सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
– पूजा लक्ष्मीरूपाची… –
☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
देव्हाऱ्यातील देवासह मी
रोज लक्ष्मी पूजते
श्रावणात साक्षात लक्ष्मीरूपे
ये .. तुजला आमंत्रण देते —
☆
दारी येता लिंबलोण मी
टाकते ग उतरूनी
श्रमपरिहारार्थ टाकते
तव पायावर पाणी —
☆
ये बाई सुहास्य वदने तू
मम उंबरा ओलांडूनी
तव आगमने आपसूक जाते
घर सुखसौख्ये भरूनी —
☆
ये आई अंबाबाई लक्ष्मीरूपे
घे पाटावरी बसून
कोमट उदके पदप्रक्षालन
मंगल पायांचे पूजन —
☆
असो कृपेची छाया आई
भरते मळवट सौभाग्याचा
केशकलापी माळ गं आई
गजरा हा सुगंधी फुलांचा —
☆
यथामती यथाशक्ति नैवेद्य
आई गोड मानूनी घेई
आगमनाने तुझ्या वसू दे
घरात सुखमय शांती —
☆
भक्तिरुपाने सदा तेवतील
देवघरातील वाती
खण नारळाची ही साडीसह
भक्तिभावे भरते ओटी —
☆
गोड मानुनी घे सारे हे
महालक्ष्मी माते
ठेव सदा तव कृपा घरावर
हीच विनवणी करते —
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
मो 8149144177
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈