरू द्या तिचा कापरा हात
एकदा तुमच्या पाठीवरून l
मायापती देवा तुम्ही,
तुम्हीही जाल गहिवरून ll
आई नावाचं हे रसायन
कसं काय तयार केलंत ?
लेकरासाठीच जणू जगते
सगळे आघात झेलत ll
भोगून पहा देवा एकदा
माहेरपणाचा थाट l
पैज लावून सांगते विसराल
वैकुंठाची वाट ।।
माहेरपण हा केवळ
शब्द नाही पोकळ
अनुभूतीच्या प्रांतातलं
ते कल्पतरूचं फळ ll
डोळ्यात प्राण आणून
वाट बघणारी आई l
लेकीसाठी ह्या शिवाय
दुसरा स्वर्ग नाही ll
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈