श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ मोल… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆
रमण्यावरती कोण पेशवा दान वाटतो आहे
पूर्वसुरींच्या घटनांचे तो पाप क्षाळतो आहे
विध्वंसाचा डाव भयानक तोच खेळला होता
अपराधांचे कथन कराया मौन पाळतो आहे
विरांगणेच्या घटृमिठीचा आठव आला तेंव्हा
अमूर्त सुंदर सखी कुंतली फूल माळतो आहे
जगावेगळी प्रीत बावळी त्या दोघांची होती
दोघांचेही प्रेम आंधळे तोच मानतो आहे
विरहवेदना काळजातल्या जरी राहिल्या ताज्या
तरी सखीला तोच आपल्या सौख्य मागतो आहे
रीत जगाची कोण पाळतो समर्पणाच्या वेळी
आत्मबलाने डाव जिंकणे हेच साधतो आहे
मोल जयाचे तया द्यायचे खरेच असते येथे
असा तसा मग कधीतरी हा देह संपतो आहे
☆
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈