श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 206
☆ सावली होती… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
मनावर ताण आहे का ? धुमसते रान आहे का ?
तुझ्या मागावरी कोणी, उभा सैतान आहे का ?
☆
तुला पाहून का वनवा, भडकतो पेटतो आहे ?
दिले वाऱ्यास या कोणी, इथे वरदान आहे का ?
☆
ढिगारे खूप कचऱ्याचे, तुझ्या बाजूस हे सडके
तुला मी भेटण्याइतका, परीसर छान आहे का ?
☆
घराचे तोलले छप्पर, म्हणूनच सावली होती
अता त्या जीर्ण भिंतीला, कुठे रे मान आहे का ?
☆
चुलीला भ्रांत आहे की, जळावू लाकडे नाही
दिवाळी रोज तो करतो, कुणी धनवान आहे का ?
☆
किती ह्या मोहमायेने, मनाला ग्रासले आहे
इथे तर मृत्युही जगतो, तया सन्मान आहे का ?
☆
खऱ्याचे चालते कोठे, मनाबाहेर पडल्यावर
कटू हे सत्य चघळाया, मसाला पान आहे का ?
☆
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈