सौ. विद्या पराडकर
कवितेचा उत्सव
☆ रानातली वाट ☆ सौ. विद्या पराडकर ☆
रानातली वाट ही
सजली कशी नागमोडी
झाडांच्या ग सावलीत
धावे बाई दुडदडी☘️
रानातील वाट ही
वा-यालाही खुणावत
डोंगराकडे येई म्हणूनी
पुन्हा पुन्हा विचारत☘️
कसा माळ बाई सुना
वारा लपुन लपून बैसे
आमराईला बघता बघता
गालातल्या गाली हासे☘️
रानातील वाट ही
सर्वांना खेळवत राही
तलावाला पाहून बाई
लाजून दिसेनाशी होई☘️
रानातील वाट ही
देवता प्रवाशांची असते
परोपकार दीप घेऊनी
मानवी जीवन उजळीते☘️
रानातील वाट ही
मला भारी वाटे प्रिय
प्रवृत्ती कडून निवृत्ती कडे
जाणारी भासे माझी माय☘️
© सौ. विद्या पराडकर
वारजे पुणे..मो – ९२२५३३७३३०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈