श्री संभाजी बबन गायके
विविधा
☆ पाठीशी रहा! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
केस मोकळे सोडलेले,कपाळावर ठसठशीत कुंकू,डोईच्या मधोमध पाडलेल्या भांगामध्ये कुंकवाची जाडसर रेघ,गळ्यात लांब मंगळसूत्र…अशी ती,बहुदा नवविवाहिता,अनवाणी पायांनी लोकल रेल्वेगाडीच्या पुढ्यात उभी होती. मोटरमनने शक्य होईल तितक्या जोराने हॉर्न वाजवला तेंव्हा ती पटकन बाजूला झाली….आणि गाडी आणखी पुढे सरकताच पुन्हा गाडी समोर आली. यावेळी मात्र ती दोन्ही रूळांच्या मधोमध पालथी पडली…मान एका रूळावर ठेवून. ‘हे भगवान! मध्यम वयाचा तो मोटरमन उदगारला…त्याची इच्छा असूनही गाडी थांबू शकणार नव्हती! गाडी तिला स्पर्श करणार त्या अगदी शेवटच्या क्षणाला तिने चटकन आपली मान बाजूला घेतली! पण तिचं शरीर तर दोन्ही रूळांच्या मधोमध होतंच….मोटरमनने एक क्षणासाठी डोळे बहुदा मिटून घेतले असावेत. खाडकन आवाज झाला…रेल्वेचा एक डबा तिला ओलांडून पुढे गेला होता…मोटरमनने पटकन गाडीमधून खाली उडी मारली. ती गाडीखाली निपचित पडलेली. तो पुन्हा गाडीत चढला आणि गाडी मागे घेतली. तिच्या किंकाळ्यांनी ऐकणा-यांची मनं बधीर झाली होती! उजव्या हाताची चार बोटं जागेवर नव्हती आणि डोक्याला डाव्या बाजूला मोठी खोल जखम! तिला दवाखान्यात न्यायला किमान वीस मिनिटे लागणार होती….ती वाचण्याची शक्यता नव्हती आणि तिच्या डोळ्यांतली जगण्याची आशा केविलवाण्या नजरेने सभोवार पहात होती…….का नाही बघणार? कुणाला मरायचं असतं?
तो कितीतरी वेळ त्या उंच पुलाच्या अलीकडे असलेल्या दिव्याच्या खांबाखाली बसून राहिला. पुलाखाली खोल समुद्र शांतपणे वा-यावर डुलत होता. येणारे-जाणारे आपापल्या येण्या-जाण्यात मश्गूल होते. तो तिथून उठणार इतक्यात तिथून जाणारी एक महिला त्याच्याजवळ थांबली. तिला तिच्या लहानग्या मुलीसोबत त्या पुलाच्या आणि समुद्राच्या पार्श्वभूमीवर एक छानसा फोटो काढून हवा होता. त्याने मोठ्या आनंदाने त्या मायलेकींचे फोटो काढून दिले. ती महिला आणि ती लहान मुलगी त्याला हसून टाटा करीत तेथून निघून गेले. कुणीतरी थोड्यावेळासाठी का होईना,खोटं खोटं का होईना छान बोललं, याचं समाधान त्याला मिळालं. पण पुन्हा त्याचं मन त्याच्या खाजगी आयुष्यात डोकावलं आणि तो पुलाकडे निघाला. कितीतरी वेळ त्या पुलाच्या कठड्यावर खोल समुद्राकडे पाय सोडून बसून राहिला….आणि एका क्षणी त्याने स्वत:ला खाली झोकून दिले! खाली पाण्यापर्यंत त्याचं शरीर पोहोचायला काही सेकंद तर लागणारच…ते पाच-सहा सेकंद त्याला युगासारखे भासले…आपण चूक करतो आहोत…नव्हे केलीच आहे याची त्याला जाणीव झाली! आता फार उशीर तर झाला नाही ना….हा विचार करायला? कुणीतरी आपल्याला वाचवायला हवं! आता त्याला मरायचं नव्हतं! कुणाला असं मरायचं असतं?
तिला जणू आता काहीही जाणवत नव्हतं…वेदनेच्या संवेदना मेंदूकडे वाहून नेणा-या नसा काळवंडून गेल्या होत्या…स्वत:चाच चेहरा आरशामध्ये बघण्याची सोय नव्हती राहिली….आणि दुसरं कुणीही या तिच्या चेह-याकडे पाहण्याची हिंमत दाखवत नव्हतं! त्यांना माहित होतं की आगीच्या धगीनं हिच्या शरीरातली धुगधुगी जवळ जवळ विझवत आणलेली आहे…फक्त काही दिवसांचा प्रश्न आहे…हीची सुटका होईल आणि आपलीही! तिने तिच्या आयुष्यात असं कुणाला तरी मरताना पाहिलं होतं…पण तिला नाही मरायचं असं..आणि इतक्यात. कुणाला असं मरायचं असतं?
आपलं अस्तित्व टिकवून ठेवणं ही तर समस्त प्राणी जगताची अंत:स्थ प्रेरणा. मग का कुणी असं या स्वत:च्या अस्तित्वच्या जीवावर उठतं? एरव्ही आपल्याला वेदना होतील,आपला जीव जाईल म्हणून स्वत:ला पदोपदी जपणारं माणूस,अगदी एवढ्याशा काट्यच्या एवढ्याशा टोकालाही बिचकणारा माणूस असा एकदम स्वत:ला त्या अंध:कारात का बरं झोकून देत असेल…काही समजत नाही!
दुस-या कुणीतरी आपल्याला जन्माला घातलं आहे…त्यामुळे दिला गेलेला जन्म आपला आपण मरणात परावर्तीत करण्याचा अधिकार आपल्याला नाही…असा विचार शहाणी माणसं करतात आणि प्राक्तन भोगत जीवनाच्या वाटेवर रक्ताळलेल्या पावलांनी चालत राहतात. त्यांना ठाऊक असतं की या वाटेवर कुठे न कुठे तरी एखादं सावलीचं झाड असतंच,त्याच्या खाली चार-दोन मखमली फुलं पडलेली असतात. इथं क्षणभर विश्रांती घेता येईल की. कुठंतरी एखादा झरा आढळेल आणि जन्माची तृष्णा निववता येईल. अगदीच आणि काहीही सुख नाही असं आयुष्य असूच शकत नाही मूळी. श्वास घेणं काय कमी सुखावह आहे? पाण्याखाली मिनिटभर डोकं बुडवून पाहिल्यावर कळतं की श्वासांमधलं सुख!
एखाद्या जागी पोहोचण्याचे दोन मार्ग असतात…लांबचा मार्ग अवघड पण सुरक्षित. जवळचा मार्ग त्याचं हशील वसूल करून घेतो वाटसरूंकडून. याच जवळच्या मार्गावरून काहीजण जाण्याचा प्रयत्न करतात आणि अकाली मरणाच्या वाटमारांना बळी पडतात!
समस्त जगताच्या कल्याणासाठी प्राणार्पण करणारे दधिची मान्य आणि पुज्य! पण संघर्षाला पाठ दाखवून पळणारे कोणत्याही दयेस पात्र नाहीत. किमान त्या दुस-या दुनियेत तर नाहीतच नाहीत. अर्थात हा विचार धर्मपरत्वे बदलत जात असावाही. पण कुठंही गेलं तरी आगंतुकपणे जाणे स्वत:ला अपमानास्पद तर आहेच पण जिथं जातो आहोत त्यांनाही संकोचून टाकणारं!
राग,चिंता,निराशा,वैफल्य,मान-सन्मानाच्या,अपमानाच्या बेगडी कल्पना इत्यादी शेकडो कारणांनी माणसं आपल्याच हातांनी जेंव्हा आपली जीवनपुष्पे कुस्करून टाकतात तेंव्हा ती मागे राहिलेल्यांसाठी दुर्गंधीच सोडून जातात… वेदनांची! मृत्यूनंतर काय? हा प्रश्न कदाचित जगन्नियंत्यास कायम अनुत्तरीत रहावा, असं वाटत असावं असं वाटतं…कारण आजवर त्याचं विश्वासर्ह उत्तर नाही गवसलेलं! किंवा मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही या लोकोक्तीनुसार प्रत्यक्ष अनुभवता न येणारं हे उत्तर असल्यानं…ते अविश्वसनीय वाटणंही साहजिकच आणि क्षम्यही! पण जाणारा कदाचित सुटून गेला असं वाटत असलं तरी त्याच्या मागे राहणारे आयुष्यभर पितामह भिष्मा सारखे बाणांच्या शय्येवर निजत असतात….हे मात्र अनुभवास येऊ शकते!
एखाद्याला आपल्यातून उठून जावंसं वाटतं याचाच अर्थ आपलं त्याच्याकडे पुरेसे लक्ष नव्हतं. त्याचं ऐकून घेण्याची तसदी आपण नाही घेऊ शकलो..उलट त्यालाच ऐकवत राहिलो आपण..आपलंच रडगाणं!
मग त्यांनाही वाटूच शकतं ना…आपण गेल्यावर यांनाच त्रास होईल,मग कळेल यांना आपली किंमत!
दरवर्षी असं जगातल्या सात लाख लोकांना वाटतं! १० स्पटेंबर हा दिवस अशाच माणसांसाठी आहे. आपल्या प्रेमाच्या माणसांच्या सतत आगेमागे रहा..त्यांना उपद्रव होणार नाही अशा बेतानं. देवानं आपल्याला दोन कान दिलेत…एक हृदय दिलंय…दोन डोळे दिलेत…ऐकायला,विचार करायला आणि बघायला. एक मेंदू दिलाय अंदाज घ्यायला…धोके ओळखायला. आपल्या लोकांना याचा लाभ द्यायला आपण मागे राहून चालणार नाही!
कुणालाही मरायचं नसतं…स्वत:चं स्वत: तर कधीच मरायचं नसतं…म्हणूनच मरू पाहणारी शेवटच्या क्षणी जगू पाहतात! चला, या जागतिक आत्महत्या विरोधी दिनाच्या निमित्ताने आपल्या माणसांशी संवाद साधायला आरंभ करूयात! ज्यांच्याशी आपण रक्ताने,नात्याने आणि समाजाने बांधले गेलो आहोत..ती सर्व आपलीच माणसे आहेत. कुणालाही एकटं पडू देता कामा नये!
कुणाला जगण्यानं छळलं असलं तरी मरणानं सुटका करेपर्यंत थांबण्याचं धैर्य त्याच्यात निर्माण करणं म्हणजे आपण त्याचं हितचिंतक असणं! शतदा नव्हे तर अगणितदा प्रेम करावं, असा जन्म लाभलेले आपण….प्रेम करीत रहावे…बोलावणे येईपर्यंत!
(दहा सप्टेंबर…जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन. यानिमित्त सुचलेलं. यातील पहिला प्रसंग नजरेसमोर घडलेला पंचवीस वर्षांपूर्वी घडलेला…अजून जसाच्या तसा नजरेसमोर तरळणारा. यातून सकारात्मक विचार प्रसारीत व्हावेत, अशी भाबडी आशा मनात ठेवून केलेला अभिनिवेशविरहीत शब्दप्रपंच. संभाजी बबन गायके. ९८८१२९८२६०)
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈