सौ कुंदा कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ गौराई आल्यात सोन्याच्या पायी… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ☆
गौराई आल्यात सोन्याच्या पायी,
सख्या जमल्या जलाशयी,
पुजून गौर आनंदाने,
निघाल्या घरी मौनव्रताने
पाण्याचा तांब्या खुलला छान,
गौरीच्या रोपाचा भलताच मान,
आनंदाला उधाण येई,
उंबऱ्यावर औक्षण होई
श्रावणगौरीची गळाभेट झाली
हळदी कुंकू पावले सजली
दोघी बहिणी घरभर फिरल्या,
उदंड उदंड म्हणत राहिल्या,
सुंदर मुखवटे, उभ्या राहिल्या,
कोडकौतुके तृप्त जाहल्या
भाजीभाकरी,घावनघाटले,
नेवैद्याने तृप्त जहाल्या
दुसरे दिवशी पुरण,वरण
माहेरवाशीण आणि सवाष्ण
हळदी कुंकू संध्याकाळी
नटल्या, सजल्या पोरी बाळी
तिसरे दिवशी सासरी निघाली,
मुरडीच्या करंज्या, ओटी भरली,
धनधान्याने कोठी भरली
गौराई सोन्याच्या पावली निघाली.
© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये
क्यू 17, मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे
मो. 9527460290
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈