श्री सतीश मोघे

? मनमंजुषेतून ?

☆ पिंपळ आणि आंबा… ☆ श्री सतीश मोघे

आपले दु:ख, तेवढ्या मोठ्या मात्रेचे नसतांना अचानक कुणीतरी मोठ्या मात्रेने सांत्वन करायला पुढे आले की, थोडे गोंधळायला होते. हे  सात्वंन झिडकारावे की त्यामागचा आपलेपणा पाहून नम्रपणे  स्वीकारावे ? अशा संभ्रमात पडायला होते खरे… बागेतल्या पिंपळाला असेच काहीसे त्यादिवशी झाले.

बागेतले आंब्याचे झाड त्याला सांगत होते, “बघवत नाही रे तुला पिंपळा.. शिशिर ऋतूने तुला अगदीच पर्णहीन, निस्तेज करून टाकलय. पण धीर धर. काही दिवसाच वसंत सुरू होईल आणि येईल पुन्हा पालवी…. होईल पुन्हा पूर्वीसारख रूप … होशील माझ्यासारखा…” 

शिशिरात पर्णहीन अवस्थेत नीरव शांततेतली आनंददायी ध्यानावस्था अनुभवणाऱ्या पिंपळाला यावर काय बोलावे, हे क्षणभर समजेना. अनेकदा दुसऱ्याचे सांत्वन करतांना त्याचा दुःखभार हलका करण्याच्या हेतुपेक्षा, आपण खूप सुखात आहोत याचा काकणभर का होईना अभिमान दाखविण्याचा हेतू सांत्वन करणाऱ्याच्या मुखावर झळकत असतो. पण हा हेतू दिसला तरी त्यावेळी तसे बोलता येत नाही, याची समज आणि उमज पिंपळाला होती.

मंद स्मित करून पिंपळ आब्यांला म्हणाला, “तुझ्या प्रेमळ शब्दांसाठी खूप आभार. पण एक सांगू.. मी अजिबात दु:खात नाही. सृष्टीने सहाही ऋतूत आपले प्रारब्ध आधीच लिहून ठेवले आहे. कोणत्या झाडाने केव्हा फुलावे, बहरावे, कोमेजावे सगळे सगळे. आपल्या हातात फक्त मूळं आहेत आणि त्यांच्या व्दारे जमिनीतून जीवनरस घेणे आहे.हे एकदा उमगले की दुःखाचा लवलेश नाही”

“आपली मूळं आत सारखीच आहेत. फरक दिसतो, तो  फक्त बाहेर.. जमिनीवर… पाने, फळे, फुले, खोड, उंची यात फक्त फरक. विविधता आणि सौंदयासाठी केलेला… हे एकदा कळलं की, आहे त्यात आनंद.

सुखदुःखापलीकडील समाधानाचा, आनंदाचा अनुभव. आपल्या बाहयरूपातल्या बदलांकडे पहाण्याची एक वेगळीच दृष्टी येते… एक समाधानी अवस्था येते. जिथे कुणाशीही तुलना नाही, तक्रार नाही. ठेविले अनंते तैसेचि रहावे। चित्ती असो द्यावे समाधान।”

पिंपळाच्या या बोलण्याने आंब्याचे समाधान झाले नाही. त्याने पिंपळाला विचारले, “खरे खरे सांग! पर्णहीन झाल्याने तुझं रूप कुरूप झालय, पक्षी येईनासे झालेत, पानांची सळसळ नाही… याचे खरेच तुला दुःख नाही?”

धीरगंभीर आवाजात पिंपळ उत्तरला, ” नाही. अजिबात नाही. बाहेरच्या बदलणाऱ्या गोष्टींशी आपल्या सुखाला जोडून घ्यायचं आणि त्या गोष्टी बदलल्या की दुःखी व्हायचं, ही माणूसं करीत असलेली चूक आपण का करायची! माझं सद्‌भाग्य की, तथागताचा सहवास मला लाभला आणि पानं, फुलं, फळ 

यापलीकडे जाऊन कायम मूळाकडेच पाहण्याची खोड मला जागली. ‘घट्ट मूळ’ आणि ही ‘खोड’ असली की आनंदाला बाधा नाही. बाह्य बदलांकडे पाहण्याची दुष्टीच बदलून जाते”

“‘तू म्हणतोस पाने नाहीत त्याचं दुःख. पण खरं सांगू शिशिर ऋतू माझा ५-६ हजार पानांचा भार हलका करतो. ते २-३ महिने खुप हलकं हलकं वाटत! तू हे सुख नाही अनुभवू शकत.. पानांचा भार नाही. 

सळसळ नाही, पक्षांचे आवाज नाही. त्यामुळे ध्यान समाधीही दीर्घकाळ लावता येते. अधिक मूळाकडे जाऊन चैतन्याचा स्रोत देहभर भरून घेता येतो. वसंताला सामोरे जाण्याची ही पूर्व तयारी असते. म्हणूनच वसंत आला रे आला की अवघ्या सात दिवसात माझ्या देहभर पालवी फुललेली दिसते “

आंब्याला हळूहळू पिंपळाचे विचार पटत होते. पिंपळ पुढे बोलू लागला.” कुणाला आपण किती प्रिय आहोत, यावर आपण आपली प्रियता ठरवू नये. तुझाही मोहोर कधी जळतो.. कधी गळतो.. फळं नाही येत तेवढी… लोकं नाराज होतात..  फळांच्या अपेक्षेने प्रियता, जवळीकता असली की ती कधीतरी लोप पावते. पण फळाची अपेक्षा न ठेवता निरपेक्ष प्रेम केलं की प्रियता कायम रहाते. अशा निरपेक्ष प्रेम करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या प्रेमाची आठवण म्हणून त्यांच्या वहीत, पुस्तकात पिंपळपान कायमचं ठेवतात. शिशिरात देहावरची पाने गळाली तरी ती वह्या-पुस्तकातील पाने तशीच असतात. त्यांना बघून मी धन्य होत असतो.”

आपल्या फळाला बाजारात मोठा भाव / प्रसिध्दी आहे, अशा समजूतीत असणाऱ्या आंब्याला पिंपळ आपल्याहून जाणीवेने, विचाराने खूप मोठा आहे, हे एव्हाना जाणवले होते. पिंपळाप्रती आदरभाव, कौतुक व्यक्त करावं म्हणून आंबा पिंपळाकडे वळला तर काय? पिंपळ डोळे मिटून ध्यानस्थ झाला होता. पर्णहीन पिंपळाचं झाड आंब्याला त्याच्याहून सुंदर दिसलं..समाधानी जाणवलं…आणि  मूळाकडे जायची खोड लावून घेण्याचा निश्चय त्याने मनोमन केला.

© श्री सतीश मोघे

मो – +91 9167558555

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments