श्री प्रदीप केळुस्कर
जीवनरंग
☆ त्या दोघी… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆
घरातून बाहेर पडता पडता सेलफोन वाजला म्हणून सुलभाने पर्स उघडली आणि फोन हातात घेतला आणि फोनवरचे नाव पाहताच तिच्या चेहर्यावर स्मित आले कारण फोन तिच्या मैत्रिणीचा स्मिताचाच होता.
‘‘काय ग ? आज सकाळीच ? बँकेत गेली नाहीस का ?’’
‘‘अग बँकेतूनच बोलते. संध्याकाळी स्टेशनवर भेटतेस ?’’
‘‘हो, भेटूया. सहा वाजता ना ?’’‘‘हो, नेहमीच्या जागेवर.’’
‘‘येते.’’
सुलभा झपझप पोस्टाच्या दिशेने चालू लागली. काल जमा केलेली सर्व कलेक्शन आरडी पोस्टात जमा करायची होती. आणि मग इन्शुरन्सच्या ऑफिसमध्ये जायचं होतं. काल एक पॉलिसी मिळाली होती ती ऑफिसमध्ये द्यायची होती. शिवाय तीन वाजता डेव्हलपमेंट ऑफिसर ज्योतीने मिटींग ठेवलेली आहे. ती मिटींग करुन साडेपाच पर्यंत बाहेर पडायचं आणि सहाच्या आधी विलेपार्ले स्टेशनवर नेहमीच्या जागी स्मिताला भेटायचं. ही एवढी कामं डोक्यात ठेवून सुलभा पोस्टात पोहोचली. रोजच्या प्रमाणे पोस्टाची कामे केली. मग इन्शुरन्स कंपनीत जाऊन आणि तीनची मिटींग अटेंड करुन साडेपाचला बाहेर पडली. आणि झपझप स्टेशनच्या दिशेने चालू लागली. कधी एकदा स्टेशनवर पोहोचतो आणि स्मिताला भेटतो असे तिला झाले. खर तर स्मिता आणि ती सोमवारीच भेटल्या होत्या आणि आज शुक्रवार मध्ये फक्त चार दिवस झाले. पण त्या दोघींची कोल्हापूरातली बालवाडीपासूनची मैत्री. दोघींची जोडी शाळा, कॉलेजात तशीच राहिली. सुलभा लग्न होऊन पार्ल्याला आली आणि स्मिता गोरेगांवात. सुलभा पोस्टाचे आणि इन्शुरन्सचे काम करायची आणि स्मिता बँकेत लागली. दोघींची एवढी मैत्री की, संसारातल्या बारीक सारीक गोष्टी पण एकमेकींना सांगायच्या.
आज काय एवढे अर्जंट काम काढल स्मिताने, असे मनात म्हणत सुलभा सहा वाजता विलेपार्ले स्टेशनवर पोहोचली. तेव्हा स्मिता नुकतीच तिथं आली होती आणि रुमालाने घाम पुसत होती. रेल्वेचा जिना उतरता उतरता सुलभाला स्मिता दिसली. तिला बघून सुलभाच्या मनात आले -‘‘काय परिस्थिती झाली स्मितूची किती देखणी ही, कोल्हापूरात असताना महाद्वार रोडला आपण फिरायला जायचो तेव्हा कोल्हापूरातील पोरं मागून मागून यायची. स्मिताने सुलभाला पाहताच हात दाखवला तशी स्मिता तिच्या दिशेने पुढे आली. मग दोघी तीन नंबर प्लॅटफॉर्मच्या टोकाला आल्या. ही दोघींची बोलण्याची जागा होती. इथे थोडी शांतता होती. सुलभा स्मिताला म्हणाली –
‘‘काय ग एवढ काम काढलस? सोमवारी तर भेटलो होतो ना ?’’
‘‘काय सांगायचं कप्पाळ ! माझ्या मागे एक एक टेन्शन आणि टेन्शन’’
‘‘काय झालं ?’’
‘‘तेजू कोणाबरोबर तरी फिरते अशी बातमी होतीच. काल माझ्या व्हॉटस् अॅपवर कोणीतरी दोघांचा फोटो पाठविला. तिच्याबरोबर एक दाढीवाला पुरुष, हिच्यापेक्षा वयानं बराच मोठा दिसत होता. शेवटी काल तिला खडसावलं. तेव्हा कळलं तो गोरेगांव स्टेशन जवळचा लोखंडाचा व्यापारी जमीर.’’‘‘मुस्लिम दिसतोय।’’ सुलभा ओरडली.
‘‘हो गं माझे विचार तुला माहित आहेत ना ? माझे आईबाबा होते संघाशी संबंधित, माझेपण विचार त्यांच्यासारखेच. ते तर झालंच शिवाय तो वयानं पण पंधरा वर्षांनी मोठा.’’
‘‘बाप रे ! मग अभयला कळलं का ?’’
‘‘ तो असतो का घरी ? सकाळी टेबल टेनिस खेळायला बाहेर पडतो आणि सायंकाळी क्लबमध्ये ब्रिज खेळायला जातो. त्याच्या मॅचिस आणि टुर्नामेंटस. तो बेफिकीर बाप. आयुष्यात जबाबदारी कसली घेतली नाही त्याने. त्याला काय? तो खांदे उडवित म्हणेल, ‘‘तिच लाईफ आहे ते. मी कोण लुडबुड करणारा?’’ असं म्हणून तो गाढ झोपेल. झोप माझीच उडाली गं सुलु.’’
‘‘खरं आहे गं स्मितू, हे वयच असं असतं. डोळ्यावर पट्टी बांधल्यासारखी मुलं निर्णय घेतात. ती ठाम आहे का? मी तिच्याशी बोलून बघू?’’
‘‘बघ तुझं ऐकतेय का ते, मी निघते. घरी जाऊन जेवण करायचं आहे. दहा वाजल्यानंतर दोघं बाप लेक गिळायला येतील. त्यांना काहीतरी घालायला हवं ना? आणि परत उद्याचा माझा डबा – त्याची तयारी. जाते.’’
‘‘सांभाळून जा ग स्मितू, रस्ता सांभाळून क्रॉस कर. आजूबाजूच्या गाड्या बघ आणि मगच रस्ता ओलांड.’’
‘हो’ म्हणत स्मिता गेली आणि तिच्या पाठमोर्या शरीराकडे सुलभा पाहत राहिली. स्मिता दिसेनाशी झाली तशी ती घरी जायला वळली. आज खूप दगदग झाली म्हणून सुलभाने रिक्षा केली. रिक्षावाल्याला पत्ता सांगितला आणि डोळे मिटून रिक्षाच्या पाठीवर टेकून बसली. आपल्या संसारापेक्षा तिला स्मिताच्या संसाराची आणि स्मिताची जास्त काळजी वाटत होती. बेजबाबदार नवरा, हाताबाहेर गेलेली एकुलती एक मुलगी. कुटुंबासाठी नोकरी करण्याची गरज, नोकरी आणि संसार सांभाळता सांभाळता होणारी दमणूक कधी या स्मिताला विश्रांती मिळणार आहे कोण जाणे ? त्यात आता तिच्या मुलीने तेजश्रीने घेतलेला निर्णय. पहिल्यापासून ही तेजश्री आपल्याला आवडत नव्हती. बेफिकीर मुलगी. आईच्या कष्टाचे आणि धावपळीचे काहीसुध्दा पडले नाही तिला. रिक्षा थांबवून सुलभा घरी आली. नवरा नऊच्या पुढेच येणार, कन्या विनयाचा पाच वाजताच फोन आलेला. आता थोडा वेळ विश्रांती घेऊ. पोळ्या साडे आठनंतर केल्या तरी चालतील. असे म्हणत वॉश घेऊन, कपडे बदलून सुलभा बेडवर पडली. तिच्या मनात आले – यावेळी स्मिता काय करत असेल? गोरेगांवला उतरुन भाजी, ब्रेड घेऊन दोन किलोमीटर अंतर चालत असेल. तिला किती वेळा सांगितलं अगं स्टेशनवरुन रिक्षाने जा. पण कुटुंबासाठी पैसे वाचवायचे म्हणून चालत जाते. पुन्हा घर दुसर्या मजल्यावर. लिफ्ट नाही. घरी गेल्या गेल्या जेवणाची तयारी. बरं या दोघांना साग्रसंगीत जेवण हवं. अधून मधून नॉनव्हेज हवं. दोघांची मदत शून्य. सुलभाच्या अंगाचा संताप संताप झाला. आपला नवरा असा असता तर मी सरळ केला असता. पण स्मितू पडली गरीब गाय. स्वतः रडत बसेल पण नवर्याला बोलणार नाही. त्यात आता तेजश्रीने ठरविलेले लग्न. आपण आता उद्या फोन करावा. यावेळी कुठेतरी मित्राबरोबर नाहीतर मैत्रिणीबरोबर हुंदडत असेल असा विचार करता करता सुलभाचा डोळा लागला. दारावरची बेल वाजली तशी ती उठली आणि तिने दरवाजा उघडला. तिचा नवरा राजन आला होता. तिने घड्याळ्यात पाहिले. साडेआठ वाजले होते.
‘‘आज लवकर ! मेनन ने लवकर सोडलं वाटतं’’
‘‘हो मेनन साहेब पण अंधेरीला जात होते त्यांनीच सोडलं’’
‘‘माझ्या पोळ्या करायच्या आहेत, वॉश घ्या तो पर्यंत जेवण वाढतेच.’’
हो म्हणत राजन कपडे बदलून वॉशरुममध्ये गेला तोपर्यंत सुलभाने गॅस पेटवून पोळ्या करायला घेतल्या. राजन बाहेर आला तो पर्यंत तिने ताटात जेवण वाढायला घेतले.
‘‘आज पोस्टात गेली होतीस का?’’
‘‘हो तर. आज खूप धावपळ, पोस्ट, एलआयसी, त्यात ज्योतीने मिटींग लावलेली आणि स्मितूचा फोन – स्टेशनला भेटायला ये म्हणून…’’
‘‘पण स्मिता सोमवारीच भेटलेली ना?’’
‘‘भेटलेली पण आज पुन्हा भेटू म्हणाली. तिच्या पोरीने तेजूने लग्न जमवलयं म्हणे’’
‘‘आ ऽऽ कोणाबरोबर ?’’
‘‘आहे कोणी मुस्लिम, लोखंडाचा व्यापारी गोरेगांव स्टेशनजवळचा.’’
‘‘अरे बापरे, मग स्मिता – अभयची काय म्हणतोय ?’’
‘‘स्मितूची झोप उडालीय बिचारीची, अभय काय बिनधास्त माणूस, तुमच्या एकदम विरुध्द.’’ ‘‘म्हणजे ?’’
‘‘तुम्ही अति काळजी करणारे, आपल्या विनूने स्वतः लग्न जमवल म्हणून ब्लड प्रेशर वाढवून घेतलंत. पण विनूने लग्न जमवलं ते उच्च शिक्षित, एमबीए झालेला, चांगल्या कुटुंबातील मुलाशी, आता बिपीन तुम्हाला मुलगा वाटतो.’’
‘‘अगं बाप हा असाच हळवा असतो. तो बाहेरुन फणसासारखा वाटत असला तरी’
‘‘पण त्याला आहे ना अपवाद ! हा स्मितूचा नवरा अभय’’
‘‘अग त्याला पण वाटत असेल, बाहेरुन दाखवलं नाही तरी.’’
‘‘कुठलं काय ? स्मितू सांगत होती उद्यापासून तो ट्रेकिंगला चाललाय चार दिवस भिमाशंकरला’’ सुलभाने दोघांचं जेवण घेतलं पण तिच्या डोळ्यासमोर होती स्मिता. कोल्हापूरातून ग्रॅज्युएट झाल्यावर स्मिता आणि मी नोकरीसाठी कसल्या कसल्या परीक्षा देत होतो तेवढ्यात मुंबईत सचिवालयात नोकरी करणार्या अभयचे स्मितासाठी स्थळ आले. मुंबईत जायला मिळणार म्हणून स्मिता लग्नाला तयार झाली. अभय होता पण देखणा. आम्ही तिच्या मैत्रिणी तिच्या भाग्याचा हेवा करत होतो. पण लग्नानंतर चार पाच महिन्या नंतर स्मिता आली ती निराश होऊन. तिच्यामते अभय अती आळशी, बेफिकीर माणूस होता. सचिवालयात नोकरीला होता पण त्याचे नोकरीत धड लक्ष नव्हते. सतत खेळ, ट्रेकिंग, मित्र मंडळी, पार्ट्या, पैसे किती खर्च करायचा त्याला मर्यादा नव्हती. एका वर्षानंतर स्मितूची बँकेत निवड झाली आणि तिचा पगार घरात यायला लागला तसा तो जास्तच बेफिकीर झाला. त्याच्या पार्ट्या वाढल्या. खर्च वाढले. त्याच दरम्यान सुलभाचे राजनशी लग्न झाले. राजन इन्शुरन्स कंपनीत नाकासमोर चालणारा, काटकसरी, संसारी. सुलभा पार्ल्यात आणि स्मिता गोरेगावला. सुलभा मुंबईत आली तशी दोघांच्या भेटीगाठी सुरु झाल्या. स्मिताची बँकेची नोकरी होती. मग स्टेशनवर भेटणे सुरु झाले. मग सुलभाचे बाळंतपण आले. कोल्हापूरात न्यू महाद्वार रोडवर चिपलकट्टी हॉस्पिटलमध्ये विनया झाली. सुलभाची काळजी घ्यायला स्मिता कोल्हापूरात हजर होती. मग बारसं करुनच मुंबईला गेली. एका वर्षाने स्मिताचं बाळंतपण. पुन्हा चिपलकट्टी हॉस्पिटल. तेजश्रीचा जन्म. तेजश्रीच्या बारशाला अभय आला नाही हे सर्वांना खटकलं.
सुलभाची विनया दोन वर्षाची झाली आणि सुलभाने पोस्टल एजन्सी घेतली. एलआयसीचे काम करु लागली. मॅच्युअल फंड एजन्सी घेतली. सुलभाचा नवरा राजन तिला सहकार्य करणारा. रविवारी सुट्टी असेल तेव्हा सुलभाला मदत करणारा. प्रसंगी पोस्टाचं कलेक्शन आणणारा. स्मिताचा नवरा सतत बाहेर, स्पोर्टस, मित्र, ट्रेकिंग. वयाच्या चाळीसाव्या वर्षी स्मिताच्या नवर्याने – अभयने नोकरी सोडली आणि टेबल टेनिसचा ट्रेनर म्हणून गोरेगांव स्पोर्टस क्लबमध्ये नोकरी पकडली. मग पहाटे उठून जाणे, दुपारी येणे, दुपारी भरपूर झोपणे, संध्याकाळी जाणे, रात्रौ उशिरा येणे, मग खेळाच्या स्पर्धा कधी इथे, कधी तिथे. मग जय पराजय, पार्ट्या, बाहेर खाणे, पैसे उडविणे हे सुरूच. यात स्मिताची खूप ओढाताण झाली. नवरा सतत बाहेरगावी म्हणून तेजश्रीचे लाड झाले आणि तिचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले.
जेवता जेवता सुलभाच्या डोळ्यासमोर सर्व येत होते. स्मिता मग नर्व्हस होत गेली. सतत आपल्या विचारात राहू लागली. त्याचा परिणाम तिच्या तब्येतीवर झाला. केस गळू लागले. सुलभाच्या एक लक्षात आले. गेली काही वर्षे स्मितू स्वतःच्या विमा पॉलिसीज काढू लागली आहे. आपण तिला म्हणायचो अग सगळ्या पॉलिसी स्वतःच्या नावाने कशाला काढतेस? काही तेजूच्या नावाने काढ, अभयच्या काढ. तिचे म्हणणे – तिला स्वतःचे काही खरं वाटत नाहीय. अभयला नोकरी नाही, आपल्यामागे तेजूला काही कमी पडायला नको.
रात्री झोपताना सुलभाने मनाशी ठरविले, उद्या तेजूला काय ते विचारायचे. दुसर्या दिवशी तिने तेजश्रीला फोन लावला. तिचा फोन कशासाठी हे तिने ओळखले असावे.
‘‘काय ग मावशी, आई काही बोलली वाटतं?’’
‘‘काय ?’’
‘‘माझ्या लग्नाचं’’
‘‘होय बाई, काहीतरी घाईघाईत निर्णय घेऊ नकोस तेजू’’
‘‘मावशी, मला समजतं आता. मी तेवीस वर्षाची आहे. तुमच्या टिपीकल मिडलक्लास लोकांचे रडगाणं मला सांगू नकोस.’’
‘‘अग पण त्याचा धर्म ?’’
‘‘मी एवढ्यात लग्न करीन असं नाही गं मावशी, सुरुवातीला मी रिलेशनमध्ये राहीन, तो आवडला तर मग लग्न.’’
‘‘अगं बाई असलं काहीतरी बोलू नकोस. मी काय, तुझी आई काय? आम्ही कोल्हापूरातल्या साध्या मुली गं, असले संस्कार आमच्यावर नाहीत.’’
‘‘पण मी कोल्हापूरातली नाही ना? मी मुंबईतल्या अभय कानविंदेंची मुलगी आहे. माझा बाबा बघा कसा फॉरवर्ड विचाराचा आहे. नाहीतर तुम्ही ….’’ असं म्हणून तेजश्रीने फोन ठेवला. सुलभाने तेजश्रीला पुन्हा फोन लावायचा प्रयत्न केला पण तिने फोन उचललाच नाही.
क्रमश: १
© श्री प्रदीप केळुसकर
मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈